टाळ-मृदंगाचा नाद, हाती घेतलेली एकतारी वीणा आणि चिपळ्या यांच्या सुरांवर ‘ज्ञानोबा माउली तुकाराम’चा होणारा जयघोष.. डोईवर तुळशी वृंदावन आणि मुखी विठ्ठलनामाचा गजर करीत मार्गक्रमण करणाऱ्या महिला.. कधी कडक ऊन तर कधी ढगाळ हवामानामुळे आलेली सावली अशा वातावरणात तसूभरही कमी न झालेला उत्साह.. विठ्ठलाच्या दर्शनाची आस मनी घेऊन निघालेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि संतशिरोमणी तुकाराम महाराज यांच्या पालखीचे रविवारी पुण्यनगरीमध्ये उत्साहात स्वागत झाले. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात तर, संत तुकाराम महाराजांची पालखी नाना पेठ येथील निवडुंग्या विठ्ठल मंदिरामध्ये विसावली.
‘साधू संत येती घरा’ या उक्तीनुसार पुणेकरांनी पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत केले. वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी नागरिकांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. वारकरी बांधवांना फळे, गुडदाणी, बिस्किटे यांचे वाटप करण्याबरोबरच पालखी विसावा सुरू झाल्यानंतर वारकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यामध्ये कार्यकर्ते रममाण झाले होते. ठिकठिकाणी ध्वनिवर्धकावरून अभंग आणि भजनांच्या ध्वनिफितींमुळे सारी पुण्यनगरी भक्तिभावमय झाली होती. पालखीच्या स्वागतासाठी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नागरिकांसह महिला आणि बालचमूंनी कपाळावर गंध लावून घेतले आणि गंध लावणाऱ्या ‘माउली’ला दक्षिणाही दिली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील चॅम्पियन्स करंडकाच्या अंतिम फेरीचा सामना सुरू असल्याने पालखी सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी भाविकांच्या संख्येवर त्याचा परिणाम दिसून आला. दरवर्षी रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांची दर्शनासाठी गर्दी होत असते. त्या तुलनेत रविवारी मात्र भाविकांना पालखीचे सहजगत्या दर्शन घेता आले.
संत तुकाराम महाराज यांची पालखी सकाळी आकुर्डी येथून निघाली. तर, संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदी येथील आजोळघरातून पुण्याकडे मार्गस्थ झाली. मजल-दरमजल करीत या दोन्ही पालख्या दुपारी पुण्यात पोहोचल्या. पुणे-मुंबई रस्त्याने संत तुकाराम महाराज यांची पालखी मार्गक्रमण करीत पुण्याकडे आली. तर, संगम पुलावरून संत ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी आली. पाटील इस्टेट परिसरात पुणे महापालिकेतर्फे स्वागतकक्ष उभारण्यात आला होता. दोन्ही पालख्यांचे महापौर मुक्ता टिळक, उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, स्थायी समिती अध्यक्ष मुरलीधर मोहोळ आणि महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांनी स्वागत केले.
समस्त हिंदू आघाडीतर्फे डेक्कन जिमखान्यावरील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला संत तुकाराम महाराज यांचे वंशज विठ्ठल महाराज मोरे आणि अभिजित मोरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ‘छत्रपती संभाजी महाराज की जय’ आणि ‘संत तुकाराम महाराज की जय’ या घोषणांनी परिसर निनादला होता. मिलद एकबोटे यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टतर्फे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, उपाध्यक्ष सुनील रासने आणि कोशाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांच्यासह कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते. साखळीपीर राष्ट्रीय मारुती मंदिरातर्फे ज्ञानोबा आणि तुकोबा पालखीचा प्रसाद सेवन करून रोजा इफ्तार सोडण्यात आला.
कार्यकर्त्यांमधील वादंगामुळे पालखीला विलंब
खेळ सादर करण्याचे कारण देत काही युवा कार्यकर्ते नामदार गोखले चौकात (हॉटेल गुडलक चौक) तलवारींसह दडीमध्ये शिरले. हातामध्ये तलवारी घेऊन सहभाग घेतलेल्या युवकांच्या या कृत्याबद्दल संत ज्ञानेश्वर महाराज पालखीतील वारकऱ्यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत आक्षेप घेतला. त्यामुळे झालेल्या वादावादीचा परिणाम पालखी अर्धा तास थांबून राहिली. पोलिसांनी येऊन या कार्यकर्त्यांना बाहेर काढेपर्यंत पालखी पुढे नेऊ दिली जाणार नाही, अशी भूमिका वारकऱ्यांनी घेतली. पोलिसांनी समजूत घालून कार्यकर्त्यांना बाहेर काढले आणि हॉटेल वैशाली येथे असलेली पालखी नामदार गोखले चौकाकडे मार्गस्थ झाली.
माउलींच्या पालखीसमवेत ‘प्लुटो’ची आळंदी-पुणे वारी
‘ज्ञानोबा माउली.. तुकाराम’चा जयघोष करीत आळंदी ते पंढरपूर वारीमध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी सहभागी झाले आहेत. यामध्ये ‘प्लुटो’ हा एक वारकरी सर्वाचे लक्ष वेधून घेत होता. हा प्लुटो म्हणजे ग्रह नसून हे श्वानाचे नाव आहे. गेल्या सहा वर्षांपासून प्लुटो माउलींच्या पालखी सोहळ्यात आळंदी ते पुणे या मार्गात सतीश अग्रवाल यांच्यासमवेत सहभागी होत आहे. काही भाविकांनी प्लुटोच्या गळ्यात हार घातला. अग्रवाल यांचे वडील दरवर्षी पालखीमध्ये सहभागी होत असत. त्यांच्या निधनानंतर सतीश यांनी ही परंपरा कायम ठेवत वारीमध्ये सहभागी होण्याचे ठरविले. ‘सहा वर्षांपूर्वी मी पहिल्यांदा वारीमध्ये आलो तेव्हा प्लुटो मला सोडत नव्हता. मग त्याला बरोबर घेऊन मी वारीमध्ये आलो. यापुढेही मी वारीमध्ये प्लुटोला घेऊन येणार आहे’, असे सतीश अग्रवाल यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या मुलांची आर्त हाक
‘आमच्या शेतकरी बापाने आत्महत्या केली आहे. तुम्ही ती चूक करू नका’, असा आशय असलेला फलक हाती घेतलेली नाशिक येथील आधारतीर्थ आश्रमशाळेतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले संत तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये सहभागी झाली आहेत. ‘मुख्यमंत्रीसाहेब आमच्याकडे लक्ष द्या’, अशी आर्त हाक या मुलांनी घातली. राज्याच्या विविध भागांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांची मुले नाशिकच्या आधारतीर्थ आश्रमशाळेत शिक्षण घेत आहेत. आळंदी ते पंढरपूर अशी या मुलांची दिंडी निघाली असून या िदडीचे यंदा पाचवे वर्ष आहे. ५ ते १५ वर्षे या वयोगटातील ५० मुलांचा या दिंडीमध्ये समावेश आहे. ‘शासनाने शेतकऱ्यांकडे लक्ष द्यावे, आत्महत्या हा पर्याय नाही’, असा संदेश देणाऱ्या टोप्या या छोटय़ा वारकऱ्यांनी परिधान केल्या होत्या. ‘मी चार वर्षांचा असताना माझ्या वडिलांनी आत्महत्या केली होती. आजही शेतकरी आत्महत्या करीत आहेत. सरकारने आता कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी कायमस्वरूपी निर्णय घेण्याची आवश्यकता आहे’, अशी अपेक्षा अशोक मोतीराम पाटील याने व्यक्त केली.