साहित्य, प्रमाण व कृती-
एक वाटी सबंध हिरवे मूग घेऊन ६ ते ८ तास पाण्यात भिजवून ठेवावेत. भिजल्यानंतर मूग मिक्सरमधून बारीक वाटून ताकात भिजवावेत. (फार आंबट ताक नको) साधारण सरबरीत भिजवून अर्धा चमचा मीठ मिसळून सहा ते आठ तास आंबण्यासाठी झाकून ठेवावे. नंतर त्या मिश्रणात एक छोटा चमचा तेल व थोडे आले किसून मिक्सरवर बारीक करून मिसळावे. ढोकळा फुलण्यासाठी वर जागा ठेवून थाळीत हे मिश्रण ओतावे. ओतण्यापूर्वी थाळीला तेलाचा हात लावावा. अर्धा चमचा सोडा (खाण्याचा) अगदी वेळेवर मिक्स करावा. हे मिश्रण घातलेली थाळी १२ ते १५ मिनिटे आधणात वाफवावी. पीठ हाताला लागले नाही की ढोकळा तयार झाला.
थाळी बाहेर काढून थोडा निवला की वडय़ा सुरीने कापाव्यात. नंतर त्यावर किसून, भाजून बारीक केलेले सुके खोबरे, थोडी मिरपूड व चवीपुरते तिखट-मीठ घालून ढोकळय़ावर पसरवावे. त्यावर ओले, खरवडलेले खोबरे व कोथिंबीर पसरावी. वरती तेलाची खमंग फोडणी पसरावी. फोडणीत थोडे तीळ घालावेत. नंतर वडय़ा मोकळय़ा करून दहय़ात कालवलेल्या खोबऱ्याच्या चटणीबरोबर खायला द्याव्यात. फारच रुचकर लागतात व पौष्टिक असतात. साधारण चार-पाच जणांना पुरतात.
वसुमती धारप –