मुंबईमधील कोळीवाडय़ांचे अनेक प्रश्न प्रलंबित राहिले आहेत. आजही अनेक नागरी सुविधा येथील रहिवाशांना मिळत नाहीत.  या कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासात सीआरझेड अडसर ठरला आहे. चेन्नई, केरळ आणि ओरिसामधील खासदारांनी तेथील कोळीवाडय़ांना सीआरझेडमधून सूट मिळवून दिली, पण गेली अनेक वर्षे मुंबईतून लोकसभेत गेलेल्या काँग्रेसच्या खासदारांना हे काम करता आले नाही. त्यामुळे सीआरझेडमध्ये सूट मिळवून कोळीवाडय़ांच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा करण्याचे ऐतिहासिक काम आम्ही  एकत्रितपणे करू. त्याचबरोबर मुंबईला सुंदर असा समुद्रकिनारा लाभला असला तरी जुहू, दादर, माहीम चौपाटीवर आज कोणत्याच सुविधा नाहीत. या समुद्रकिनाऱ्यांवर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध करण्यासाठी, तसेच त्यांच्या सुशोभीकरणासाठी केंद्रातून विशेष निधी मिळविण्याचे प्रयत्न केले जातील.
 रेल्वे सेवेत सुधारणा करण्याच्या दृष्टीने उपनगरीय रेल्वे महामंडळाची स्थापना करण्यात आली होती. मात्र या महामंडळाकडे निधीच नसल्याने ते निरुपयोगी ठरले आहे. या महामंडळाला अधिक कार्यक्षमतेने काम करता यावे यासाठी प्रयत्न करणार आहे.
 प्रवाशांच्या आरोग्याचा विचार करता रेल्वे स्थानकाजवळ रुग्णवाहिका असणे गरजेचे आहे. हा विचार करून राज्य सरकारने रेल्वेला २५ रुग्णवाहिका देण्याची घोषणा केली. पण त्यापैकी १० रुग्णवाहिका उपलब्ध झाल्या आहेत. उर्वरित रुग्णवाहिका रेल्वेला कधी मिळणार? प्रत्येक रेल्वे स्थानकावर वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे अवघड आहे. पण किमान चार-पाच स्थानकांचा समूह करून तेथे तातडीची वैद्यकीय सेवा देण्यासाठी रुग्णवाहिका तैनात करणे आणि त्यासाठी जागा देणे गरजेचे आहे.  हे सर्व प्रश्न धसास लावणार आहे.
रेल्वेचे  प्रश्न सोडविण्यासाठीच मी आग्रहाने रेल्वेच्या स्थायी समितीचे सदस्यत्व मागून घेतले आहे. अर्थसंकल्पापूर्वी रेल्वेचे सर्व प्रश्न मांडता यावेत यासाठी मुंबईतील सर्व खासदारांची एक बैठक घ्यावी, अशी विनंती रेल्वेमंत्र्यांना करण्यात आली आहे. या बैठकीत आम्ही आमच्या मागण्या मांडू आणि आगामी अर्थसंकल्पात मुंबईसाठी निधीची तरतूद करण्यास भाग पाडू.
*रेल्वेच्या फलाटांच्या उंचीचा प्रश्न सोडवणार
*रेल्ववरील कमकुवत पुलांचा प्रश्न धसास लावणार
*संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडवणार
*मुंबईसाठी अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करणार
*नोकरभरतीत भूमिपुत्रांना न्याय मिळवून देणार

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा