रोहिणी पटवर्धन यांचा २३ जून रोजी प्रसिद्ध झालेला ‘दिसते मनोहर तरी..’ हा लेख वाचला. मीही ज्येष्ठ नागरिक असल्याने मला फार भावला. मी सियाटलजवळ बेल्व्ह्य़ू येथे नेहमीच जाते. तेथे ‘इंडिया असोसिएशन’ आहे. तेही दर गुरुवारी पूर्ण दिवस चेअर योगा, जेवण, चहा, नंतर करमणुकीचे कार्यक्रम करतात. माफक ४ दरांमध्ये जेवण असते. तेथील नगरपालिका यात मदत करते. मुख्य प्रश्न वाहनाने जाण्याचा असतो. काही जण बसने येतात, काहींना मुले सकाळीच ऑफिसात जाण्याआधी सोडतात. माफक दरात एक वाहन उपलब्ध असते त्यात अगदी चाकाच्या खुर्चीवरून येण्याचीही सोय असते. सगळे ज्येष्ठ भेटतात आणि मजा घेतात. पुण्याच्या नीला भुस्कुटे मला न्यायला आणि सोडायला नेहमी येत. ‘इंडिया असोसिएशन’च्या बऱ्याच कार्यक्रमांमध्ये त्यांच्यामुळे मला सहभागी होता आले. त्या ४० वर्षे तेथे आहेत. ड्रायव्हिंग करतात. त्यांच्या ओळखीच्या पुष्कळ लोकांना मी भेटले आहे. आश्चर्य म्हणजे इतकी वर्षे राहूनही त्यांच्यात जराही बदल झाला नव्हता. ‘इंडिया असोसिएशन’ने काही लोकांना मदतीचे काम सोपविले आहे. ते लोक भारतीय लोकांना खरेच मदत करतात. याचा मी स्वत: अनुभव घेतला आहे.
आपल्याकडेही पुण्याच्या ‘अथश्री’सारख्या चांगल्या सोयी आहेत; पण त्यांची संख्या कमी आहे. काही वृद्धाश्रम मीही पाहिले आहेत. स्वच्छता तेथे राखली जात नाही. वृद्ध आपल्या घरी राहिले तर मदत देणाऱ्या संस्था जवळ जवळ नाहीतच. नोकरमाणसांकडून फसवणूक होण्याची भीती असतेच. फसवणूक हा प्रकार अमेरिकेत कमी होतो. त्यामुळे वृद्ध लोक अशा संस्थांचा आधार घेतात. अजून आम्ही दोघे सगळी कामे करतो, पण कधी तरी दुसऱ्यांवर अवलंबित्व येणारच. अमेरिकेतील वृद्धाश्रमात बाकी सगळे छान असते, पण आपल्या लोकांना त्यांचे जेवण आवडत नाही. त्यामुळे सहसा तेथे जाणारे भारतीय कमीच. दुर्दैवाने आमच्या व्याह्य़ांचा तेथेच मृत्यू झाला होता. सगळ्या सोयी तेथे मिळाल्या आणि विद्युतदाहिनीत संस्कार झाला. वृद्ध एकटे पडणे, मुले-नातवंडे दुरावणे हे आपल्या इथेही चालते. शेवटी आपण केलेले संस्कार महत्त्वाचे असतात. जरी त्यांची सेवा करावी लागली तरी आपणही ती हसत स्वीकारावी. शेवटी आपल्याच लोकांसाठी आपण ते करीत असतो. या विषयावर लिहिल्याबद्दल डॉ. रोहिणी पटवर्धन यांचे मन:पूर्वक अभिनंदन. – रेखा पटवर्धन
ग्रहणाचा परिणाम नाही
मी उस्मानाबाद येथे राहतो. वकील आहे. पूर्णपणे निरीश्वरवादी आहे. डॉ. किशोर अतनूरकर यांच्या २३ जूनच्या अंकात प्रसिद्ध झालेल्या ‘भीती जन्मदोषाची’ या लेखात ग्रहणाबाबत जे लिहिले आहे त्याचा अनुभव मी घेतला आहे. माझी मोठी कन्या १९८७ एप्रिलमध्ये जन्मली. ती उदरात असताना चंद्रग्रहण आले. आम्ही पारंपरिक कोणतेही पथ्ये पाळली नाहीत. ना तिच्यावर त्याचा कोणताही विपरीत परिणाम झाला; पण आम्ही त्या वेळी टीका सहन केलीच. आग्रहाने हा गैरसमज दूर करण्याबाबत मत मांडले त्याबद्दल आभार. – देवीदास वडगावकर
मुलांचे बालपण हरपतेय
‘आमचं ऐकताय ना?’ या शीर्षकांतर्गत डॉ. अनुराधा सहस्रबुद्धे यांचे सर्व लेख वास्तववादी व मनाला भिडणारे असतात. ३० जूनच्या अंकातील ‘बंध जोडणारी परंपरा हरवतेय’ या लेखात लिहिल्याप्रमाणे आजच्या मुलांना भासणारी सर्वात मोठी उणीव ही आई-बाबांचा प्रेमळ सहवास न मिळणे ही आहे. मुलांना जेवण भरवताना त्यांच्या कलाप्रमाणे, थोडा वेळ काढून एखादी गोष्ट सांगत त्यांना भरवणे असे दृश्य हल्ली क्वचितच दिसते. त्याविरुद्ध मुलांनी जेवणासकट सर्वच गोष्टी पटापट कराव्यात अशीच मोठय़ांची अपेक्षा असते. या साऱ्यांमध्ये मुलांचे बालपण हरपत असून त्याची दखल घेणे गरजेचे आहे. – अरुणा गोलटकर, प्रभादेवी