डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नवनव्या करिअर संधींची ओळख..
डिजिटल मार्केटिंगमुळे खऱ्या अर्थाने जग एक खेडे झाले असून वैश्विकीरणास नेमका अर्थ प्राप्त झाला आहे. पुढील काही वर्षांत डिजिटलायझेशन मोठय़ा प्रमाणावर होणार आहे. डिजिटल मीडिया वापरकर्त्यांचा ऑनलाइन मार्केटिंगचा कल, ओढा आणि आवड लक्षात घेऊन विविध कंपन्या आपल्या व्यूहनीती तयार करत आहेत. जीवनातील प्रत्येक घटकाशी निगडित मोबाइल अॅप्स नित्य तयार केले जात असल्याने डिजिटल मार्केटिंगच्या क्षेत्रास आणखी गती प्राप्त झाली आहे. भारतासारख्या देशात ऑनलाइन माध्यमाला पसंती देणाऱ्या ५० टक्के नागरिकांनी ऑनलाइन वृत्तपत्रे वाचायला सुरुवात केल्याचेही एका सर्वेक्षणात आढळून आले आहे.
डिजिटल मार्केटिंगमधील करिअरच्या संधी अधिकाधिक विस्तारत आहेत. तज्ज्ञांच्या मते, २०२० पर्यंत देशाच्या एकूण सकल उत्पादनाच्या ४ टक्के गतीने इंटरनेटविषयीचे अर्थकारण वाढण्याची शक्यता आहे. ही गती लक्षात घेता भारतीय इंटरनेट अथवा डिजिटल मार्केट हे अमेरिका, जपान, युरोपिअन संघ यांसारख्या प्रगत देशांच्या आसपास पोहोचण्याची क्षमता राखून आहे, असे तज्ज्ञांना वाटते. या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरावर सध्या चार ते पाच लाख मनुष्यबळ कार्यरत आहे. पुढील दोन वर्षांत ही संख्या १८ लाखांपर्यंत पोहोचू शकते.
ऑनलाइन खरेदी-विक्रीकडे ग्राहकांचा कल वाढू लागल्याने डिजिटल मार्केटिंग क्षेत्राचा विस्तार वाढत आहे. कोणत्याही शाखेतील पदवीधर व्यक्तीला डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात पाऊल ठेवता येणे शक्य आहे. या उमेदवारांना सांख्यिकी, अर्थशास्त्र, ई-कॉमर्स आणि कलात्मक दृष्टिकोन याची जाणीव व माहिती असावी. मात्र, तंत्रज्ञान आणि मार्केटिंग या विषयातील पदवी अथवा पदव्युत्तर पदवीधरांना या क्षेत्रात करिअरच्या अधिकाधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. ही बाब लक्षात घेऊन काही संस्थांनी डिप्लोमा इन डिजिटल मार्केटिंग, एक्झिक्युटिव्ह प्रोग्रॅम इन डिजिटल मार्केटिंग, एम.एस्सी इन डिजिटल मार्केटिंग यांसारखे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. या क्षेत्रात दाखल होणाऱ्या उमेदवाराला संगणकीय ज्ञान आणि इंटरनेट वापर उत्तमरीत्या जमणे आवश्यक ठरते. संगणक आणि मार्केटिंगचे ज्ञान प्राप्त केलेले बारावी उत्तीर्ण विद्यार्थीही या क्षेत्रात
येऊ शकतात.
या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना इंटरनेटच्या माध्यमातून कंपनीच्या वस्तूंच्या आणि उत्पादनांच्या विक्रीसाठी व ब्रँिडगसाठी नावीन्यपूर्ण, सर्जनशील मोहीम राबवता यायला हवी. ही मोहीम प्रभावी, सुस्पष्ट आणि ग्राहकांना आकर्षति करणारी असावी. त्यासाठी उमेदवारांना ग्राहकांच्या गरजा आणि आवश्यकतांचा अभ्यास असणे आवश्यक ठरते.
