आताच्या डबिंगच्या जमान्यात संगीतकाराखेरीज, कुणाचीच भेट होत नाही. त्यामुळे लक्षात राहावं असं काही घडतही नाही. पण कधी तरी असंही घडतं की एखाद्या निर्मात्याच्या साधेपणामुळे, नम्रतेमुळे किंवा त्याच्या अगत्यामुळे रेकॉर्डिग होऊन काही वर्षे उलटली, तरी त्यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहतात. अशाच एका तरुण निर्मात्याचा हा अनुभव!

मुंबई चित्रपटसृष्टीमध्ये, साधारण १९९०च्या आधी जवळजवळ सर्व स्टुडिओत लाइव्ह रेकॉर्डिग्ज होत असत. म्हणजे एकाच वेळी गायक गाताएत, वादक वाजवताएत आणि रेकॉर्डिस्ट रेकॉर्डिग करताएत. ते चालू असताना एखाद्याची जरी चूक झाली तरी पूर्ण गाणं सुरवातीपासून गावं लागे. त्यात वेळ खूप जाई. श्रमही जास्त लागत. पण त्या वेळी गायकाचा खरा कस लागे. प्रॅक्टिस करून गाणी रेकॉर्ड केली जात त्यामुळे रिझल्टही चांगला मिळे, पण साधारण नव्वदनंतर मात्र ट्रॅक सिस्टीम सुरू झाली. म्हणजे आधी म्युझिक ट्रॅक तयार करायचा आणि मग गायक, गायिकांना बोलावून त्यांचा आवाज मध्ये मध्ये भरायचा (म्हणजेच डबिंग). यात श्रम, वेळ वाचायला लागला. गाणं तुकडय़ा तुकडय़ांनी किंवा अगदी एकेक ओळ घेऊनसुद्धा रेकॉर्ड केलं जाऊ लागलं. यात गायकांचं काम सोप्पं झालं. वेळ वाचू लागला. पण त्यामुळे आम्ही सर्वच गायक  या सिस्टीमवर फारच विसंबून राहू लागलो. आता एखाद्या वेळी जरी पूर्ण गाणं सलग ‘लाइव्ह’ गाण्याची वेळ आली, तर सर्वच गायक, गायिकांना ते जड जातं! पूर्वीच्या लाइव्ह रेकॉर्डिग्जना वेळ जरी जास्त लागत होता, तरी निर्माते, वादक, कवी, अरेंजर संगीतकार या सर्वाची बराच वेळ भेट होत असे. सहवासामुळे कित्येक किस्से, आठवणी असत. आता या डबिंगच्या जमान्यात संगीतकाराखेरीज कुणाचीच भेट होत नाही. त्यामुळे लक्षात राहावं असं काही घडतही नाही. आता तर कित्येक वेळा सीडीचा किंवा चित्रपटाचा निर्माता कोण आहे, हे सुद्धा ठाऊक नसतं. पण अलीकडच्या काळात कधी तरी असंही घडतं की एखाद्या निर्मात्याच्या साधेपणामुळे, नम्रतेमुळे किंवा त्याच्या अगत्यामुळे रेकॉर्डिग होऊन काही वर्षे उलटली, तरी त्यांच्याशी अगदी जिव्हाळ्याचे संबंध राहतात. ३/४ वर्षांपूर्वी अशाच एका निर्मात्याचा मला आलेला हा अनुभव!

‘‘नमस्कार उत्तराजी! मी औरंगाबादहून वरुण सोनी बोलतोय. मी एक  सीडी बनवतोय. त्यात मला तुमच्या आवाजात काही गाणी करायची आहेत. संगीतकार इथलेच आहेत. रेकॉर्डिगसुद्धा औरंगाबादमध्येच करायचे आहे, पुढल्या महिन्यात! तेव्हा तुम्ही प्लीज गाल का?’’ पलीकडून एक व्यक्ती अत्यंत नम्र आणि अदबीनं हिंदीत विचारत होती. व्यवहाराचं ठरल्यावर मी त्यांना म्हटलं, ‘‘वरुणजी, पुढच्या महिन्यात करायचंय ना रेकॉर्डिग, मग त्याच्या आधी मला जरा चाली पाठवाल का? तसंच मुंबई-औरंगाबाद फर्स्ट क्लास स्लीपरचे तिकीट आणि औरंगाबाद-मुंबई एसी चेअरकारचं कन्फर्म तिकीट पाठवा. रात्रीचा प्रवास करून मी सकाळीच औरंगाबादला येईन. दहा -साडे दहा साडे दहाला रेकॉर्डिग सुरू करू. रेकॉर्डिग संपल्यावर मी दुपारच्याच गाडीने निघून रात्रीपर्यंत मुंबईला परतेन. सकाळी पोचल्यावर मात्र, तयार होण्यासाठी एखाद्या चांगल्या हॉटेलात रूम बुक करा.’’ त्यांनी सर्व मान्य केलं. ठरल्याप्रमाणे चाली आणि तिकीट पाठवले. पण परत येण्याचं तिकीट मात्र वेटिंगलिस्टवर होतं! वरुणजींनी सांगितलं, ‘‘उत्तराजी! काही काळजी करू नका. मी तुमचं तात्काळमध्ये परत येतानाचं तिकीट करून देईन.’’

ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर मी औरंगाबादला पोहोचले. वरुणजी स्वत: मला घ्यायला येणार होते. ट्रेनमधून उतरल्या उतरल्या एका १६/१७ वर्षांच्या मुलानं माझं हसून स्वागत करून, माझ्या हातात फुलांचा गुच्छ ठेवला. मी विचारलं, ‘‘प्रोडय़ुसर कुठे आहेत? ते येणार होते ना स्टेशनवर? माझं तसं बोलणंही झालंय त्यांच्याशी फोनवर!’’ यावर तो मुलगा हसून म्हणाला, ‘‘अहो मीच आहे प्रोडय़ुसर!’’ मी अवाक्  झाले! एवढा छोटासा  मुलगा.. थेट प्रोडय़ुसर! त्याला आपल्या आजीने लिहिलेली गाणी रेकॉर्ड करायची होती. बाहेर गाडी तयारच होती. लगेचच आम्ही हॉटेलवर पोहोचलो. सुपर डिलक्सच्या ऐवजी डिलक्स रूम दिली म्हणून वरुण रिसेप्शनच्या माणसाशी हुज्जत घालत होता. मी म्हटलं, ‘‘काही हरकत नाही, डिलक्स रूमही चांगलीच आहे. सर्व सोयी आहेत इथे! आणि दोन-अडीच तासांचा तर प्रश्न आहे!’’

मग वरुण माझा निरोप घेऊन दहाच्या सुमारास न्यायला येतो, असं सांगून निघाला. मी जरा निवांत बसले. मग आटपून, रियाज करून नाश्ता मागवावा या विचारात असतानाच दारावरची बेल वाजली. दार उघडलं तर, दारात वरुण आणि त्याची आजी! मी आश्चर्याने विचारलं, ‘‘इतक्या लवकर न्यायला आलात? माझा अजून नाश्तादेखील झाला नाही.’’ त्यावर त्याच्या आजी म्हणाल्या, ‘‘अहो तुमच्यासाठी घरून नाश्ता घेऊनच आम्ही आलोय.’’ हे ऐकल्यावर तर मला त्यांची कमालच वाटली. म्हटलं, ‘‘अहो आजी! मी हॉटेलातच काही मागवलं असतं ना!’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘नाही, नाही! तुम्हाला गायचंय, हॉटेलातलं कशाला, त्यापेक्षा साजूक तुपातला घरचा नाश्ता आणलाय आम्ही तुमच्यासाठी!’’ स्टीलच्या कोऱ्या डब्यातून त्यांनी माझ्यासमोर प्लेटमध्ये गरम गरम उपमा, वर काजू, बदाम, बेदाणे पेरले आणि भरपूर सुकामेवा घातलेला गाजर हलवा ठेवला. त्यानंतर वाफाळलेला मसाला चहा मला दिला. मी म्हटलं, ‘‘अहो केवढं आणलंय तुम्ही! रेकॉर्डिगच्या आधी एवढं भरपेट खायची सवय नाही मला! आणि कशाला इतका त्रास घेतलात?’’ त्यावर त्या म्हणाल्या, ‘‘त्रास कसला? तुम्हाला पाहिजे तेवढंच घ्या. मी कुसुम सोनी, वरुणची आजी! वरुणने माझी गाणी रेकॉर्ड करण्याचा हट्टच धरलाय, त्यामुळे माझा नाइलाज झाला. माझा नातू अभ्यासात, खेळात सगळ्यात खूप हुशार आहे अगदी!’’ त्या अभिमानाने सांगत होत्या.

मी म्हटलं, ‘‘चांगलंच आहे ना! एक नातू आपल्या आजीवरच्या प्रेमाखातर सीडी करतोय!’’ कुसुम सोनी म्हणजे एक प्रसन्न व्यक्तिमत्त्व होतं! ७०/७५ वर्षांच्या त्या बाई अस्सल खानदानी वाटत होत्या. बॉबकट, पंजाबी ड्रेस शोभून दिसत होता त्यांना! मारवाडी असूनसुद्धा मराठी अस्खलित बोलत होत्या. या वयातही घरचा व्यवसाय आपल्या मुलांबरोबर सांभाळत होत्या! श्रीमंतीचं आणि शिक्षणाचं तेज त्यांच्या चेहऱ्यावर विलसत होतं. नाश्ता झाल्यावर ते दोघं निघाले आणि साडेदहापर्यंत न्यायला येतो असं त्यांनी सांगितलं.

ठरलेल्या वेळी ते दोघं मला स्टुडिओत घेऊन जाण्यासाठी आले. स्टुडिओत पोचल्यावर लगेचच रेकॉर्डिगला सुरुवात झाली. संगीत दिग्दर्शक आणि मी एकेक गाणं पक्कं करत होतो. रेकॉर्डिग सुरू झाल्यावर वरुण मधूनच माझे उत्साहाने फोटो काढत होता. मधूनच कॅमेराने आजीचे प्रसन्न भाव टिपत होता. रेकॉर्डिग चालू झालं हे बघूनच तो खूप खूश होता. मधून मधून मला चहाकॉफी विचारत होता. तर मध्येच बाहेर जाऊन कॉम्प्युटरवर माझं परतीचं तिकीट कन्फर्म करण्याचा प्रयत्न करत होता. खूप धांदल चालली होती त्याची!

दुपारचे अडीच वाजले. रेकॉर्डिग संपलं. सर्व गाणी ओके झाली. मग फोटो काढले गेले. जेवायचा आग्रह झाला. पण जेवायला वेळच नव्हता, कारण दुपारचीच माझी गाडी होती. तितक्यात वरुणने माझे तिकीट तात्काळमध्ये कन्फर्म झाल्याचं सांगितलं. त्याने तिकीट माझ्या मोबाइल फोनवर पाठवलं होतं. मी आश्चर्याने आणि अज्ञानानं म्हटलं की, ‘‘असं मोबाइलवरचं तिकीट चालेल टीसीला?’’ त्यावर तो म्हणाला, ‘‘हो चालेल ना. आता ही नवीन पद्धत आहे.’’ पण मी अस्वस्थ वाटताच, तो म्हणाला, ‘‘उत्तराजी! काळजीचं काहीच कारण नाही. मी येतो ना तुमच्याबरोबर. हे तिकीट दाखवू टीसीला आणि टीसी नाही भेटला, तर तो भेटेपर्यंत मी तुमच्याबरोबर राहीन. अगदी गाडी सुरू झाल्यावर जरी टीसी भेटला ना तरी त्याला तिकीट दाखवून पुढे जे स्टेशन येईल तिथे मी उतरेन.’’ एवढा दिलासा दिल्यावर मी शांत बसले. निघताना त्याने माझ्या हातात काही गिफ्टस् ठेवल्या. त्याच्या गाडीत बसून आम्ही स्टेशनवर आलो. माझी बॅग त्याने स्वत: एसी चेअरकारमध्ये ठेवली. मी माझ्या जागेवर बसले. तेवढय़ात टीसीही आला. त्याला मोबाइल फोनवरचं तिकीट दाखवलं. ते चेक झाल्यावर वरुणने हसून माझ्याकडे बघितलं. माझ्या हातात एक पार्सल देऊन तो खाली उतरला. ट्रेन निघाली आणि मी त्याचा निरोप घेतला. पाच मिनिटांनी मी पार्सल उघडलं. त्यात एक मोठं ग्रिल्ड सॅण्डविच आणि मिल्क शेकचं पाऊच होतं. मला जेवायला वेळ मिळाला नाही, म्हणून हॉटेलातून पार्सल मागवून वरुणने ते मला दिलं होतं. केवढी ही समज! आणि ती ही एवढय़ा कमी वयात! खरोखरच कौतुक वाटलं मला त्याचं.

वाटलं, खानदानी श्रीमंतीत वाढलेला आजच्या जमान्यातला हा मुलगा इतका धोरणी, नम्र, मृदू, ध्येयवेडा आणि शब्द पाळणारा असू शकतो? या दुनियेत अशीही मुलं अजून आहेत, या जाणिवेनं सुखद धक्का बसला. आनंदही वाटला.

वरुणच्या खातिरदारीबद्दल, त्याला मनातल्या मनात खूप आशीर्वाद आणि धन्यवाद देत मी शांतपणे डोळे मिटून घेतले..

उत्तरा केळकर

uttarakelkar63@gmail.com