‘चित्ती असो द्यावे समाधान’ हा न्या. नरेंद्र चपळगावकर यांचा ‘श्रेयस आणि प्रेयस’ सदरातील १४ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेला लेख फार आवडला. न्या. चपळगावकर यांचा अल्प परिचय वाचून खूप कौतुक वाटले. गेली कित्येक वर्षे ते लेख आणि मुलाखतींद्वारा आमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांच्या लेखांची कित्येक कात्रणे मी संग्रही ठेवलेली आहेत. ते परखड बोलतात आणि लिहितात. रामशास्त्री बाण्याची आठवण होते. अशा माणसांचे दर्शन हेही दुर्लभ! शेवटी एक लिहितो, सरळ, सज्जन, कणखर माणसे कमी होऊ  लागली आहेत. ती सापडली तर त्याची जाण ठेवून त्यांचे कौतुक करावे. त्यांनी असेच कार्य करीत राहावे.

यशवंत भागवत, पुणे 

दाम्पत्यांसाठी गरजेचे

‘अपत्यजन्माचे समाजभान’ या सदरात ३१ मार्चला प्रसिद्ध झालेला डॉ. किशोर अतनूरकर यांचा ‘गर्भावस्थेतील कामजीवन’ लेख खूप छान होता. आज आपण कितीही प्रगती केली असली तरी असे भरपूर विषय आहेत की, समाजाने त्यांना एका चौकटीतच ठेवणं पसंत केलंय आणि विशेष म्हणजे त्याचे दुष्परिणाम कितीही झाले तरीही लोक सहन करायला तयार असतात. पण त्यावर बाहेर तर नाहीच, पण आपल्या स्वत:च्या कुटुंबातसुद्धा चर्चा कुणी करायला तयार नसतात.

गणेश सानप, वसई

ज्येष्ठांना मार्गदर्शक लेख

‘श्रेयस आणि प्रेयस’ सदरातील ‘चित्ती असो द्यावे समाधान’ हा माजी न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर लिखित लेख व ‘संहिता साठ्ठोत्तरी’ सदरातील डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा ‘स्वयंप्रेरणा’ लेख ज्येष्ठांना मार्गदर्शक ठरावा. किंबहुना निवृत्ती पाच वर्षांवर येऊन ठेपलेल्यांना जास्तच मार्गदर्शक ठरतील. स्वयंप्रेरित जीवन जगण्यासाठी अहितकारक प्रेयस टाळून श्रेयस्करपण जगले तर ज्येष्ठ नागरिकांना संध्याछाया भिववणार नाहीत. पण अशा गुणसंपन्न व प्रगल्भ ज्येष्ठ नागरिकांची संख्या फारच कमी भासते. ऐन उमेदीत आयुष्याशी झगडताना निवृत्तीचे वय उंबरठय़ावर कधी येऊन ठेपते हे कळत नाही. निवृत्तीपश्चातचे आयुष्य कसे कंठायचे याची पूर्वरूपरेषा न आखल्याने अचानक मिळालेला मोकळा वेळ खायला उठतो. घरात २४ तास असल्यामुळे लुडबुड वाढून ती व्यक्ती अडचण वाटायला लागते. चिडचिडेपणा वाढतो. अशा ज्येष्ठ नागरिकांना भावनिक मदतीची खरी गरज आहे. पण बऱ्याचदा अशी मंडळी स्वयंकेंद्रित होतात व कुणाशीच पटवून घेणे जमत नाही. छोटय़ा छोटय़ा घटना गंभीर स्वरूप धारण करतात. अशा मंडळींसाठी काही मार्गदर्शक कार्यशाळा चालवल्या तर ती मदत ठरेल. मिळेल तेवढय़ा लोकांशी जुळते घेऊन त्यांच्यात मिसळले व समाधानी वृत्ती बाळगली तर जगणे सुस होईल.

राघवेंद्र मण्णूर, डोंबिवली

आताची स्थिती वेगळीच!

१४ एप्रिलला प्रसिद्ध झालेला डॉ. किशोर अतनूरकरांचा ‘सासर-माहेरचा गुंता’ विषयावर त्यांनी जे विचार मांडले आहेत ते आजच्या काळात क्वचितच (अपवादात्मक) लागू पडतात. आज मुलीकडील मंडळी अधिक जाचक ठरत आहेत. मुलगी देतानाच मुळी मुलाची स्वत:ची स्वतंत्र जागा, मुलावर आई-वडिलांची जबाबदारी आहे किंवा नाही या निकषांवर कार्य करतात आणि नंतरपण ते मुलीच्या सासरच्या गोष्टीत लुडबुड करतच असतात. नवदाम्पत्यामध्ये तुझे आई-बाबा, माझे आई-बाबा यावरून सतत वाद घडत असतात. त्या गोष्टीचा त्रास फक्त मुलाकडील मंडळींनाच होतो. अपत्यजन्माच्या बाबतीत तर मुलीकडील मंडळी तर मुलाच्या आईला हैराण करून सोडतात. सर्व निर्णय मुलगी आणि तिची आईच घेत असतात. जणू मुलांची आई कधी बाळंतीणच झाली नव्हती. खर्चाची बात तर बोलूच नका. तो मुलानेच करायचा अलिखित करार! आपण ४०-४५ वर्षे मागील समाजाचं चित्र रेखाटले आहे.

मेघना जोशी

प्रगल्भ नात्यावरील भाष्य

‘तिच्या नजरेतून तो’ या सदरातील मेघना भुस्कुटे यांचा लेख ‘इंद्रियांची वेल पसरत पसरत..’ खूपच अप्रतिम असा उतरलाय. स्त्री-पुरुष भेदाच्या पलीकडली वाट जी फारच कमी लोकांना गवसत असावी. त्या वाटेवरील प्रवास म्हणजे हा लेख, असं मला वाटतं. भुस्कुटे यांच्या लेखणीतून उतरलेल्या ओळी म्हणजे, उत्कट, तरल अशा त्या नात्यातला लपंडावच जणू! आणि एक प्रगल्भ, समृद्ध नातंच या सगळ्या हरकतींचा आनंद देऊ शकतं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

मनोहर मंडवाले, कल्याण

Story img Loader