सागरी जैवशास्त्राशी संबंधित विविध अभ्यासक्रमांची सविस्तर माहिती आणि करिअर संधींची ओळख..
सागरी जैवशास्त्राअंतर्गत समुद्री पर्यावरणात अंतर्भूत होणाऱ्या प्रत्येक घटकाचा अभ्यास केला जातो. त्यात समुद्री जलचरांचा आणि वनस्पतींचाही समावेश होतो. समुद्री परिसंस्था, समुद्री सस्तन प्राणी, अॅक्वाकल्चर, समुद्राचे रासायनिक आणि पदार्थविज्ञानविषयक गुण आणि पाणथळ जागा आदी स्पेशलायझेशनची क्षेत्रे आहेत. जलपर्यावरणावर मानवी व्यवहारांचे होणारे परिणाम, सागरी जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन या विषयाचा अभ्यास केला जातो.
या क्षेत्रात करिअर करण्यासाठी उमेदवाराने किमान जीवशास्त्रात किंवा मरिन सायन्समध्ये एम.एस्सी अथवा पदव्युत्तर पदवी घेतलेली असावी. मात्र, बारावीमध्ये विज्ञानशाखेत जीवशास्त्र विषय असणे आणि जीवशास्त्रातून पदवी प्राप्त करणे आवश्यक आहे. पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांतर्गत ओशनोग्राफी, फिशरीज टेक्नॉलॉजी, सागरी जैवशास्त्र, सागरी प्राणिशास्त्र यांसारख्या विषयांमध्ये स्पेशलायझेशन तसेच पीएच.डी करता येते. यामध्ये मॉलिक्युलर बायोलॉजी, अॅक्वाकल्चर जेनेटिक्स, मरिन फिजिओलॉजी, मरिन मॅमोलॉजी, मरिन पोल्युशन, मरिन इकोसिस्टीम्स,
कोरल रीफ इकोलॉजी, केमिकल इकोलॉजी या विषयांचा समावेश आहे.
करिअर संधी : सागरी जीवसृष्टीविषयी आस्था असणाऱ्या उमेदवारांना या ज्ञानशाखेचा अभ्यास करणे आनंददायी ठरू शकते. या ज्ञानशाखेतील विद्यार्थ्यांना अधिकाधिक वेळ सागरकिनारे आणि प्रत्यक्ष सागरावर व्यतीत करावा लागतो. सागराच्या अंतर्गत भागात जाऊन संशोधन करावे लागते. सागरी जैवशास्त्रज्ञांना शासकीय संस्था, संशोधन प्रयोगशाळा, मत्स्यालये, अध्यापन, सागरी पर्यावरणशास्त्रज्ञ अशा विविध करिअर संधी मिळू शकतात. ओशनोग्राफी केंद्रे, संशोधन बोटी आणि पाणबुडय़ा येथे काम करता येते. सागरी पर्यावरण, प्रदूषण आणि जैवविविधता कार्यक्षेत्रात कार्यरत असणारी मंडळे, स्वयंसेवी संस्था, औषधनिर्मिती कंपन्या यांच्यासोबत संशोधन प्रकल्प राबवता येतात.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा