कवी ग्रेस म्हटलं की मला ‘फॅशन’ चित्रपटामधली कंगना रनावतची ‘एन्ट्री’ स्मरते. रॅम्पवर फॅशन शो सुरू होणार आहे. ग्रीनरूममध्ये जाणत्या आणि नव्या मॉडेल्सची लगबग चालू आहे. कंगना तिच्या नादात आहे. टीम मॅनेजर सगळ्यांना सूचना देते. कंगना आपल्या मस्तीत त्याकडे सपशेल दुर्लक्ष करते आहे. एका हातात मद्याचा पेला आहे; एक हात मोबाइलवर व्यस्त आहे. फॅशन शो सुरू व्हायची वेळ आलीच. ही बया धडपणे चालू तरी शकेल का, अशी शंका येते आहे. ढकलतं मागून तिला कुणीतरी. चालू लागली आहे ती. अंधाऱ्या पॅसेजमधून स्टेजपर्यंत जाताना तिची चाल आपसूक तेज धारण करते. नजर क्षणात ग्रेसांच्या शब्दात ‘एकांतनादा’त जाते आणि तपस्वी देहाचं बळ पाजळू लागते! झालीच तिची ‘एन्ट्री’! लाइट्सही पडलेत. चालू लागते आहे ती- आणि कशी? वाघिणीसारखी! मगाचचं ते स्वकेंद्रित हरवून जाणं लोप पावलंय आता. थेट, आत्मविश्वासपूर्वक ती जणू एखाद्या नग्न सत्याला भिडते आहे. ग्रेसांच्या कवितेसारखीच! तशीच झळझळीत साहित्याच्या रॅम्पवर प्रेक्षकांचे डोळे दिपवून टाकत स्वत:च्या मस्तीत, तोऱ्यात, थाटात, ‘हू केअर्स?’ असं म्हणत निरंतर चालत राहणारी ग्रेसांची कविता नाहीये का? तो लयीचा सावध, हलका नाच, शब्दांचं अनवटपण, आशयाची गूढता, आई आणि प्रेयसी, गायी आणि संध्याकाळ, पुरुष आणि वैष्णवी, कंदील आणि दृष्टान्त. आणि या सगळ्यावर पांघरूण घालत असणारा- माझ्या ‘मुळारंभ’मधला जिंदीया म्हणतो तसा- ‘की फर्क पैंदाये?’ असं आत्मविश्वासाने म्हणणारा, गुंजणारा अॅटिटय़ूड! ‘सांध्यपर्वातील वैष्णवी’मध्ये तो अॅटिटय़ूड फडर्य़ा इंग्रजीत कविता वाचण्याआधी वाचकाला बजावत सांगतो, ‘‘जे कोण माझ्यापाशी येणार आहेत त्यांनी नीट ध्यानात घ्यावं की, माझ्यापाशी येणं हे ‘डेंजरस’ आहे. ‘Your old arrangements will be disturbed.
आणि खरंच आहे ते. ग्रेसांची कविता वाचली आणि माणूस क्षणार्धात आपल्या कामाला लागला असं होत नाही. कविताच कशाला, त्यांची झालेली गाणीही! खरं तर जनसामान्यांपर्यंत ग्रेस हे या गाण्यांमुळेच पहिल्यांदा पोचले. त्यांच्या कवितेत आर्त, वाहतं गाणं होतंच. सम होती. तिय्या होता. नादाचं आवर्तन तर होतंच. हृदयनाथांसारख्या तितक्याच अवघड संगीतकारानं ते आतलं गाणं मुखरीत केलं. तसं करताना दोन सर्जकांची प्रतिभा जणू एकवटली. ‘घर थकलेले संन्यासी’ असो, नाहीतर ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस..’ असो; ती गाणी आपल्याला खोलवर नेतात. आपल्या आतलं जे गुपित असतं ते जणू त्या गाण्यांना कळतं. ग्रेसांवर दुबरेधतेचा शिक्का असताही ही गाणी अगदी जनसामान्यांनाही आवडण्याची कारणं दोन.. पहिलं- ते गहिरं संगीत आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे- जो माझा लाडका मुद्दा आहे- की ग्रेसांच्या कवितेमधील एक-एक ओळ हीदेखील अनेकदा स्वतंत्र कविता असते. त्या कवितेमधल्या सगळ्या चरणांचं ‘एकसमयावच्छेदे’ अर्थ लागणं हे दुस्तर आणि क्वचित प्रसंगी अशक्यही होतं. पण त्यामधली एकेक चरणं ही स्वयंपूर्ण कवितेसमान असतात. ‘ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता’ ही ओळ जर त्यातील प्रत्येक शब्द स्वतंत्र ओळीत लिहून मुद्रित केली तर ती एक अख्खी, स्वतंत्र, नवीन कविता ठरू शकेल. ग्रेसांच्या दुबरेधतेकडे जाताना वाचक या तऱ्हेने बघू शकतो आणि मग ती वाट थोडी सुकर होऊ शकते. अरुणा ढेरे यांच्याशी खूप पूर्वी गप्पा मारताना त्यांनी केलेलं एक विधान माझ्या अद्याप स्मरणात आहे. ‘‘बाकी कवी पटातलं घटात आणतात, ग्रेस घटातलं पटात नेतात,’’ असं त्या म्हणाल्या होत्या. आणि ते पदोपदी ग्रेस वाचताना जाणवतं. अर्थात ती दुबरेधता अपरिहार्य होती की नाही, यावर अनेकांचं दुमत आहे. राजीव काळे यांनी आपल्या एका लेखात फार उत्तम तऱ्हेनं म्हटलं होतं की, खाजगी, आतले अनुभव मांडताना ग्रेसांनी गूढतेचं कुंपण त्याभोवती घातलं. आणि मग गूढतेचं भलंथोरलं कुंपणच त्यांना विलक्षण प्रिय होत गेलं.

