‘संहिता साठोत्तरी’ या सदरात २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला ‘संघटना साखळी’ हा डॉ. रोहिणी पटवर्धन यांचा लेख छान होता. या लेखात त्यांनी ज्येष्ठ मंडळींनी एकत्र येऊन कशी संघटना बांधावी या बाबतीत अगदी उत्तम मार्गदर्शन केले आहे. गेल्या २०-३० वर्षांत माणसांच्या आयुष्यमर्यादेत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे वृद्ध व निवृत्त लोकांची संख्यादेखील वाढली आहे. यातील बऱ्याच लोकांना असा प्रश्न आहे की, दिवसभराचा वेळ कसा घालवायचा. तर दुसऱ्या बाजूला अशीही मंडळी आहेत की, त्यांना दिवस काम करायला कमी पडतो, ते सतत कुठल्या ना कुठल्या कामात व्यग्र असतात. ज्येष्ठांमध्ये असाही एक वर्ग आहे की, ज्यांच्यामध्ये मनापासून काम करण्याची इच्छा, ऊर्जा आहे; परंतु ते कसे करावे हे लक्षात येत नाही. प्रस्तुत लेखात या सर्व गोष्टींचे नेमकेपणाने मार्गदर्शन केले आहे. १०-१२ जणांच्या गटात एक तरुण व्यक्ती असावी हा तर ‘मास्टर स्ट्रोक’ आहे. ‘एकमेका साहाय्य करू’ ही गट स्थापन करायची संकल्पना असल्याने काही पथ्ये पाळणेही आवश्यक आहे असे मला वाटते. उदाहरणच द्यायचे झाले तर खासगी, सांपत्तिक, आर्थिक चौकशा टाळाव्यात. राजकीय चर्चा-वाद टाळावेत. याउलट साहित्य, संगीत, क्रीडा, नवीन गॅजेट्सवर जरूर चर्चा करावी. आपल्या परिसरात संघटना साखळी उभी करू शकलो तर आपल्यालासुद्धा समाजसेवेची अनुभूती येऊ शकेल.

– नंदू दामले

 

जुन्या आठवणींना उजाळा

‘लाइफ इज ब्युटिफुल’ या सदरातील २८ एप्रिलला प्रसिद्ध झालेला प्रतिमा कुलकर्णी यांचा ‘साक्षात्काराचा क्षण’ हा लेख जुन्या आठवणी जागवून गेला. ब्लॅन्क कॅसेटमध्ये आपल्या आवडत्या गाण्यांची यादी करून भरून घेतलेल्या कॅसेट्स आजही माझ्या संग्रही आहेत. आडवे टेपरेकॉर्डर, नंतर टू इन वन, ‘बिनाका’ ऐकायची लगबग, धडपड, हे प्रतिमाताईंचा लेख वाचून आठवलं. पन्नासेक वर्षांपूर्वी पाहिलेल्या इंग्रजी चित्रपटांतील नायक चालत्या मोटारीत फोनवर बोलताना पाहून नवल वाटायचे आणि आजची मोबाइल क्रांती आपण पाहतो आहोतच. किती सहजपणे ही नवी पिढी वापरते आहे ही साधनं. ‘श्रेयस आणि प्रेयस’मध्ये रामदास भटकळ यांच्या पॉप्युलर प्रकाशनाची सहा दशकांहून अधिक कोणतीही तडजोड न करता केलेली वाटचाल प्रेरणादायी आहे. आणीबाणीचा कालखंड तर न विसरण्याजोगा आहे. ‘अपूर्णाक’ सदरातील कोल्हापूरच्या लता पाटील व संजय पाटील यांची स्वप्निलला ‘उभं’ करण्याची जिद्द आणि तेवढाच स्वप्निलचा मनोनिग्रह यांचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे.

