यशवंत देव यांचा दिवस रोज पहाटेच सुरू होतो. काव्य करायला, चाली बांधायला, ध्यानाला, कामाचं नियोजन करायला हीच वेळ योग्य समजून ते चिंतन, मननात पहाटेचा वेळ घालवतात. कित्येक चाली त्यांना पहाटे सुचतात. नुसतं नोटेशन लिहून त्यांनी अप्रतिम चाली केलेल्या आहेत. आता आतापर्यंत सबंध दिवस जरी ध्वनिमुद्रण चालू असलं तरी ते थकायचे नाहीत, याचं रहस्य काय असावं बरं!
१ नोव्हेंबरला यशवंत देव ९० वर्षांचे होत आहेत. नव्वदीतल्या या तरुणाला मनोमन नमस्कार!
खूप मंतरलेले आणि साधे दिवस होते ते! आनंदाच्या व्याख्यासुद्धा तेव्हा वेगळ्या होत्या. आमच्या लहानपणी आकाशवाणीला म्हणजेच रेडिओला अगदी अनन्यसाधारण महत्त्व होतं. कारण मनोरंजनासाठी आम्हाला अहोरात्र सोबत करायला फक्त रेडिओच होता. याच रेडिओवरच्या, ‘मंगलप्रभात’, ‘आपली आवड’, ‘भावसरगम’ या कार्यक्रमांनी लोकांवर जादू केली होती. ‘त्या तरुतळी’, ‘अशी पाखरे येती’, ‘तू दूरदूर तेथे’, ‘विसरशील खास मला’, ‘कधी बहर कधी शिशिर’ एक ना दोन अशा अनेक गाण्यांनी मला वेड लावलं होतं. पण त्या गाण्यांचे संगीतकार कोण, हे त्या वेळी मला ठाऊक नव्हतं. पण जेव्हा कळलं, तेव्हा यशवंत देव यांच्याबद्दलचा आदर आणि कुतूहल दोन्ही वाढलं. त्यांची आणि माझी आयुष्यात कधी भेट घडेल आणि मी त्यांच्याकडे गाईन, असं स्वप्नातसुद्धा तेव्हा वाटलं नव्हतं.
१९७४ मध्ये आकाशवाणीचा कोरल ग्रुप कनु घोष यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला होता. त्यात माझाही सहभाग असल्याने दुपारी २ ते ५ मला गाणी बसवण्यासाठी ‘आकाशवाणी’त जावं लागे. जेव्हा मराठी गाणी बसवत असू, तेव्हा कनुदा यशवंत देवांना हमखास बोलावीत. तेव्हा देव मुंबई आकाशवाणीच्या सुगम संगीत विभागाचे प्रमुख होते. ते खूप बोलत नसत. पण एखादीच मोलाची सूचना देऊन ते जात. त्याच वेळी एकदा कुणीतरी माझ्या कानात कुजबुजलं, ‘हे प्रसिद्ध संगीतकार यशवंत देव.’ मी आश्चर्याने त्यांच्याकडे बघतच राहिले. ज्या गाण्यांनी मला वेड लावलं होतं त्याचा कर्ता करविता साक्षात माझ्यासमोर उभा होता.
कोरल ग्रुपमध्ये माझ्याबरोबर असलेल्या गायिका पद्मजा बर्वे आणि उषा वर्तक, या दोघी त्या वेळी देवांनी बसवलेल्या ‘स्वरयामिनी’ या कार्यक्रमात त्यांच्याबरोबर गात असत. माझ्यासारख्या नवशिक्या आणि दोन ओळीसुद्धा लोकांपुढे धीटपणे सादर न करता येणाऱ्या घाबरट मुलीला त्या दोघींचं भारी कौतुक वाटे. वाटायचं, किती भाग्यवान मुली आहेत या! एवढय़ा मोठय़ा कलाकाराबरोबर यांना गाण्याची संधी मिळते. आपल्यालाही अशी कधी संधी मिळेल का? कोरल ग्रुपमध्येच असताना पद्मजा बर्वे हिने माझं गाणं ऐकून ‘तू देवांकडे शिकत का नाहीस, खूप फायदा होईल तुला!’ असं सांगितलं. तेव्हा मी शास्त्रीय गाणं शिकत होतेच, तरीही सुगम संगीत शिकण्याचीही तितकीच ओढ होती. सुदैवाने लग्नानंतर मी देवांच्या घराजवळच राहत असल्याने त्यांच्याकडे मी शिकायला जाऊ लागले. नोकरीला जाण्यापूर्वी सकाळी आठच्या सुमारास ते मला शिकवत. नोकरी, क्लास, काव्य करणं, चाली लावणं इत्यादी गोष्टीत अत्यंत व्यग्र असूनही त्यांनी कधीही कारण सांगून वेळ चुकवली नाही. उलट सर्व आटपून ते उत्साहात तयार असत. शिकवण्याची आत्यंतिक आवड व होतकरू मुलं कशी तयार होतील याची त्यांना आच होती. शिकवतानाही, आपण शिकवतोय तसंच आलं पाहिजे, असा त्यांचा अट्टहास नसे. सच्चे सूर आणि भावनेने ओथंबलेले शब्द श्रोत्यांपर्यंत पोहोचावेत एवढंच त्यांना अभिप्रेत असे. संगीतप्रेमींनी त्यांचं ‘शब्दप्रधान गायकी’ हे पुस्तक जरूर वाचवं.
हळूहळू ओळख वाढत होती आणि एक दिवस देवांनी ‘दूरदर्शन’वर दोन भावगीते गाण्यासाठी मला विचारलं. ‘दूरदर्शन’ची नुकतीच सुरुवात झाली होती. पण लोकांवर त्याचा जबरदस्त प्रभाव होता. देवांची गाणी आणि तीसुद्धा ‘दूरदर्शन’वर गायला मिळणार याचा मला खूप आनंद झाला. एक होते ‘भेट झाली कशी, प्रेम झाले कसे’ तर दुसरे ‘तुज खुणाविले परि तुला यायचे नव्हते’ दोन्ही गाण्यांत माझ्याबरोबर
परेश पेवेकर हे गायक होते. मग काही महिन्यांतच देव यांनी मला त्यांच्या ‘स्वरयामिनी’ कार्यक्रमात बोलवायला सुरुवात केली. मला आठवतं त्याप्रमाणे, त्या वेळी ते स्वत:, मी, रवीन्द्र साठे व शोभा जोशी असे चौघे जण त्यात गायचो. मग हळूहळू मी त्यांच्या जाहिरातींच्या, कॅसेटच्या, चित्रपट गाण्यांच्या ध्वनिमुद्रणासाठीही गाऊ लागले. त्या निमित्ताने मला त्यांचा बराच सहवास व मार्गदर्शन लाभलं. ७४ मध्ये देवांबरोबर गाण्याचं स्वप्न बघणारी मी, ८४ मध्ये त्यांच्याबरोबर चक्क इंग्लंड, अमेरिका व कॅनडाचा दौरासुद्धा करून आले.
निर्माता दिग्दर्शक वसंतराव जोगळेकरांनी जेव्हा ‘दूरदर्शन’साठी बहिणाबाईंवरील लघुपट काढला, तेव्हा त्याचं संगीत देवांचंच होतं. त्यातली सोळाही गाणी मला गायला मिळाली, हे माझं परमभाग्यच! सोळाही गाण्यांना, काव्यातील भावानुसार ज्या वेगवगळ्या चाली देवांनी दिल्या, त्याला तोड नाही. बहिणाबाईंच्या काव्यात, पदोपदी येणारा निसर्ग, त्यातील उत्फुल्ल किंवा उदास क्षणांना अर्थवाही आणि वैविध्यपूर्ण स्वरांनी उजाळा देऊन ते काव्य त्यांनी लोकांसमोर जिवंत केलं. त्या स्वरांचं प्रकटीकरण करण्यात माझा खारीचा वाटा होता, हे काय थोडं झालं? बहिणाबाईंच्या गाण्यांमुळे मी प्रकाशात आले. देवांबरोबर काम करताना संगीत क्षेत्रात पाऊल पुढे पडण्यास मला मदत झाली. कित्येक र्वष गाण्याशी निगडित असलेल्या विविध क्षेत्रांत तितक्याच ताकदीने झालेला त्यांचा संचार मी जवळून बघितला! रेडिओ, दूरदर्शन, कॅसेटमधली गाणी, चित्रपटगीते, जाहिराती व त्यांच्या अनेक कार्यक्रमांतून गायल्याने मला त्यांना अभिप्रेत असलेलं गाणं कसं गावं हे अनुभवायला मिळालं. गंमत म्हणजे हे सर्व व्याप सांभाळताना ते सतत उत्साही तर असतच, पण कोणतीही अडचण आली तरी ते अगदी तणावविरहित असत, याचं मला खूप नवल वाटतं! वादक आले नाहीत, रेकॉर्डिस्टचा पत्ता नाही, ऐनवेळी गाण्यात होणारा बदल, गाणाऱ्या व्यक्तीकडून खोळंबा इत्यादी गोष्टी घडल्या तरी ते आपले काही तरी विनोद करत व शांत राहत. त्यातूनच मार्ग काढण्याची त्यांची वृत्ती अजूनही तशीच आहे.
देवांचा दिवस पहाटेच सुरू होतो. काव्य करायला, चाली बांधायला, ध्यानाला, कामाचं नियोजन करायला हीच वेळ योग्य समजून ते चिंतन, मननात पहाटेचा वेळ घालवतात. कित्येक चाली त्यांना पहाटे सुचतात असे ते सांगतात. आता पहाटेच्या शांत वेळी, न गाता किंवा पेटी न वाजवता कशा काय चाली सुचतात हे मला पडलेलं कोडंच आहे. नुसतं नोटेशन लिहून त्यांनी अप्रतिम चाली केलेल्या आहेत. आता आतापर्यंत सबंध दिवस जरी ध्वनिमुद्रण चालू असलं तरी ते थकायचे नाहीत, याचं रहस्य काय असावं बरं! मला वाटतं, खऱ्या कलाकाराला नवीन नवीन काही सुचणं, हीच एक परमानंदाची गोष्ट असावी. त्यासाठी आंतरिक समाधी असावी लागते. देव मुळात तसेच असल्यामुळेच ऋ षितुल्य रजनीशांकडे जाण्याची त्यांना ओढ लागली. त्याचा प्रत्यय मी व यशवंत देव परदेश दौऱ्यावर गेलो असताना आला. तिथल्या महाराष्ट्र मंडळांनी आमचे कार्यक्रम वेगवेगळ्या शहरांत ठेवले होते. त्यांच्या काव्य, विडंबन गीत, प्रसिद्ध गाण्यांसाठी तेथील मराठी माणसांना ते आधीपासूनच परिचित होते. एरवी अबोल किंवा शांत दिसणारे देव मैफिलीत जेव्हा बोलू किंवा गाऊ लागायचे, तेव्हा श्रोत्यांत चैतन्य पसरायचं आणि मैफिलीचे ते एकदम बादशहाच बनून जायचे. त्यांच्या भावगीतांना तर लोकांनी किती डोक्यावर घेतले आहे, ते मी माझ्या डोळ्यांनी प्रत्यक्ष बघितलं आहे. प्रत्येक वेळी गाणं म्हणताना तेच सूर, तेच शब्द असले तरी त्याचं सादरीकरण ते वेगवेगळ्या पद्धतीने करत असत आणि तेसुद्धा सहज! निवेदनसुद्धा ओघवती भाषा, सोपे शब्द, विनोद करत आणि कोपरखळ्या मारीत इतक्या प्रभावीपणे करत की समोरच्या श्रोतृवर्ग अगदी मंत्रमुग्ध होऊन जाई! मलाही त्या वेळी प्रत्येक कार्यक्रम ही मेजवानीच वाटे. परदेशात जाणं, हे सर्व सामान्यांना अप्रुप वाटतं! पण देवांचं तसं नव्हतं. खाणंपिणं, पाहुणचार, खरेदी, तिथल्या अद्भुततेत रमणं यापेक्षाही कामात व्यग्र असूनही त्यांना त्यांच्या गुरुच्या, रजनीशांच्या भेटीची आस लागली होती. त्याप्रमाणे ते त्यांची भेट घेऊन आलेही! त्या वेळी त्यांच्या आध्यात्मिक ओढीचं मला वेगळंच दर्शन घडलं!
५ जून २०११ रोजी त्यांच्या पत्नी नीलमताई म्हणजेच करुणाताईंचं निधन झालं. त्या स्वत: एक मोठय़ा कलाकार होत्या. अनेक नाटकांमधून त्यांनी कामं केली. रेडिओवर तर त्यांचा मधाळ आवाज कायमच कानी पडायचा. साहित्य, कला, नाटय़, संगीत याची उत्तम जाण असूनसुद्धा या क्षेत्रातील करिअर पणाला न लावता पतीला साभूत होईल अशा गोष्टीत त्या समर्पित राहिल्या. सदैव हसरी मुद्रा, गोड बोलणं, अतिथ्यशील आणि चांगल्या गोष्टींचं कौतुक करताना भरभरून बोलणं, या त्यांच्या स्वभावामुळे त्या सर्वानाच प्रिय होत्या. देवांबरोबर त्यांनी प्रीतीबरोबरच अतिशय भक्तीनं संसार केला. आज त्यांच्या जाण्यामुळे देव अगदी एकाकी पडलेत! तरी हे दु:ख पचवून त्यांनी आपला दिनक्रम अगदी छान ठेवला आहे.
अगदी गेल्या वर्षीपर्यंत नवनवीन चाली बांधणं, कार्यक्रमांसाठी बाहेर गावी जाणं, प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणं, नवीन संकल्पना घेऊन नवे प्रयोग करणं इत्यादीत ते व्यग्र होते. वयाच्या नव्वदीलासुद्धा त्यांची चाल अगदी झपाझप, तरुणांना लाजवील अशीच आहे. याही वयात नवीन चाली करायला त्यांना आवडतात. कधी फोन केला तर नवीन गाणी मलासुद्धा उत्साहाने शिकवतात. मितभाषी, सीमित आहार, विहार व ध्यान यामुळे त्यांचं आरोग्य आजच्या दूषित वातावरणातही स्थिर आहे. शरीर व मन दोन्ही जोपासल्याने त्यांच्या प्रसन्नतेची प्रभा सर्वावर पसरते.
१ नोव्हेंबरला यशवंत देव ९० वर्षांचे होत आहेत. माझ्या गुरूंचं पुढील आयुष्य आनंदमय आणि आरोग्यपूर्ण जावं, हीच देवाजवळ प्रार्थना! आणि नव्वदीतल्या या तरुणाला माझा मनोमन नमस्कार!
उत्तरा केळकर – uttarakelkar63@gmail.com