मी हे आत्ता चाल देत गातोय ते ग्रेसांचं संवेदन गूढ आहे का सरळ? : ‘काय झाले ग बोटाला बाई बांधलिस चिंधी / मला सांग अगोदर सूर्य बुडण्याच्या आधी.’ मला द्रौपदी आठवते आहे, मला महेश एलकुंचवारांची ‘मौनराग’ धारण केलेली आई आठवते आहे, आणि ‘पुनरागमनाय च’चा लगोलग उमटणारा टाहोही! छे ! मला माझ्या दोस्तांना मदतीला हाकारायला हवं. हा काय एकटंदुकटं करायचा ट्रेक नाही! फेसबुक उघडत मी लिहितोय, ‘‘मित्र- मैत्रिणींनो, कवी ग्रेस म्हटलं की पहिलं मनात काय येतं ते सांगा!’’ आणि काय वेगाने धपाधप कॉमेन्ट्स पुढे दिवसभर पडताहेत. लेखक, वाचक, पत्रकार, गायक सारे त्या ग्रेस-यात्रेत आलेत. जणू ग्रेस आमच्या साऱ्यांच्या आत तितकाच, तसाच, ठामपणे आपलं स्वत:चं घर करून आमच्या हृदयाजवळ कुठेसा थांबून रहिला आहे! हा तरुण मित्र अमित कुलकर्णी म्हणतोय, ‘‘ग्रेस- कवितेतून आईला शोधणारा मुलगा.’’ उज्ज्वला निमदेवकर दुबरेध शिक्क्याविषयी म्हणताहेत, ‘‘ज्या (कविता) भावतात; त्या समजतात!’’ लेखक-समीक्षक संजय भास्कर जोशी त्यांचे ग्रेसांवरचे लेख धाडताहेत आणि ‘ग्रेस आपल्यातील कवी उजागर करतो,’ असं सांगताहेत. अस्मिता मोहिते मला, हा कवी सही करताना ‘मी ग्रेस’ असं लिहायचा, हे तर सांगत आहेतच आणि त्यासोबत त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व त्या सहीतून जाणवत असे, असंही यथार्थपणे उलगडून सांगताहेत. भाऊसाहेब अजबे-पाटील हा तरुण मित्र म्हणतोय, ‘‘ग्रेसची कविता काय सांगते हे जरी सांगता आलं नाही, तरी तिने आपल्या अंतर्मनात निर्माण केलेली स्पंदनं मात्र नक्कीच सांगता येऊ शकतात.’’ आणि पटतंच आहे ते मला. ल. सि. जाधवांसारखा समर्थ कादंबरीकार त्यांच्या आणि ग्रेसच्या एका सुंदर संवादाची आठवण काढताहेत. ल. सि. विचारतात, ‘‘कविता ही जर भावनेचं उत्कट अभिव्यक्त रूप असेल तर तिनं दुबरेध, अनाकलनीय का व्हावं?’’ ग्रेस उत्तरतात, ‘‘आयुष्य कुठे सुबोध आहे? कपाळ दुखू लागलं तर बाम लावता येतो, पण ललाट दुखू लागलं तर?’’ आणि मी त्या संवादाला ‘वा’ म्हणत माझ्या सगळ्या दोस्तांचे आभार मानतो आहे. त्यांनी मला या कवीच्या अनेक बाजू आत्ता दाखवल्या आहेत. पुस्तक अर्पण करतात तसा काही सदर-लेख करीत नाहीत; () पण मी म्हणेन, या लेखाचा हक्क माझ्या या फेसबुक-मित्रांचा!
आणि आता मग मला त्वरेने कवितेकडे वळायला हवं. बस्स! जे पान समोर येईल त्यावर लिहायचं. आणि ही ‘रॉबिन्सन जेफर्सचे घर’ नावाची कविता समोर आली आहे! आहा! संदर्भ माहीत नसल्यानेच ही दुबरेध कविता वाटली असणार. पण कवीनं काही धुक्यात ठेवलेलं नाही. रॉबिन्सन जेफर्सचं नाव शीर्षकात आहेच. ‘समुद्रापुढे बांधलेल्या घराचे, मला आज आले पुन्हा आठव / पियानोतल्या प्रार्थनांच्या स्वरांचे शिरे काळजाच्या तळी वैभव..’ मला त्या अमेरिकन कवीनं स्वत:च बांधलेल्या कॅलिफोर्नियामधल्या ‘टॉर हाऊस’ची माहिती आहे. त्याने ग्रॅनाइटमध्ये बांधलेलं ते घर आणि त्या घरात राहणारी त्याची पत्नी, सखी, सहचरी, प्रेयसी ऊना! ग्रेसांना ती जेफर्सची आईही वाटत होती का? हा सुंदर फोटो ‘गुगल’ माझ्या पुढय़ात आणतंय. पियानोवर बसलेली देखणी ऊना आणि काहीसं सावध अंतर राखून मागे खुर्चीवर बसलेला जेफर्स! पण त्याची नजर आत्मीयतेची आहे. लगतच डायनिंग टेबल असणार शेजारच्या खोलीत. ‘कधी बर्फकालीन मासे किनाऱ्यात येती मुलांच्या गळाच्या पुढे’! याच टेबलावर डीलन थॉमस आणि जेफर्सच्या गप्पा व्हायच्या. हे ग्रेसांचेच गणगोत. ग्रेस असणारच तेव्हा तिथे विदेही रूपात. हा समोरचा क्रूस त्याखेरीज का त्यांना दिसला? ‘खिळ्यांना कळेना कुठे क्रूस न्यावा, प्रभूने अशा पापण्या झाकल्या..’ जेफर्सही म्हणाला नव्हता का?-
‘i was heaping the bones of the old mother
To build us a hold against the host of the air…l
ती जुनीजाणती आदिमाय- जेफर्सची आणि ग्रेसांचीही! आणि मग कवितेच्या शेवटाला ग्रेस म्हणताहेत : ‘मला वाटते निर्मितीच्या तळाशी पुन्हा तोडतो हा घराचा लळा..’ आणि मग मला पुन्हा ती रॅम्पवरची कंगना रनावतच स्मरते आहे! सारा लळा तोडून वाघिणीसारखी चालणारी, देहाचं सामथ्र्य दाखवणारी ती कंगना. आणि देहाचेच नव्हे, तर विदेही अनुभवही कवळीत आपल्याच मस्तीत, गुंगीत, नादांच्या हजारो- हजार आवर्तनांवर स्वार होत पारलौकिकाच्या रॅम्पवर दौडत चाललेला तो ग्रेस नामक कवी!
तो रॅम्पही विलक्षण आहे! आणि तो कवी? – तो आमचाच आहे, आमच्यातलाच आहे. आणि तरी लोकविलक्षण आहे!
ashudentist@gmail.com

Who is heir of Babasaheb ambedkar Gavai or Ambedkar
बाबासाहेबांचे वारसदार कोण? आंबेडकर की गवई?
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Sanjay Rauts statement protested by Thane Small Scale Industries Association
संजय राऊत यांच्या वक्तव्याचा ‘टिसा’कडून निषेध
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Maharashtra vidhan sabha election 2024 Confusion in Mahavikas Aghadi will be profitable for Minister Suresh Khade
महाविकास आघाडीतील गोंधळ मंत्री सुरेश खाडे यांच्या पथ्थ्यावरच
batenge to katenge bjp vs congress
भाजपच्या ‘बटेंगे’ला काँग्रेसचे ‘जुडेंगे’
Chhagan Bhujbal statement that he is involved in power for development
ईडीमुळे नव्हे, तर विकासासाठी सत्तेत सहभागी; छगन भुजबळ यांची सारवासारव