आज राम कदम आणि विश्वनाथ मोरे दोघेही हयात नाहीत. पण लावणीच्या क्षेत्रात आपला अमिट ठसा ते उमटवून गेले. त्या दोघांच्या शिकवण्यामुळे, लावणीचं दालन माझ्यासाठी खुलं झालं! त्यानंतर अनेक लावण्या मी गायले.. आता गाताना लावणीचं लावण्य मी मनापासून अनुभवते.
मी ‘भूूमिका’ चित्रपटात प्रथम गायले ते १९७६ मध्ये. त्याआधी ७४ मध्ये मी मुंबई आकाशवाणीचा कोरस ग्रुप जॉइन केला होता. त्याचे मुख्य होते संगीत दिग्दर्शक कनु घोष. ते आमच्याकडून वेगवेगळी देशभक्तीपर गीते बसवून घेत. महिन्याला एक गाणं आकाशवाणीवर रेकॉर्ड होई आणि दोन महिन्यांतून एकदा दोन्ही गाण्यांचे ‘दूरदर्शन’साठी शूटिंग होई. कनुदा मला बऱ्याच वेळाला गाण्यामधे सोलो (स्वतंत्र) ओळी गायला देत. त्या ओळी ऐकूनच त्या वेळचे प्रसिद्ध संगीतकार विश्वनाथ मोरे मला विचारत ‘आकाशवाणी’मध्ये आले. आम्ही कनुदांबरोबर तालीम करत होतो. माझी त्यांच्याशी ओळख नव्हती. बाहेर भेटताच ते म्हणाले की मी तुमचं गाणं ‘दूरदर्शन’वर ऐकलं आहे. मला आवडलंय. मला तुमच्या आवाजात भावगीतांची रेकॉर्ड करायची आहे. मी आनंदाने होकार दिला. मग चाली ऐकून दाखवण्यासाठी ते दोन-तिनदा घरी आले. त्यानंतर चार भावगीतांचे रेकॉर्डिग झाले. खूप छान चाली केल्या होत्या त्यांनी! त्यानंतर २ वर्षांतच त्यांनी माझ्याकडून ‘हळदी कुंकू’ या चित्रपटासाठी गाणी गाऊन घेतली. १९७७/७८ मध्ये त्यांच्याकडे चित्रपटांची रांग लागलेली होती. चांगली ओळख झाल्यावर ते मला म्हणाले, ‘‘तू अशीच एकाच लयीतील, सोज्वळ, सात्त्विक गाणी गात ऱ्हायलीस, तर या फिल्मी दुनियेत तुझा निभाव लागणार नाही. तुला सर्व प्रकारची गाणी गाता यायला पाहिजेत. लावण्यासुद्धा गाता यायला पाहिजेत.’’ त्यांचं म्हणणं खरच होतं. मी त्यांना म्हटलं, ‘‘माझं शिक्षण सेंट कोलंबोत झालं, घरात ब्राह्मणी संस्कार, मग लावण्यांचा तो ग्रामीण ढंग मला कोण शिकवणार?’’ त्यावर ते म्हणाले, ‘‘मी शिकवीन ना!’’ मला अतिशय आनंद झाला. मग मुद्दामून त्यांनी मला चित्रपटात लावण्या द्यायला सुरुवात केली. एकेका लावणीच्या ४/५ तरी तालमी होत. त्यांच्या मते लावणी गाणं म्हणजे नुसती चाल सुरातालात गाणे नव्हे. तर लावणीमध्ये जो शृंगारिक भाव यायला पाहिजे तो सर्वात महत्त्वाचा! त्यासाठी शब्दाची फेक पाहिजे, शब्दांवर कुठे आघात करायचे, कुठे शब्द हळुवार गायचे, ग्रामीण ढंगाचे शब्द कसे उच्चारायचे, दोन ओळींमध्ये गद्य शब्द कुठे आणि कसे पेरायचे, लावणीच्या खास ताना किंवा बारीक बारीक हरकती, मुरक्या कशा घ्यायच्या, सुरुवातीला जर शेर असेल, तर आवाजाला कसं रोमँटिक बनवून गायचं. या सर्व गोष्टींचं सौंदर्य मोरे यांनी मला अक्षरश: उलगडून दाखवलं. गाणं लिहून झालं की कागदावरच खास शब्दांवर त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार मी खुणा करून घेई. त्यामुळे विशिष्ट भाव गाण्यातून उमटण्यास मदत होई. हळूहळू मला हे जमायला लागलं. कागदावर लावणी उतरवणं, कुठच्या शब्दांवर कसे भाव दाखवायचे याचा मी विचार करू लागले. मग तर हळूहळू शब्दातच लपलेले भाव मला दिसू लागले. आणि मग सगळं सोपं वाटायला लागलं. ‘आई’, ‘तमासगीर’, ‘रंगपंचमी’, ‘छत्तीस नखरेवाली’ अशा एकामागून एक चित्रपटांत त्यांनी बऱ्याच लावण्या माझ्याकडून गाऊन घेतल्या.
त्याच दरम्यान एन.सी.पी.ए.ने ‘बैठकीची लावणी’ हा कार्यक्रम बसवयाचं ठरवलं. पूर्वीच्या ज्या बैठकीच्या लावण्या गाणाऱ्या गायिका होत्या, त्यांच्याकडून खास लावण्या घेऊन डॉ. अशोक रानडे यांनी तो कार्यक्रम बसवला होता. बरेच जण त्यात गायला होते. डॉ. रानडे स्वत: आमची तालीम घेत. आणि मधून मधून विशेष मार्गदर्शन करायला साक्षात पु.ल. देशपांडे असत. ते मोलाच्या सूचना देत. या लावण्या चित्रपटांच्या लावण्यांपेक्षा खूपच वेगळ्या होत्या. त्या शास्त्रीय संगीतातल्या ख्यालाच्या अंगाने जात. त्यांचे तालही फार कठीण असत. तरी गायला फार मजा येई. एकटय़ा फैयाजजी या लावण्या अदा करून म्हणत. बैठकीच्या लावणीमध्ये अदाकारी, आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव याला फार महत्त्व असतं. या कार्यक्रमाच्या निमित्ताने बैठकीच्या लावणीतली सौंदर्यस्थळं काय असतात हे अनुभवण्याची संधी मिळाली. आणि दिग्गजांचा सहवास मिळाला.
१९७६ मध्ये ‘भूमिका’नंतर मला ओ. पी. नय्यर साहेबांकडे गाण्याची संधी मिळाली. यानिमित्ताने फार मोठय़ा संगीतकाराचा सहवास लाभला. नय्यर साहेबांच्या या चित्रपटाची नवी रेकॉर्ड मी आणि माझा नवरा घरी ऐकत बसलो होतो. त्याच वेळी दारावर बेल वाजली, दार उघडलं तर दारात साक्षात राम कदम! त्यांना बघून मी अवाक् झाले. क्षणात त्यांनी केलेल्या आशाताईंच्या सुंदर लावण्या, उषाताईंच्या गाजलेल्या ‘पिंजरा’मधल्या लावण्या डोळ्यासमारे तरळून गेल्या. माझ्यासारख्या नवोदित गायिकेकडे यांचं काय काम असेल? असा विचार करत असतानाच ते म्हणाले, ‘‘उत्तरा! तुझा पत्ता शोधत शोधत आलो. प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक अनंत माने यांनी तुझं गाणं ऐकायला सांगितलंय,’’ मी आनंदाने मान हलवली. तानपुऱ्यावर गाणं गायले. ते त्यांना आवडलं असावं. मला म्हणाले, ‘‘हिंदमाताजवळच्या हॉटेलात मानेसाहेब उतरलेत, तिथे आज संध्याकाळीच ये. उद्याच तुझं गाणं रेकॉर्ड करू.’’ संध्याकाळी मी मानेसाहेबांना भेटले. तिथेच दुसऱ्या दिवशीच्या गाण्याची तालीम केली. आणि दुसऱ्याच दिवशी माझं मराठी चित्रपटातलं एकच गाणं रेकॉर्ड झालं. ते गाणं होतं, ‘सुशीला’मधलं ‘सत्यं शिवम् सुंदरा’ गाणं रेकॉर्ड झाल्यावर रामभाऊ खूश होऊन मला म्हणाले की, ‘‘तुझं गाणं आम्हाला आवडलंय, तेव्हा आता दुपारी दुसरं गाणं रेकॉर्ड करू!’’ लगेचच त्यांनी चाल सांगितली आणि दुपारी
सुरेश वाडकर आणि माझं एक डय़ुएट रेकॉर्ड झालं. शब्द होते, ‘जीवन इसका नाम है प्यारे’. ‘सुशीला’ चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर राम कदम यांनी मला अनेक गाणी दिली. पण त्यांचंही असंच म्हणणं होतं की नुसती अशी, गोड, सोज्वळ गाणी तू गात राहिलीस, तर फार काळ तू या चित्रपटक्षेत्रात टिकून राहणार नाहीस. त्या वेळचा जमाना हा लावणीप्रधान चित्रपटांचा होता आणि राम कदमांचा तर लावण्यांचा खूप अभ्यास होता. लावणीतील झील ते खूपच छान बनवायचे. ‘पिंजरा’मधल्या सगळ्या लावण्यांचे कोरस (झील) ऐका. मुख्य चालीबरोबर तेही आपल्याला गुणगुणावेसे वाटतात. रामभाऊ पुण्यात राहत. मुंबईला आले की ते हमखास माझ्या घरी येत आणि लावणीतले बारकावे शिकवीत. त्यातला नखरा, ठसका कसा यायला पाहिजे, श्वास कुठे घ्यायला पाहिजे हे सर्व सर्व त्यांनी मला शिकवले. ते म्हणायचे, ‘‘उत्तरा! शृंगारिक लावणी गाताना लाज, संकोच सर्व बाजूला ठेव. गाताना चेहऱ्यावर काय भाव येताएत किंवा हातवारे काय होताएत याचा विचारही करू नकोस. स्वत:ला लावणीत पूर्णपणे झोकून देत बिनधास्त गा! त्यात जरा जरी संकोच आला ना, तरी ते भाव येणार नाहीत.’’ मग थोडंस ‘निर्लज्ज’ बनतच मी लावण्या गायला लागले. त्याचा योग्य तो परिणाम दिसायला लागला! रामभाऊंच्या अनेक चित्रपटांत मी लावण्या गायले.
एके दिवशी रामभाऊंचा पुण्याहून फोन आला. ‘‘उत्तरा एक चित्रपट करतोय ‘पैंजण’. माझी तब्येत ठीक नाही. तू तालमीला पुण्याला येशील का? कारण आजारी असल्यामुळे मी सध्या मुंबईला येऊ शकत नाही.’’ मी ताबडतोब होकार दिला आणि पुण्याला गेले. निर्मात्याला त्यांनी माझी हॉटेलमध्ये २ दिवस व्यवस्था करायला सांगितली. रामभाऊ खूप थकले होते. तरीही चाली शिकवताना उत्साह नेहमीचाच होता. मला म्हणाले, ‘‘उत्तरा, खरं तर या लावण्या मी आशाबाईंना डोळ्यासमोर ठेवून बनवल्या आहेत. कठीण आहेत. पण दोन-तीनदा काही कारणाने, ठरलेलं रेकॉर्डिग कॅन्सल झालं. आता निर्मात्याला थांबायला वेळ नाही. तेव्हा निर्मात्याला मी म्हटलं की, ‘आशाताईंनंतरचा माझा चॉइस उत्तरा हाच आहे, आशाताईंच्या लेव्हलचं ती गाऊ नाही शकणार, पण व्यवस्थित रिहर्सल्स करून ती चांगला रिझल्ट देईल एवढी खात्री आहे मला! तेव्हा रेकॉर्डिगसाठी आपण उत्तरालाच घेऊ!’’ त्यांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासामुळे आनंद तर झाला, पण टेंशनही वाढलं, ३/४ लावण्यांची भरपूर तालीम घेऊन काही दिवसांताच त्यांनी मुंबईला रेकॉर्डिग केलं. ही त्यांची माझी शेवटची भेट! त्यानंतर काही महिन्यातच ते गेल्याची बातमी आली. काय योगायोग पाहा! माझ्या आयुष्यातलं मराठी चित्रपटाचं पहिलं गाणं मी त्यांच्याकडे गायले आणि त्यांच्या आयुष्यातलं शेवटचं गाणंसुद्धा मी गायले.
आज राम कदम, विश्वनाथ मोरे दोघेही हयात नाहीत. पण लावणीच्या क्षेत्रात आपला अमिट असा ठसा ते उमटवून गेले. त्या दोघांच्या शिकवण्यामुळे, लावणीचं दालन मला खुलं झालं! इतकं, की आजही लोक मला इतर गाण्यांच्या तुलनेत लावणी गाण्यासाठी जास्त बोलावतात. नंतर मराठीतले जवळजवळ सर्वच संगीतकार मला आवर्जून बोलवायला लागले. ही त्या दोघांचीच कृपा! आता गाताना लावणीचं लावण्य मी मनापासून अनुभवते..
उत्तरा केळकर
uttarakelkar63@gmail.com