जगद्गुरू संत तुकाराममहाराजांच्या पालखी सोहळ्याने शुक्रवारी बारामती शहरात कवी मोरोपंतांच्या व शिवलीलामृतकार श्रीधरस्वामी यांच्या कर्मभूमीत प्रवेश केला. बारामतीकरांनी मोठय़ा उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत केले. रणरणत्या उन्हाच्या झळा अंगावर घेत पालखीचे मार्गक्रमण झाले. हरिभक्तीबरोबरच ‘‘देवा विठोबा आता तरी पाऊस पडू दे रे बाबा’’ असा धावा वारकऱ्यांकडून करण्यात येत होता.
हातात भगवा झेंडा गळ्यात वीणा व मुखी ‘ज्ञानोबा-तुकाराम’ जय घोष करीत पालखी सोहळा बारामती तालुक्यातील गवळ्यांची उंडवडीच्या मुक्कामावरून सकाळी मार्गस्थ झाला. पालखीचा प्रवास आजही रणरणत्या उन्हातच झाला. उन्हाच्या झळा लागत असतानाही भक्तीतील तल्लीनता जराही कमी झालेली नव्हती. त्यात भक्तिमय वातावरणात पालखी संध्याकाळी बारामती शहरात दाखल झाली.
पालखी मार्गावर पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. शहरात ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. पालखीच्या मार्गावर रांगोळ्यांच्या पायघडय़ा घालण्यात आल्या होत्या. पालखी सोहळ्यामध्ये शालेय विद्यार्थिनींचे पथकही सहभागी झाले होते. त्याचप्रमाणे मार्गावर वारकऱ्यांसाठी पाणी, चहा, नास्ता त्याचप्रमाणे भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. वारकऱ्यांच्या आरोग्याच्या सुविधेकडेही विशेष लक्ष देण्यात येत होते.
पालखीच्या स्वागतासाठी बारामतीच्या नगराध्यक्षा जयश्री सातव, उपनगराध्यक्ष राजेंद्र बनकर, मुख्याधिकारी रवी पवार, नगरसेवक किरण गुजर, सुभाष ढोले, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष इम्तीयाज शिकिलकर, योगेश जगताप आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पाटस रस्तावरील धनंजय देशमुख चौकातील शहराच्या वेशीवर पालखीचे स्वागत केले. बारामतीकरांच्या उत्साही स्वागताचा स्वीकार करीत संध्याकाळी पालखी नगरपालिकेसमोरील शारदा प्रांगणात मुक्कामी दाखल झाली. या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी रात्री उशिरापर्यंत भाविकांची मोठी गर्दी झाली होती.
पालखीच्या आगमनामुळे शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वारकऱ्यांसाठी विविध सुविधा व पाणी पुरविण्याबाबत प्रशासनाकडून चोख व्यवस्था करण्यात आली होती. शनिवारी सकाळी पालखी सोहळा काटेवाडी व भवानीनगरकडे मार्गस्थ होणार आहे. काटेवाडी येथील दुपारच्या मुक्कामात धोतराच्या पायघडय़ा व मेंढय़ांच्या रिंगणाचा सोहळा होणार आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा