श्री संत ज्ञानेश्वर आणि श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या मंगळवारी (२० जून) सकाळी शहरातून श्री क्षेत्र पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात येणार आहेत. प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार असून वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.
श्री संत तुकाराम महाराज यांची पालखी नाना पेठेतील निवडुंग्या विठोबा मंदिर येथून मार्गस्थ होणार आहे. श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरातून मंगळवारी सकाळी मार्गस्थ होणार आहे. दोन्ही पालख्या लष्कर भागातून पुणे-सोलापूर रस्त्यावर येतील. त्यानंतर हडपसर गाडीतळ येथून श्री तुकाराम महाराज यांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी पोहोचेल. हडपसर गाडीतळमार्गे दिवे घाटातून श्री ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी मंगळवारी सायंकाळी सासवडला मुक्कामी पोहोचेल.
पालखी मार्गस्थ होताना बंद राहणारे रस्ते पुढीलप्रमाणे- संत कबीर चौक ते बेलबाग चौक (लक्ष्मी रस्ता), संत कबीर चौक ते रामोशी गेट चौक, गोळीबार मैदान ते ढोले-पाटील चौक (सेव्हन लव्हज चौक), मम्मादेवी चौक ते गोळीबार मैदान चौक, बिशप स्कूल ते मम्मादेवी चौक, वानवडी बाजार ते मम्मा देवी चौक, ट्रायलक चौक ते महात्मा गांधी रस्ता, मोरओढा चौक ते भैरोबानाला चौक, भैरोबानाला चौक ते मम्मादेवी चौक, जांभूळकर चौक ते फातिमानगर चौक, बी. टी. कवडे रस्त चौक, रामटेकडी चौक, सिरम फाटा चौक ते सोलापूर रस्ता, मंतरवाडी फाटा ते दिवे घाट.
पोलिसांकडून देण्यात आलेल्या सूचना
- पालखी मार्गावर दुतर्फा वाहने लावण्यास मनाई
- पालखी मार्गस्थ झाल्यानंतर मागील रस्ता टप्प्याटप्प्याने वाहतुकीस खुला
- पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन
- सोलापूरकडून पुण्याकडे येणाऱ्या जड वाहनांना मनाई
- पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन