जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या पालखीचे शुक्रवारी उद्योगनगरीत जोरदार स्वागत करण्यात आले. सायंकाळी आकुर्डीतील विठ्ठल मंदिरात पालखी मुक्कामासाठी पोहोचली. शनिवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. विविध संस्था, संघटनांनी पालखीचे जागोजागी स्वागत केले. त्याचप्रमाणे, विविध वस्तूंचे वाटपही केले. आषाढी वारीसाठी संत तुकोबांच्या पालखीचे गुरुवारी देहूगावातून प्रस्थान झाले. तुकोबांच्या पालखीचा पहिला मुक्काम इनामदार वाडय़ात झाला. शुक्रवारी सकाळी पालखीने पुढील प्रवासासाठी प्रस्थान ठेवले. पावणेपाचच्या सुमारास पिंपरी-चिंचवडच्या प्रवेशद्वाराजवळ निगडीत पालखीचे आगमन झाले. या वेळी मोठय़ा संख्येने भाविक उपस्थित होते. या निमित्ताने पिंपरी महापालिकेने भक्ती शक्ती शिल्पसमूहालगत स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. महापौर मोहिनी लांडे, आमदार विलास लांडे, आयुक्त राजीव जाधव आदींनी पालखीचे स्वागत केले. पालिकेच्या वतीने ३५० दिंडीप्रमुखांना शिल्पाकृती भेट स्वरूपात देण्यात आली. या वेळी देहू देवस्तानचे रामदास मोरे, अशोक मोरे, अभिजित मोरे, सुनील मोरे, जालिंदर मोरे यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर पालखी आकुर्डीगावातील विठ्ठल मंदिरात मुक्कामासाठी पोहोचली. या वेळी ग्रामस्थांनी पालखीचे स्वागत केले. आकुर्डीतील मुक्कामानंतर शनिवारी सकाळी पालखी पुण्याकडे प्रस्थान ठेवणार आहे. दरम्यान, पिंपरी पालिकेच्या वतीने वारकऱ्यांसाठी विविध व्यवस्था करण्यात आली आहे. वारकऱ्यांना शाळा उपलब्ध करून देण्यासह विद्युत, आरोग्य, पाणीपुरवठाविषयक सुविधा दिल्याचे पालिकेने कळवले आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा