प्रकाश नारायण संत आणि त्यांच्या पत्नी सुप्रिया दीक्षित यांची गोष्ट लंपन आणि सुमीइतकी सोपी, निरागस, ‘सहजी’ घडून जाणारी नव्हती. नव्हे, त्या गोष्टीमधला तना-मनाला घेरून विद्ध करणारा करुणेचा सूर मला या सुप्रिया दीक्षितांच्या आत्मकथनामध्ये- ‘अमलताश’ या पुस्तकामध्ये दिसतो आहे. काय विलक्षण आयुष्य! त्यात जगप्रवास नाहीत, प्रसिद्धीचे डमरूनाद नाहीत आणि उघड जाणवणारी नाटय़मयताही नाही. पण इंदिरा संत, त्यांचा मुलगा प्रकाश आणि त्याची पत्नी सुप्रिया या तिघांच्या जगण्यामधली युद्धं ही त्याहून बिकट आहेत. ‘वर्षेतील संध्येपरी आले मी आवरीत/ रक्ताचा जाळ लाल, दु:खाची गडद लाट’ या इंदिराबाईंच्या ओळी मला फार आवडतात. माझ्या ‘मुळारंभ’ कादंबरीतही त्या आल्यात. पण त्या ओळींचे या तीन व्यक्तींना प्रतीत झालेले झोंबरे वास्तव या अमलताशाच्या पारावर मला दिसतं आहे. हे आत्मकथन जेव्हा प्रकाशित झालं तेव्हा अनेकांकडून मी अनेक गोष्टी ऐकल्या. कोणी म्हणालं, ‘बरं झालं, इंदिरा संत या सासू म्हणून कशा होत्या हे जगासमोर आलं.’ तर कोणी बोललं, ‘या डॉक्टरबाईंचं काही खरं वाटत नाही.’ कधी ऐकिवात आले की, संतांच्या बेळगावमधली अनेक मंडळी या पुस्तकानंतर सुप्रियाबाईंवर नाराज झाली. आणि काहींना ते ‘आहे मनोहर तरी’चे सौम्य असं व्हर्जन वाटलं. पण हे सगळंच किती सापेक्ष असतं, नाही? आत्मकथन ही अखेरीस एक कादंबरी असते. त्यातल्या माणसांची पात्रं बनतात; जगण्यातल्या घटना या ‘सीन्स’ बनू शकतात. कारण अंतिम सत्य असं सापडणं कोणालाच सोपं नसतं. ना लेखकाला, ना वाचकाला. इंदिराबाईंची, प्रकाशांची, सुप्रियांची आणि त्यांच्या परिवारातील माणसांची एकाच घटनेकडे बघण्याची अनेक भावसत्ये असू शकतात.
‘इंटेन्स’ हा शब्द चपखल बसावा असे प्रकाश आणि डॉक्टरीचा अभ्यास करणारी त्यांची मैत्रीण सुधा, त्यांचा प्रेमविवाह, त्या काळातले आवर्त, मग लग्नानंतर झालेले ते ‘पझेशन’चं युद्ध. ते अनेक घरांत घडत असतं. आणि ज्या घरात नवऱ्यामाघारी एकहाती आई तीन मुलांना कष्ट करीत वाढवते आणि ते करताना स्वत:ला, स्वत:च्या कवितेलाही वाढवते तिच्याबाबतीत तर ते अगदी नैसर्गिकही असतं. पण संतांच्या घरातले वाद हे ‘इंटेन्स’ माणसांमधले वाद होते. आक्का (इंदिरा संत) नवपरिणीत नवरा-बायकोची झडती घेणारे पत्र पाठवतात आणि प्रकाश संत खचून त्यांना एक प्रत्युत्तर पाठवतात. ते पत्र मराठीतलं अक्षर वाङ्मय म्हणता येईल इतक्या ताकदीचं आहे! संवेदनशील पुरुषाचाही संसारात होणारा कोंडमारा मराठीत किंवा इंग्रजीतही इतक्या ताकदीनिशी आलेला माझ्या वाचण्यात नाही. ‘सबंध लग्नात मी किती आनंदात होतो. मला वाटत होतं, तुला आवडणाऱ्या मुलीशीच मी विवाह केला.. केवढय़ा निष्पाप आनंदात होतो मी. पण नंतर मला शंका यायला लागली.. आतापर्यंत तू इतकं खडतर आयुष्य घालवलंस आणि आम्हाला लहानाचं मोठं केलंस. त्याचे थोडे तरी पांग फेडावेत, अशी किती चित्रं मनात होती आक्का- आणि अजुनी आहेत! पण त्या चित्रांना असे वारंवार तडे जात आहेत. ते हातातून निसटून जात आहे.’ ‘वनवास’मध्ये येणारा तो ‘अजुनी’मधला बेळगावी मराठीचा ईकार आपल्याला हसवतो. परंतु या पत्रात येणारा ‘अजुनी’- खरे सांगतो, माझं मन सपकन् कापून गेला! अशा स्थितीत कलाकाराच्या निर्मितीवर काय परिणाम होतो, हेही महत्त्वाचं ठरतं. असं असतं ना, की एखादा टगाच असतो, किंवा बनत जातो, आणि या आवर्तामधून उलट तो उपसून निर्मिती करतो. पण संत असे नव्हते; नसावेत. ते अंतर्मुख तर होतेच; पण अतीउत्कट असेही असणार. त्यांचं लिखाण तेव्हा सुरू होतं. लंपनच्या काही कथा तेव्हाच्या. मग १९६३ नंतर तब्बल तीस वर्षांनी त्या कथा त्यांनी पुन्हा लिहायला घेतल्या. तीस वर्षे! लेखनसंन्यास! का? या पत्राचा परिणाम तर इतका गहिरा झाला नसेल? ते पत्र १९६३ चंच आहे. आणि त्या पत्राच्या शेवटाला संत लिहितात, ‘माझ्या दृष्टिकोनातून कोणीच का विचार करत नाही? शक्तीच संपली माझी. या अशा मन:स्थितीत माझ्या हातून लेखन होणं शक्य नाही. तेही आता संपतच आलं आहे.’ हे विधान पुरेसं बोलकं आहे. एका नाजूक पुरुषाचं हे रडगाणं नाही. एका विचारी पुरुषाला पडलेले ते प्रश्न आहेत. यावेळी मला सारखा स्मरतो आहे तो जोसेफ कॉनरॅडचा ‘लॉर्ड जीम’! त्यालाही अशा उदास, अनाम अपराधी भावनेनं ग्रासलं आणि तो गिल्ट कॉम्प्लेक्स त्याच्या अंतापर्यंत सोबत राहिला. प्रकाश नारायण संतांना तशी काहीशी अपराधी भावना प्रथम आई- आणि मग पत्नीविषयी आली होती का?
आणि नशीब म्हणूनही काही असतंच, नाही? संतांना मानसन्मान सारे उशिरा मिळाले. आणि मिळू लागले तोवर ते निवर्तलेही. त्यांच्या दोघांचा नशिबाचा ग्राफ ‘अमलताश’मध्ये स्पष्ट दिसतो. कुठलंही निखळ सुख मिळण्याच्या क्षणी काहीतरी अमंगल घडतच असे या दोघांच्या जगण्याजवळ. दोघांच्याच काय, साऱ्या घरातच. इंदिरा संत आणि त्यांचे पती यांच्या स्वप्नांचा वियोग संतांच्या मृत्यूमुळे असाच तडकाफडकी झाला नव्हता का? नवव्या वर्षी हरवलेलं पितृछत्र हा प्रकाश संतांचा भोग होता. आणि क्रमाक्रमाने ज्याची निर्मिती कासवासारखी आत मान घालते आहे अशा नवऱ्याची जोडीदार होणं हा सुप्रिया दीक्षितांचा प्राक्तनयोग होता. पण ते त्यांना नीटसं कळालं का? जाणवलं का? दैनंदिन जगण्याच्या धुमश्चक्रित, सतत येणाऱ्या गंभीर आजारपणांमध्ये ते शक्य झालं नसावं. किंवा कळूनही काय करावं, असा प्रश्न त्यांना पडला असावा. जशी एक्झुपेरीची कॉन्स्टेला ही ‘म्युझ’ होती, लेखनाला प्रेरणा देणारी देवता होती; सुनीताबाई या पुलंच्या कार्यतत्पर मॅनेजर होत्या; तशा सुप्रिया दीक्षित या संतांच्या नक्की कोण होत्या? सुमी- संतांमधल्या आतल्या लंपनची? कदाचित. पण मग ती ओळख तिथवरच राहील काय! ‘अमलताश’ वाचताना सारखा प्रश्न पडतो की, हे दोघं नक्की मित्र झाले होते का एकमेकांचे? आणि मी एकतर्फी लिहीत नाही. प्रकाश संतांमधला नवरा हा पुरेसा पुरुषप्रधान होता. सुप्रियाबाईंच्या वैद्यकीय व्यवसायाला त्याने दिलेलं प्रोत्साहन हे अवेळी, अपुरं आणि वरवरचं असं आहे! मी आणि माझ्या ज्येष्ठ साहित्य अभ्यासक मैत्रीण सरोज देशचौगुले ‘अमलताश’वर गप्पा मारत होतो तेव्हा त्या पटकन् म्हणालेल्या, ‘पण आशुतोष, एकात एक हात घालून ते दोघं खरंच किती दूरवर आले होते हे नकळे!’
पण हे असं असतंच- नाही? नवरा-बायको नातं हे अगम्यच असतं पुष्कळदा. त्या दोघांनी एकमेकांसोबत अनेक विपरीत अनुभव घेतले; कडू औषधं जगताना प्यायली, हे नक्की! दोघंही अशा ‘ट्राइंग’ परिस्थितीत एकवटत गेले, हेही तितकंच खरं. पण सगळंच काही काळं नसतं. ‘अमलताश’ कादंबरी मानली तर त्यामधली श्रीनिवास आणि सुप्रियाबाईंची आई ही दोन पात्रं फार सकारात्मक साथ देणारी आहेत. श्रीनिवास विनायक कुलकर्णी आणि प्रकाश संत यांच्यामधला उत्कट, संयत, पण अबोल पुरुष-मैत्रीचा धागा त्या पुस्तकात अखंड दिसतो. श्रीनिवास जेव्हा जेव्हा संतांच्या मदतीला धावून येतात तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं. इंदिरा संत गेल्यावर अबोलपणे प्रकाश संतांच्या पाठीवर हात ठेवून श्रीनिवास बसतात तेव्हा आपल्याला वाटतं- आपल्याच पाठीवर कुणी हात ठेवला आहे. त्या मैत्रीचे अनेक गुप्त पदर ‘अमलताश’मध्ये नसणार, हे उघडच आहे. पण आपण तर्क करू शकतो. तीच गोष्ट सुप्रियाबाईंच्या आईची. तिचे व्यावहारिक सल्ले हे केवढे मोलाचे ठरतात संतांसाठी! आणि या आई मानीपणे इंदिराबाईच ‘बॉस’ असल्याने (आणि विहीणही!) नोकरी सोडून थेट रत्नागिरीत ट्रेनिंग कॉलेजात प्रिन्सिपॉल म्हणून रुजू होतात. त्या मगाचच्या प्रकाश संतांच्या पत्राच्या काळातच या आई मुलगी-जावयाला पत्रात लिहितात, ‘आता यात.. या वागण्यात, या वाटण्यात, या वृत्तीत बदल होणार नाही. ते नित्याचंच. यातूनच आता तुम्ही संसारात आनंद मानला पाहिजे. हळुवार असून चालणार नाही. आता सोडून द्या या गोष्टी काळाच्या प्रवाहात. आपलं कर्तव्य आपण करत राहायचं. आपल्या संसाराची नवी स्वप्नं रंगवा!’ किती अचूक सल्ला आहे हा! पण शेवटी तो स्वीकारणं आणि अमलात आणणं हे प्रत्येकाच्या पिंडावर अवलंबून असतं. प्रकाश संतांचा पिंड शरीरापार गेलेल्या बापाला, मनापार स्वत:हून गेलेल्या आईला आणि सुमीसारख्या छोटय़ा मैत्रिणीला शोधणारा फार व्यामिश्र असा पिंड होता.
