नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्युअरशीप अॅण्ड मॅनेजमेंट या संस्थेच्या अन्न तंत्रज्ञानविषयक व्यवस्थापन अभ्यासक्रमांविषयी..
‘नॉलेज हिअर, हॅज द फ्लेवर ऑफ सक्सेस!’ असे स्वत:चे यथार्थ वर्णन करणारी संस्था म्हणजे नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ फूड टेक्नॉलॉजी, आंत्रप्रेन्युअरशीप अॅण्ड मॅनेजमेंट (एनआयएफटीईएम). ही संस्था केंद्र सरकारच्या अन्न प्रक्रिया आणि उद्योग मंत्रालयाच्या अंतर्गत कार्यरत असणारी स्वायत्त संस्था आहे. अन्नप्रक्रिया उद्योगाशी निगडित सर्व प्रकारचे शिक्षण देणारी, संशोधन कार्यास प्रोत्साहन देणारी ही देशातील अग्रगण्य संस्था मानली जाते.
गेल्या काही वर्षांत या संस्थेने अन्नप्रक्रिया तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या क्षेत्रांतील आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ म्हणूनही ख्याती प्राप्त केली आहे. या संस्थेने अन्नविज्ञान व तंत्रज्ञान, अन्न अभियांत्रिकी, वनस्पती आणि प्राण्यांच्या अन्नासाठीचे तंत्रज्ञान, जैवरसायने व पोषण, अन्न सूक्ष्मजीवशास्त्र, अन्नप्रक्रिया उद्योजकता, अन्न परीक्षण प्रयोगशाळा, जैवप्रकिया अभियांत्रिकी, पॅकेजिंग, अन्न व्यवसाय व्यवस्थापन आणि उद्योजकता विकास, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न क्षेत्रातील कृषी आणि पर्यावरणीय बाबी, ऊर्जा व्यवस्थापन या घटकांवर आपले लक्ष केंद्रित केले आहे.
या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीमुळे या संस्थेचे अभ्यासक्रम सृजनशीलतेला चालना देणारे ठरत आहेत. ही बाब लक्षात घेऊन विद्यापीठ अनुदान आयोगाने या संस्थेस अभिमत विद्यापीठाचा दर्जा प्रदान केला आहे. देश-परदेशांतील तज्ज्ञांच्या सहकार्याने या संस्थेने आपला अभ्यासक्रम आखला आहे आणि त्यासाठी आवश्यक ठरणाऱ्या जागतिक दर्जाच्या सुविधांची निर्मिती केली आहे.
या संस्थेत आंतरराष्ट्रीय मानकानुसार तयार केलेल्या १४ भव्य संशोधन प्रयोगशाळा आणि अध्यापन केंद्रे उभारण्यात आली आहेत. ग्रामीण अर्थकारण व अर्थव्यवस्था समजावून देण्यासाठी संस्था ‘ग्राम दत्तक योजना’सारखे अभिनव उपक्रम राबवते. आंतरराष्ट्रीय शैक्षणिक आदानप्रदान उपक्रमांर्तगत विद्यार्थ्यांना परदेशातील नामांकित शैक्षणिक आणि संशोधन संस्थांमध्ये प्रशिक्षणासाठी पाठवण्यात येते. औद्योगिक इंटर्नशीप कार्यक्रमाद्वारे प्रत्यक्ष कार्यानुभव घेण्याची संधीही विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जाते. संस्थेने पाच मजली ‘नॉलेज सेंटर’ उभारले असून या क्षेत्राशी निगडित जगभरातील हजारो ग्रंथ, संशोधन साहित्य, नियतकालिके विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. प्रत्यक्ष उद्योगात महत्त्वाच्या पदांवर कार्यरत असणाऱ्या देश-विदेशातील नामांकित व्यक्तींना संस्थेत अध्यापनासाठी निमंत्रित केले जाते.
अभ्यासक्रम
या संस्थेमध्ये तीन प्रकारचे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत
* बी.टेक. (फूड टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट) या अभ्यासक्रमाचा कालावधी चार वर्षांचा आहे. या अभ्यासक्रमास MAIN या परीक्षेच्या गुणांवर आधारित प्रवेश दिला जातो. त्यासाठी ही परीक्षा देणाऱ्या उमेदवारांना संस्थेचा अर्ज स्वतंत्ररीत्या भरावा लागतो. संस्थेकडे अर्ज केलेल्या अशा उमेदवारांची गुणवत्ता यादी तयार केली जाते. त्यातून शासनाचे नियम व विविध संवर्गातील आरक्षणाचे सूत्र लक्षात घेऊन १८० पात्र उमेदवारांना प्रवेश दिला जातो. ही प्रक्रिया एनआयएफटीईएम प्रवेश कक्षाद्वारे राबवली जाते. अर्हता- बारावी विज्ञान शाखेची राज्य अथवा केंद्रीय शिक्षण मंडळाची परीक्षा भौतिकशास्त्र, जीवशास्त्र, गणित आणि रसायनशास्त्र या विषयांसह उत्तीर्ण होणे आवश्यक आहे.
पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम (एम.टेक.)- हा अभ्यासक्रम पुढील पाच विषयांत करता येतो फूड टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेंट, फूड सप्लाय अॅण्ड मॅनेजमेंट, फूड क्वॉलिटी अॅण्ड मॅनेजमेंट, फूड प्रोसेस इंजिनीअिरग अॅण्ड मॅनेजमेंट, फूड प्लान्ट ऑपरेशन्स अॅण्ड मॅनेजमेंट. प्रत्येक शाखेमध्ये प्रत्येकी १८ उमेदवारांना प्रवेश दिला जातो. या अभ्यासक्रमासाठी ग्रॅज्युएट अॅप्टिटय़ूड टेस्ट फॉर इंजिनीअर्स परीक्षेचे गुण आणि संस्थेमार्फत घेण्यात येणाऱ्या मुलाखती यांवर दिला जातो. ज्या उमेदवारांनी ‘गेट’ दिली नसेल त्यांच्यासाठी संस्थेमार्फत स्वतंत्र प्रवेश परीक्षा आणि मुलाखत घेतली जाते.
अर्हता- पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांनी चार वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम पुढील विषयांमध्ये केलेला असावा- फूड सायन्स किंवा फूड टेक्नॉलॉजी अॅण्ड मॅनेजमेट अथवा फूड प्रोसेस इंजिनीअिरग किंवा फूड टेक्नॉलॉजी अथवा डेअरी टेक्नॉलॉजी किंवा डेअरी इंजिनीअिरग अथवा अॅग्रिकल्चरल प्रोसेस इंजिनीअिरग अथवा अॅग्रिकल्चरल अॅण्ड फूड इंजिनीअिरग अथवा अॅग्रिकल्चरल इंजिनीअिरग अथवा बायोटेक्नॉलॉजी अथवा बायोकेमिकल प्रोसेस इंजिनीअिरग अथवा केमिकल इंजिनीअिरग अथवा मेकॅनिकल इंजिनीअिरग.
संशोधन (पीएच.डी)- या संस्थेने अॅग्रिकल्चर अॅण्ड एन्व्हायर्नमेंटल सायन्स, बेसिक अॅण्ड अप्लाइड सायन्सेस, फूड सायन्सेस अॅण्ड टेक्नॉलॉजी, फूड इंजिनीअिरग, फूड बिझनेस मॅनेजमेंट या विषयांमध्ये संशोधन करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
वसतिगृह- या संस्थेतील सर्व अभ्यासक्रम निवासी स्वरूपाचे आहेत. सर्व सुविधांनी युक्त असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह उपलब्ध करून देण्यात आले आहे.
संस्थेच्या परिसरातच बँक, टपाल कार्यालय आदी सुविधाही उपलब्ध आहेत.
शिष्यवृत्ती आणि अर्थसहाय्य- संस्थेतील विविध अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या उमेदवारांपकी प्रत्येकी १० टक्के गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. ‘कमवा आणि शिका’ या योजनेद्वारे गरजू उमेदवारांना आíथक साहाय्य केले जाते.
करिअर संधी – ही संस्था केंद्र सरकारची शिखर संस्था असल्याने या संस्थेचे देश-परदेशातील संबंधित क्षेत्रांतील महत्त्वाच्या उद्योगांशी निकटचे संबंध आहेत. त्यामुळे संस्थेच्या पदवी, पदव्युत्तर पदवी आणि पीएच.डी प्राप्त केलेल्या उमेदवारांना उत्तमोत्तम करिअरच्या संधी प्राप्त होतात. या उमेदवारांची निवड गुणवत्ता नियंत्रण अधीक्षक, उत्पादन विकास संशोधक, अन्न सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ, अन्न विश्लेषक, अन्नप्रक्रिया अभियंते, अन्नघटक व्यवस्थापक, अन्न नियामक कार्य विशेषज्ञ, पोषण विशेषज्ञ, अन्नप्रक्रिया (शीत व इतर पेये, दुग्धजन्य पदार्थ, स्नॅक्स, वायनरी) उद्योगातील तंत्रज्ञ, अन्न सेवा क्षेत्र, पुरवठा साखळी, कापणीपश्चातचे उद्योग, अन्न किराणा साखळी व्यवसाय, अन्न नियंत्रक, आरोग्यसेवा पुरवठादार आणि उच्च शिक्षितांसाठी अध्यापन अशा विविध क्षेत्रांत अथवा पदांवर होऊ शकते.
संपर्क: प्लॉट नंबर-९७, सेक्टर- ५८, एचएसआयआयडीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, कुंडली, जिल्हा- सोनिपत, हरियाणा- १३१०२८. संकेतस्थळ- http://www.niftem.ac.in
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा