पालखी सोहळा सातारा जिल्ह्य़ात
टाळ-मृदंगांच्या तालात विठू नामाचा गजर करीत पवित्र नीरा नदीमध्ये संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना स्नान घातल्यानंतर पालखी सोहळ्याने शनिवारी हैबतबाबांच्या सातारा जिल्ह्य़ात प्रवेश केला. वाल्हे येथून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळ्याने लोणंदकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. िपपरेखुर्द येथे न्याहरी उरकून पालखी सोहळ्याने सकाळी साडेदहा वाजता नीरा नगरीत प्रवेश केला.
नीरा नगरीत सरपंच दिव्या पवार यांच्यासह असंख्य भाविकांनी सोहळ्याचे स्वागत केले. पालखी तळावर नीरा पंचक्रोशीतील भाविकांनी माउलींच्या दर्शनासाठी गर्दी केली होती. माउलींच्या पालखी सोहळ्यात नीरा स्नानाला मोठे अधिक महत्त्व आहे.
पालखी सोहळ्यात इंद्रायणी, नीरा, चंद्रभागा या नद्यांतील स्नानाला अधिक महत्त्व आहे.
नीरा भींवरा पडता दृष्टी
स्नान करिता शुद्ध सृष्टी
अंती तो वैकुंठ प्राप्ती
ऐसे परमेष्ठी बोलिला..
नीरा स्नानासाठी दुपारी दीड वाजता पालखी सोहळा नदीकाठी आला. आपल्या वैभवी लवाजम्यासह आकर्षक फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात विराजमान झालेल्या ज्ञानोबारायांच्या पादुकांनी नीरा नदी पार करून दुपारी दीड वाजता सातारा जिल्ह्य़ाच्या हद्दीत प्रवेश केला. नीरा स्नानासाठी माउलींच्या पादुका हैबतबाबांचे वंशज राजाभाऊ पवार आरफळकर यांच्या स्वाधीन केल्या. त्यांच्या समवेत पालखी सोहळा प्रमुख डॉ. अभय टिळक होते. माउली, माउली नामाचा जयघोष करीत नीरा नदी तीरावरील दत्त घाटावर पादुका आणण्यात आल्या.
दत्त घाटावर हजारो भाविकांनी गर्दी केली होती. नीरा स्नानाच्या मार्गावर राजश्री जुन्नरकर हिने सुंदर रांगोळी काढली होती. त्यानंतर पादुकांची धार्मिक, भक्तिमय वातावरणात पूजा झाल्यानंर पालखी लोणंदकडे जाण्यासाठी निघाली. पुरंदर तालुक्यामध्ये सासवड, जेजुरी, वाल्हे असे माउलींच्या पालखीचे चार मुक्काम असल्याने सारी शासकीय यंत्रणा व्यवस्थेमध्ये गुंतली होती. तालुक्यातील सारे वातावरण भक्तिमय झाले होते. माउलींचा पालखी सोहळा सातारा जिल्ह्य़ातील लोणंदकडे निघाला, तेव्हा साऱ्यांनाच भावना दाटून आल्या. पुणे जिल्ह्य़ातून निरोप देण्यासाठी पोलीस अधीक्षक सुवेज हक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक भरते, उपजिल्हाधिकारी रमेश काळे, प्रांताधिकारी संजय अस्वले, तहसीलदार सचिन गिरी, पोलीस उपअधीक्षक वैशाली सातपुते, पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे, उपनिरीक्षक श्रीकांत देव, गणेश िपगुवाले यांच्यासह जिल्हा प्रशासनाचे अधिकारी उपस्थित होते. सायंकाळी पाच वाजता लोणंद नगरीत पालखी सोहळा विसावला.
पहिले उभे रिंगण आज
रविवारी (२५ जून) पालखी सोहळ्यातील पहिले उभे रिंगण चांदोबाचा लिंब येथे दुपारी होईल. पालखी सोहळ्यात तरडगावजवळील चांदोबाचा लिंब, वाखरीजवळील बाजीराव विहीर आणि पंढरपूरजवळील इसबावी येथे उभे रिंगण होते. तर सदाशिवनगर, खुडुस फाटा, ठाकूरबुवा व वाखरीजवळ गोल रिंगण घेण्यात येते.