हे पुस्तक वाचल्यावर त्यातले अनेक दोष आपण दाखवू शकू- संपादनाचा अभाव, पसरट मांडणी, मेडिकल तपशिलांचं इंग्रजी लिपीतलं जंजाळ (जे मी डॉक्टर असूनही मला चांगलंच व्यत्यय आणत गेलं वाचताना) किंवा लेखिकेच्या शैलीची मर्यादा. पण हे सगळं एक अंग झालं. एकदा का ते पुस्तक ‘साहित्य’ या समीक्षा-आवरणातून बाहेर काढून बघितलं, की ते भारी वाटतं! आणि ते भारी वाटतं, कारण ती गोष्ट काही केवळ संतांच्या घरातली नसते. ती सगळ्या जगाच्या पाठीवर अनेक संस्कृतींमध्ये नांदत असते. ‘अमलताश’ला प्राप्त झालेली वैश्विकता हे लेखिकेचं मोठं श्रेय आहे. कित्येकदा मला मागे झुंपा लाहिरीची ‘नेमसेक’ ही नावाजलेली कादंबरी आठवत होती- मग तो मुलाच्या जन्माचा प्रसंग असो, नाहीतर मुलगी परदेशात शिकायला जाते तेव्हाची ताटातूट असो. ती गोष्ट केवळ या बेळगाव-कऱ्हाडच्या कुणा संत कुटुंबीयांची नव्हेच. ती अनेक टप्प्यांवरती तुमची- आमची साऱ्यांची गोष्ट आहे!
आणि मग तो संतांचा अपघाती मृत्यू! त्यांच्या खडतर नशिबाचे भोग शेवटपर्यंत काही सुटले नाहीत. स्कूटरवरून भाजी आणायला गेलेला माणूस ‘हेड इन्जुरी’ होऊन कुठेच, कधीच परतत नाही, हे केवढं भयाण असतं. ज्याची निर्मिती आता लंपनचं तारुण्यही मांडायला अधीर झाली होती- संत लिहीणार होते तरुण लंपनवर- त्या सर्जकाच्या बाबतीत तर ते अजून भयाण, उजाड असं काही असतं. लॉर्ड जीम गोळ्या छातीवर घेत मरतो तेव्हा कॉनरॅडने म्हटलंय, ‘And thatls the end. He passes away under a cloud, inscrutable at heart, forgotten, unforgiven and excessively romantic.’ संतांना समीक्षक रोमँटिक म्हणू शकतात. आणि ती व्यक्ती थांग न लागणारी होती, हेही खरे. unforgiven होते का ते? त्यांना ज्या चुका वाटत होत्या त्या कुणी क्षमेनं पुसून टाकल्या होत्या का? पण forgotten ते नव्हते, नाहीत- कुणीच ‘संत’ नाहीत. ती इंदिरा नावाची उत्कट, जिद्दी कवयित्री आई, तो प्रकाश नावाचा मानी, मनस्वी, हळव्या गाभ्याचा शाप किंवा वरदान घेऊन जन्मलेला निरलस मुलगा आणि ती अनुभव पचवत संसार रेटून नेणारी सुप्रिया किंवा सुमी! त्या गोष्टीच्या कारुण्याला तळच नाही. आणि इतक्यात ढगांमागे जात विस्मरणात जाईल इतकी ती ‘सहजी’ही नाही.
डॉ. आशुतोष जावडेकर – ashudentist@gmail.com
संग्रहित लेख, दिनांक 31st Jul 2016 रोजी प्रकाशित
लंपनची अवघड गोष्ट!
श्रीनिवास जेव्हा जेव्हा संतांच्या मदतीला धावून येतात तेव्हा आपल्यालाही बरं वाटतं.
Written by डॉ. आशुतोष जावडेकर
Updated:

First published on: 31-07-2016 at 01:01 IST
मराठीतील सर्व ‘वा!’ म्हणताना.. बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dr ashutosh javadekar article