– विकास मुळे, पुणे</strong>

 

‘कुसुम मनोहर लेले’चा अजब योगायोग

‘कुसुमच्या शोधात’ हा अशोक समेळ यांचा २८ एप्रिलच्या पुरवणीतील लेख वाचला आणि या नाटकाच्या संदर्भातल्या काही योगायोगांची गंमत वाटली. मी विनीता ऐनापुरे – ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक ज्या कादंबरीवर आधारित आहे त्या ‘नराधम’ कादंबरीची लेखिका. ही कादंबरी आणि लेखिका म्हणून माझं नाव ‘कुसुम मनोहर लेले’ नाटकाच्या जाहिरातीत आणि प्रयोगांत जाहीर केलं जावं याकरिता मला झगडावं लागलं, प्रसंगी कोर्टबाजीही करावी लागली. तो योग्य श्रेय नाकारण्याचा प्रकार या लेखातही झालाय, या योगायोगाचं मला सखेद आश्चर्य वाटतं.

सदर लेखाच्या सुरुवातीपासून समेळ हे सुजाता ऊर्फ कुसुम मनोहर लेले १९८४ पासून कशी आपल्या डोक्यात ठाण मांडून बसली होती याचं वर्णन करताना आढळतात. या सगळ्या वर्णनात कुठे तरी माझ्या ‘नराधम’ कादंबरीचा एका वाक्यात उल्लेख येतो. पण किती गोष्टी योगायोगाने घडतात ना. लेखामध्ये विवाहमंडळाच्या संचालिकेचं आडनाव जोशी, माझ्या कादंबरीतल्या अशाच व्यक्तिरेखेचंही तेच आडनाव, माझ्या नायिकेचं नाव सुजाता देशमुख, तिला फसवणाऱ्याचं नाव मनोहर लेले, त्याच्या बायकोचं नाव कुसुम आणि हीच सर्व नावं समेळांच्या डोक्यात ८४ पासून फिट्ट बसलेली असतात. केवढा हा योगायोग. १९८९ मध्ये माझी कादंबरी प्रसिद्ध होणं आणि १९९० मध्ये हे नाटक समेळांना दिसणं हा योगायोग म्हणावा का? लेखात ज्यांचा उल्लेख आहे ते रमेश उदारेच या कादंबरीचे प्रकाशक. ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक ‘नराधम’ कादंबरीवर आधारित असल्याचा आणि त्या कादंबरीचे आपण प्रकाशक असल्याचा त्यांना अभिमान होता.

कथा/ कादंबरी/ नाटक यांचं बीज एकसारखं असू शकतं; पण मूळ कादंबरीतील पात्रांशी नाटकातील पात्र तंतोतंत जुळणं, एवढंच नव्हे तर कादंबरीतील व्यक्तिरेखांच्या तोंडी असलेले संवाद नाटकात बहुतांशी तसेच असणं हादेखील योगायोगच म्हणायचा का?

की, ‘कुसुम मनोहर लेले’चे प्रयोग ठाण्यात गडकरी रंगायतनमध्ये चालू असताना श्रेयनामावलीत मूळ कादंबरीचं/ कादंबरी लेखिकेचं नाव नाही हे ऐकून काही स्त्रियांनी उठून जाहीर नापसंती व्यक्त करणं – या कादंबरीची लेखिका आमच्या डोंबिवलीची आहे, त्यांचं नाव का नाही वाचून दाखवलं? असं त्यांनी विचारल्यावर नजरचुकीनं राहून गेलं असं सांगणं – नाटकाच्या जाहिरातीत मूळ कादंबरी आणि लेखिकेचं नाव छापायचंच नाही किंवा छापलं तर मोडतोड करून छापायचं – या गोष्टी निव्वळ योगायोगाने घडतात का? ‘कुसुम मनोहर लेले’ हे नाटक नि:संशय समेळांचं आहे; पण आपण केवळ मध्यवर्ती कल्पनाच नव्हे तर पात्र, प्रसंग, संवाद, घटना या गोष्टीही एकाच कादंबरीतून घेतल्या आहेत हे न सांगता ‘कुसुम’ हा आपलाच शोध आहे हे दाखवायचा त्यांचा प्रयत्न माझ्या दृष्टीने योग्य नाही आणि हे सांगण्याकरिताच मी हा पत्रप्रपंच केला आहे.

– विनीता ऐनापुरे

Story img Loader