मानव्यशास्त्राशी निगडित विषयांमध्ये नव्या करिअर संधी निर्माण होत आहेत. या संबंधित विविध अभ्यासक्रमांची व संधींची माहिती..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडच्या काळात मानव्यशास्त्राशी संबंधित वेगवेगळ्या विषयांतील तज्ज्ञांची गरज वाढत असल्याने  या ज्ञानशाखेतील विषयांत कल आणि गती असणाऱ्या विद्यार्थी संबंधित अभ्यासक्रमांकडे वळण्याचा पर्याय स्वीकारत आहेत. मानव्यशास्त्र या ज्ञानशाखेत भाषा, इतिहास, राज्यशास्त्र, तत्त्वज्ञान, अर्थशास्त्र, साहित्य, उपयोजित कला यांसारख्या विषयांचा समावेश होतो. या ज्ञानशाखेतील पदवी-पदव्युत्तर स्तरावरील विविध अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहेत. यातील विषयांशी संबंधित उच्चशिक्षण आणि संशोधनाची क्षेत्रे आज मोठय़ा प्रमाणावर विकसित होत आहेत. या ज्ञानशाखेत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना पुढील क्षेत्रांत करिअरच्या उत्तम संधी प्राप्त होऊ शकतात.

* नागरी सेवा- एखाद्या विषयात बीए-एमए अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांचा संबंधित विषयाचा सखोल अभ्यास होतो. त्याचा उपयोग नागरी सेवा परीक्षेच्या पूर्व आणि मुख्य परीक्षेसाठी होऊ शकतो. त्याशिवाय मुलाखतीच्या वेळेसही त्यांना लाभ होतो. * पत्रकारिता आणि जनसंपर्क- बहुतांश पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम इंग्रजी अथवा मराठी भाषेत करता येत असल्याने या दोन वर्षांत विद्यार्थ्यांच्या भाषा आणि संबधित विषयाच्या कौशल्यात वाढ होऊ शकते. लेखनकौशल्य विकासातही ते साहाय्यकारी ठरते. या ज्ञानाचा उपयोग पत्रकारिता आणि जनसंपर्क या क्षेत्रात करिअर करण्यासाठी होऊ शकतो. * आंतरराष्ट्रीय संघटना- युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड), यूएनडीपी (युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोजेक्ट), डब्ल्यूएचओ (वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन) यांसारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांना डेव्हलपमेंट स्टडीज या विषयांमध्ये पदव्युत्तर पदवी अथवा अधिक प्रगत अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांची गरज भासते. या संस्थांच्या विविध विकासविषयक कामांचे प्रकल्प प्रमुख, उपक्रम संचालक अशा पदांवर नियुक्ती मिळू शकते. * स्वंयसेवी संस्था- जगभरातील विकसनशील देशांमध्ये समाजातील उपेक्षित आणि संकटांचा सामना करणाऱ्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक स्वयंसेवी संस्था कार्यरत आहेत. या संस्थांमार्फत दीर्घ आणि अल्प कालावधीचे वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. अनेक प्रकारची सांख्यिकी माहिती गोळा केली जाते. यासाठी डेव्हलपमेंट स्टडीज, समाजशास्त्र आणि सामाजिक कार्य, अर्थशास्त्र यांसारख्या विषयात पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम केलेल्या विद्यार्थ्यांना करिअर करण्याची संधी मिळू शकते. =सल्लासेवा संस्था- अशा संस्था देश-विदेशातील विविध सरकार, संस्था, संघटना, उद्योग यांच्यासाठी नियमितरीत्या कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे सर्वेक्षण आणि विश्लेषण करत असतात. त्यांच्या अहवालांवर आधारित विविध धोरणे आखली जातात, निर्णय घेतले जातात. अशा कंपन्यांना अर्थशास्त्र, समाजशास्त्र, सांख्यिकी आदी विषयांतील पदवुत्तर पदवी अथवा संशोधन कार्य केलेल्या युवावर्गाची सातत्याने गरज भासत असते. =संशोधन कार्य- जागतिक स्तरावर मानव्यशास्त्र या ज्ञानशाखेतील विविध विषयांमध्ये प्रगत संशोधनाला चालना देण्यात आली आहे. परदेशातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये अशा संशोधन कार्याला प्रोत्साहन दिले जाते. बहुशाखीय संशोधन कार्य हे वेगवेगळ्या विकासात्मक योजना, निर्णय आदी बाबींसाठी उपयुक्त ठरत असल्याचेही दिसून येते.

काही अभ्यासक्रम :

टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्स : या संस्थेच्या तुळजापूर, हैदराबाद आणि गुवाहाटी या कॅम्पसमध्ये बी.ए- एम.ए. इन सोशल सायन्स हा पाच वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. या संस्थेचा बी.ए. (ऑनर्स) इन सोशल सायन्स विथ स्पेशलायझेशन इन रुरल डेव्हलपमेंट हा ३ तीन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. दोन्ही अभ्यासक्रमांसाठी अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी उत्तीर्ण. या अभ्यासक्रमास चाळणी परीक्षेद्वारे प्रवेश दिला जातो. यंदा ही परीक्षा १४ मे २०१६ रोजी घेतली जाणार आहे.

संस्थेच्या स्कूल ऑफ डेव्हलपमेंट स्टडीजने, मास्टर्स प्रोग्रॅम इन डेव्हलपमेंट स्टडीज आणि मास्टर्स प्रोग्रॅम इन विमेन स्टडीज हे दोन अभ्यासक्रम सुरू केले आहेत. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. या दोन्ही विषयांमध्ये एम.फिल आणि पीएच.डी. करण्याची संधीसुद्धा उपलब्ध करून देण्यात येते.

संपर्क- टाटा इन्स्टिटय़ूट ऑफ सोशल सायन्सेस, व्ही. एन. पुरव मार्ग, मुंबई- ४०००८८. संकेतस्थळ- www.tiss.edu

डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट : या संस्थेने पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन डेव्हलमेंट मॅनेजमेंट हा दोन वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील ५० टक्के गुणांसह पदवी. अनुसूचित जाती आणि जमाती संवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ४५ टक्के गुण आणि CAT/ MAT/ XAT/ CMAT/ ATMA यांपकी कोणत्याही एका परीक्षेमध्ये सुयोग्य गुण प्राप्त करणे आवश्यक. प्रवेशासाठी संस्थेमार्फत डेव्हलमेंट मॅनेजमेंट टेस्ट, मुलाखत आणि समूह चर्चा घेतली जाते. या तीनही घटकांना प्रत्येकी २५ टक्के वेटेज देण्यात येते. CAT/ MAT/ X AT/ CMAT/ ATMA यांपकी कोणत्याही एका परीक्षेतील गुणांना २५ टक्के वेटेज देण्यात येते.

संपर्क- डेव्हलपमेंट मॅनेजमेंट इन्स्टिटय़ूट, दुसरा मजला, उद्योग भवन, पूर्व गांधी मदान, पाटणा- ८००००४. संकेतस्थळ- www.dmi.ac.in  ई-मेल- admissions@dmi.ac.in

ज्युनिअर रीसर्च फेलोशिप

फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी या संस्थेमार्फत ज्युनिअर रिसर्च फेलोशिप ही शिष्यवृत्ती योजना राबवली जाते. ही केंद्र सरकारच्या अखत्यारीतील ‘डिपार्टमेंट ऑफ स्पेस’ अंतर्गत कार्यरत असणारी महत्त्वाची संस्था आहे. याची स्थापना १९४७ साली डॉ. विक्रम सारभाई यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. प्लॅनेटरी सायन्स, जिओसायन्स, थिअरॉटिकल फिजिक्स, अ‍ॅस्ट्रोकेमिस्ट्री, ऑप्टिकल फिजिक्स, अ‍ॅटोमिक अ‍ॅण्ड मॉलेक्युलर फिजिक्स, स्पेस अ‍ॅण्ड अ‍ॅटमोस्फेरिक सायन्सेस, सोलर फिजिक्स, अ‍ॅस्ट्रोफिजिक्स, अ‍ॅस्ट्रोनॉमी या विषयांमध्ये पीएच.डी. करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येते. या अभ्यासक्रमास प्रवेश मिळालेल्या उमेदवारांना अभ्यासक्रमाच्या कालावधीत दरमहा प्रारंभीची दोन वष्रे २५ हजार रुपये आणि त्यानंतरची दोन वष्रे दरमहा २८ हजार रुपये शिष्यवृत्ती दिली जाते. अर्हता- इच्छुक उमेदवारांनी ६० टक्के गुणांसह फिजिक्स, केमिस्ट्री, जिऑलॉजी, जिओफिजिक्स, ओशन सायन्स, अ‍ॅटमोस्फेरिक सायन्स, स्पेस सायन्स अणि एनव्हायरॉन्मेंटल सायन्स या विषयामध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केलेली असावी. याशिवाय नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट-ज्युनिअर रिसर्च फेलोशीप (डिसेंबर २०१४/ जून २०१५/ डिसेंबर २०१५) किंवा ग्रॅज्युएट अ‍ॅप्टिटय़ूड टेस्ट इन इंजिनीअिरग (२०१४/ २०१५/ २०१६) किंवा जॉइंट एन्ट्रन्स स्क्रीिनग टेस्ट २०१६ यापकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. संपर्क- फिजिकल रिसर्च लेबॉरेटरी, नवरंगपुरा, अहमदाबाद- ३८०००९.

संकेतस्थळ- www.prl.res.in

आरोग्यविषयक नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम

नवी दिल्ली येथील नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हेल्थ अ‍ॅण्ड फॅमिली वेल्फेअर या संस्थेने एक वर्ष कालावधीचे नावीन्यपूर्ण दूरशिक्षणातील अभ्यासक्रम सुरू केले आहेत. यामध्ये पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन-हेल्थ कम्युनिकेशन, पब्लिक हेल्थ न्युट्रिशन, हेल्थ प्रमोशन, हेल्थ अ‍ॅण्ड फॅमिली वेल्फेअर मॅनेजमेंट, हॉस्पिटल मॅनेजमेंट या अभ्यासक्रमांचा समावेश आहे. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी. अर्ज ३१ मे २०१६ पर्यंत करावा. संकेतस्थळ- www.nihfw.org

मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Opportunities in human sciences