‘परंपरेचे बळी कुरमाघर’ हा मतीगुंग करणारा आणि विचार करण्यास प्रवृत्त करणारा वास्तवदर्शी असा लेख वाचला. गोंड आदिवासी समाजातील जननक्षम स्त्रियांसाठी मासिक पाळीच्या या चार दिवसांत गावाबाहेर गळक्या, विजेचा अभाव असलेल्या आणि दलदलमय कोंदट अशा कुरमाघरात राहण्याची सक्ती केली जाते. ज्या स्त्रिया या कुप्रथेला विरोध करतील त्यांना जात पंचायतीच्या रोषाला सामोरे जावे लागते. अशा रोगट कुरमाघरात राहिल्याने विविध तसेच विविध कारणांमुळे अनेक स्त्रियांना जीव गमवावा लागला आहे. अशा या मागास प्रथेतून या समाजातील सुशिक्षित मुली देखील सुटलेल्या नाहीत हे आणखी एक भयाण समाज वास्तव यानिमित्ताने समोर आले आहे. स्त्रीच्या ज्या नैसर्गिक शरीर धर्मामध्ये मानववंशाची निर्मिती अव्याहतपणे चालू आहे, अशा गोष्टींवरून तिला ‘विटाळा’सारख्या गोष्टींना सामोरे जावे लागत आहे. आजही या मासिक शरीर धर्मास ‘विटाळ’ समजणारा मागासपणा आपल्या समाजात अस्तित्वात आहे. यावरून आपला समाज सुशिक्षित असल्यासारखे वाटत नाही. आजही अनेक सुशिक्षित कुटुंबांत धार्मिक कार्यक्रमांपासून स्त्रियांना या दिवसात दूर ठेवले जाते. तसेच स्त्रियांचीही अशा कुप्रथांना मूकसंमती असलेली अनेक वेळा दिसून येते, हे देखील आजचे एक वास्तव आहे.

स्त्रियांचे शारीरिक आणि मानसिक शोषण अशा कुप्रथांच्या आडून होत आले आहे. अशा प्रकारच्या विचित्र आणि विवेकशून्य कुप्रथांचा उगमच मुळी आपल्या पुरुषप्रधान-पुरुषसत्ताक अशा सामाजिक जडणघडणीत झाला आहे, हे वास्तव नजरेआड करता येणार नाही. शेकडो वर्षे पुरुषसत्ताक मानसिकतेतून, पुरुषांना सामाजिक आणि वैवाहिक जीवनात आपले पारडे जड / झुकते ठेवण्यात आणि प्रथा, परंपरा, रुढींच्या संमोहनाखाली स्त्रियांना दाबायला लावून त्यांचे दुय्यम स्थान ठेवण्यात यश आले आहे.

ज्या ज्या घटकांना आपल्याकडे गौरविण्यात येते त्या त्या घटकांची सर्वोच्च अवहेलना आपला समाज करत असतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे स्त्री.

जुन्या विचारांना मूठमाती देण्यापेक्षा नवीन विचार आत्मसात करणे जास्त अवघड असते. तरीही बदलाची सुरुवात स्वत:पासून केली तर ती जास्त फलदायी ठरते स्वत:साठी आणि पुढील पिढय़ांसाठी देखील. म्हणूनच समस्त स्त्री वर्गाने आपल्यावरील अशा अन्यायकारक कुप्रथांविरोधात उभे राहिले पाहिजे. ‘राइट टू पी’, यांसारख्या अभियानातून-मोहिमांतून स्त्रियांचे या अनुषंगाने होणारे शोषण या दृष्टीने समाज प्रबोधनही होणे गरजेचे आहे, असे वाटते.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे.

संवेदना मरून गेल्या आहेत

‘परंपरेचे बळी’ हा प्रा. डॉ. दिलीप बारसागडे यांचा १ डिसेंबरला प्रसिद्ध झालेला लेख वाचला. ज्या संवेदनशील विषयावर डॉक्टर काम करतायत, त्याला तोड नाही. पुन्हा असा चर्चाबाह्य़ विषय जाहीर मांडणे, हे त्याहून ‘खतरनाक.’ कारण ‘असले’ उद्योग करताना ते हे विसरलेले दिसतात की, आपल्या तथाकथित पुरोगामी वगैरे राज्यात आणि सतत संस्कृतीच्या नावाने गळा काढणाऱ्या वैभवशाली देशात सध्या दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत. पहिला राम मंदिराचा आणि दुसरा स्मारकाचा. अभ्यास करायचा, प्रश्न मांडायचा तर या विषयावर. हे काय मासिक पाळी आणि त्यात संस्कृतीच्या नावाखाली भरडून निघणाऱ्या स्त्रियांबाबत लिहीत बसलात? कुणाला वेळ आणि आस्था आहे या फडतूस विषयावर बोलण्याची? या राज्यात एकाही राजकीय पक्षाला अशा विषयावर आंदोलन करावंसं वाटत नाही. कारण आमच्या संवेदना मरून गेल्या आहेत. त्या फक्त मंदिर या विषयावर जागृत होतात. पुन्हा मला काय त्याचे, ही वृत्ती आहेच. शासन, खाप पंचायत, लोकांच्या खासगी आयुष्यात नाक खुपसणाऱ्या तथाकथित समाज पंचायत्यांची मुजोरी सहन करतं, म्हणून या गोष्टी आपल्या राज्यात राजरोस घडतात. त्याला बऱ्याचदा राजकीय वास येतो. आता संस्कृतीची टिमकी वाजवणं खूप झालं. विसाव्या शतकातसुद्धा स्त्रियांना असलं जीणं समोर येत असेल, त्या संस्कृतीला शिलगावून दिलेलं बरं!

– संजय जाधव, देवपूर, धुळे.

Story img Loader