सोशल मीडियातील इन, मोबाइल मार्केटिंग, डिस्प्ले मार्केटिंग, फेसबुक, ई-मेल मार्केटिंग, सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन) विविध साधनांचा वापर प्रभावीरीत्या करण्याचे तंत्र या उमेदवारांनी आत्मसात करणे गरजेचे आहे. याद्वारे विविध वयोगटातील सामाजिक, आíथक आणि शैक्षणिक स्तरातील ग्राहक कंपनीच्या माहितीकडे आणि उत्पादनाकडे आकर्षति होणे अपेक्षित आहे.
इंटरनेट माध्यमाच्या उपयोग करून ई-जनसंपर्क अधिकाधिक वाढवण्याकडे अनेक कंपन्यांचा कल दिसून येतो. त्याद्वारे ब्रँड प्रमोशन उत्तमरीत्या साध्य होते, असे मानले जाते. यामुळे डिजिटल मार्केटिंग क्षेत्राने उंच भरारी घेत आहे. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील कंपन्यांना त्यांच्या अधिकाधिक जाहिरातीसुद्धा ऑनलाइन करण्याची गरज असल्याचे लक्षात आले आहे. ऑनलाइन जाहिरातींमुळे ग्राहक चटकन ऑनलाइन शॉिपगकडे आकर्षति होत असल्याचे दिसून येते. वस्तूंच्या अथवा उत्पादनांच्या खरेदीवर मोठी सवलत असल्याचे या ऑनलाइन जाहिरातींमध्ये नमूद असल्यास ग्राहक त्या जाहिरातीवर क्लिक करतात आणि ते थेट कंपनीच्या संकेतस्थळावर पोहोचतात. ऑनलाइन जाहिराती पारंपरिक जाहिरातींपेक्षा अधिक प्रभावी असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.
सध्या पारंपरिक मार्केटिंगच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या उमेदवारांना यापुढे त्यांच्या क्षेत्रापेक्षा डिजिटल मार्केटिंग क्षेत्रात अधिक संधी उपलब्ध होऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील संधी दिवसेंदिवस वाढत जाणारी असून त्या दृष्टीने या क्षेत्राशी निगडित तंत्रकौशल्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना या क्षेत्रात उत्तम करिअर करता येईल. डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील कंपन्यांनी गेल्या काही वर्षांत १५ हजारांहून अधिक वेगवेगळ्या प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध करून दिल्या आहेत.
भारत हा वेगाने इंटरनेट मार्केटिंगच्या दिशेने घोडदौड करत आहे. ही बाब लक्षात घेऊन केंद्र सरकारनेसुद्धा ‘डिजिटल इंडिया’ मोहीम राबवायची निश्चित केली आहे. ई-गव्हर्नन्समध्ये नागरिकांचा सहभाग वाढावा याकरता ही मोहीम राबवण्यात येत आहे. त्यामुळे आता हे क्षेत्र केवळ मार्केटिंग आणि ब्रँड प्रमोशनपुरते मर्यादित राहिले नसून त्याचा विस्तार इतर क्षेत्रांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही बाब लक्षात घेतली तर या क्षेत्रातील करिअरच्या संधी किती दुणावतील ते ध्यानात येते.
या क्षेत्रातील तंत्रकौशल्य प्राप्त करणाऱ्या उमेदवारांना केवळ नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत, असे नव्हे तर ते उद्योजकही बनू शकतात. या क्षेत्रात अभियांत्रिकी, कला, वाणिज्य किंवा विज्ञान अशा सर्व शाखांतील विद्यार्थी करिअर करू शकतात.
(पूर्वार्ध)
डिजिटल मार्केटिंग
डिजिटल मार्केटिंग क्षेत्रातील नवनव्या करिअर संधींची ओळख..
Written by सुरेश वांदिले
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 13-05-2016 at 05:02 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Digital marketing