‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा २ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. २००९ मध्ये शिक्षण हक्क कायदा आपल्या देशात आला असला तरी हा कायदा आर्थिकदृष्टय़ा दुर्बल, सामाजिकदृष्टय़ा दुर्लक्षित, तळागाळातील सामाजिक अशा मोठय़ा घटकापर्यंत पोहोचलाच नाही. आजही हा वर्ग शिक्षणापासून वंचित राहात असेल, तर एक जागतिक महासत्ता बनण्याची स्वप्ने बघणाऱ्या आपल्या देशास हे नक्कीच भूषणावह नाही. एका बाजूला सधन कुटुंबातील मुले महागडी फी भरून शाळेत प्रवेश घेत आहेत, तर दुसऱ्या बाजूला गरीब घरच्या मुलांना शाळेत भरायला फी नाही म्हणून शिक्षणापासून वंचित रहावे लागत आहे. शिक्षण हक्क असला तरी तो या गरीब मुलांपर्यंत पोहोचलेला नाही, तो सर्वसमावेशक झाला नाही, हे आपल्याला मान्य करावेच लागेल.
गरीब घरांतील मुलांना विशेषत: मुलींना शिक्षणापासून वंचित राहण्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच मुळी उदासीन आहे. त्यामुळे गरीब मुलींनाच काय तर एकंदरच-स्त्री वर्गाला द्यावयाच्या शिक्षणाच्या अधिकारासाठी फार मोठय़ा लोकप्रबोधनाची गरज आहे. मुलींचे शिक्षण म्हणजे ‘एक कुटुंब साक्षर होणे! एक पिढी घडविणे! या अनुषंगानेच या विषयाकडे बघावे लागेल. गरिबांच्या घरी पोरांना आपापल्या पायावर उभे राहण्याची गरज असते. शिक्षणापेक्षा जगण्याचं आव्हान कधीही मोठंच असतं. त्यामुळे गरिबांची मुलं शिकली नाहीत तरी जगायला लागतात, हे वास्तव स्वीकारूनच आपल्याला या विषयाला भिडावे लागेल.
दुसरी बाजू म्हणजे सामाजिक जबाबदारी. आपल्या समाजात असंख्य नोकरदार, शिक्षक इत्यादी सेवानिवृत्तीनंतर अध्यात्माच्या मार्गी लागतात. या सुशिक्षित वर्गाला सामाजिक जबाबदारीचे भान राखून या गरीब मुलांपर्यंत पोहोचता येईल का? याचा नक्कीच विचार करावा. त्यांच्या शिक्षणाचा, ज्ञानाचा, अनुभवाचा या गरीब मुलांना नक्कीच फायदा होईल. ‘शिक्षण आपल्या दारी!’ या संकल्पनेतून काही करण्याजोगे आहे का? याचा सरकारनेही गांभीर्याने विचार करावा. अर्थसंकल्पाच्या एकूण तरतुदीच्या सहा ते आठ टक्के तरतूद ही शिक्षणावर असावी, अशी डॉ. आंबेडकरांची सूचना होती, पण आपण किती करतो? त्याचाही गांभीर्याने विचार व्हावा. – बाळकृष्ण शिंदे, पुणे</strong>
शिक्षण पद्धतीवर झणझणीत प्रकाश
‘शिक्षण आमच्या वस्तीत आलंच नाही’ हा वृषाली मगदूम यांचा लेख, आजच्या विदारक शिक्षण पद्धतीवर झणझणीत प्रकाश टाकणारा वाटला. खरे तर स्वातंत्रप्राप्तीनंतर शिक्षणाचे विद्रुपीकरण झाले आहे. वृषाली मगदुमांचा लेख, शाळेपासून वंचित मुलीची कहाणी सांगणारा आहे तसेच नाण्याची दुसरी बाजूही. जी मुले पारंपरिक शाळेत जाऊन त्यांना ‘ज्ञान’ किती मिळाले याची पाहणी केली तर अनेक धक्कादायक गोष्टी समोर येतील. पाचवी, सहावीच्या मुलांना तिसरीचे पुस्तक वाचता येत नाही, मग जोडाक्षरे वाचणे फारच दूर. साधी बेरीज,
वजाबाकी येत नाही, मग गुणाकार, भागाकार याबाबत विचार न केलेला बरा. सरकार शिक्षणावर कोटय़वधी रुपये दरवर्षी खर्च करते, पण ते कुठे जातात, कुठे मुरतात हे कुणीही पाहात नाही. आपल्या राजकारण्यांविषयी काय बोलावे, जेथे साधे मराठी वाचता येत नाही, त्या राजकारण्यांचा बालहट्ट पुरवण्यासाठी हातात टॅब दिला जातो. तो किती दिवस चालेल, नंतर कुठे जातो हा संशोधनाचा विषय आहे. खरोखरीच आजची शिक्षणाची परिस्थिती फारच विदारक, पण सत्य परिस्थिती आहे. याला तुम्ही, आम्ही सारेच जबाबदार आहोत. – शिल्पा पुरंदरे
निश:ब्द करणारी ‘मातीमाय’
चित्रा पालेकर यांचे ‘मातीमाय’ या चित्रपटाविषयी लिहिलेले दोन्ही लेख वाचले. पहिला लेख वाचल्याबरोब्बर यू टय़ूबवर लगेचच ‘मातीमाय’ पाहिला.. चित्रपटाची जन्मकहाणी आणि जन्मदात्री दोन्ही निश:ब्द करणारी! महाश्वेतादेवींचा अभिप्राय किती बोलका आहे!
मूळ कथेच्या गाभ्यातल्या प्राण आणि सुगंधाला जराही धक्का न लावता घडवलेलं कोंदण म्हणजे ‘मातीमाय’.. अर्थात हे कोंदण धगधगतं आहे; कारण मूळ कथाच एक ज्वाळा आहे.. अंधश्रद्धेनं उद्ध्वस्त झालेलं एक निष्पाप आयुष्य मन कुरतडून जातं. कसलेल्यांकडून सहजाभिनय करवून घेणं हे दिव्यही अलगद पार पडलंय. नंदिता दासचं हिंदी वर्खाचं मराठी कानाला गोड वाटलं. शेवटच्या दृश्यातला रुळावरचे ओंडके हटवण्याच्या प्रयत्नातले तिचं निरागस पुटपुटणं मनाला थेट भिडतं. या लेखानं चित्रपटाच्या निर्मितीतले कष्ट, अडचणी, त्यावरची यशस्वी मात तसेच आंतरराष्ट्रीय अभिनंदनीय आणि अभिमानास्पद प्रभाव, आवाका ठळकपणे दिसून आला. – ललिता भोईर
मार्गदर्शक लेख
‘मानसिक हिंसा’ हा ‘मन आतल्या मनात’ या सदरातील अंजली पेंडसे यांचा लेख महत्त्वपूर्ण विचार मांडणारा आहे. माझ्या माहितीतील अनेक पालक मुलांना उलटसुलट बोलायचे. त्यांची मुले मन मोकळे करण्यासाठी माझ्याकडे येत असत. माझे सकारात्मक बोलणे त्यांना आकर्षित करायचे. आज आपल्या लेखात हाच प्रकार आपण अत्यंत समर्पक शब्दात मांडलात व समाजातील एका मोठय़ा हिंसाचारावर टाकलेला हा प्रकाश अनेकांना मार्गदर्शन करील यांत शंका नाही. – प्रदीप करमरकर, ठाणे</strong>