पंढरीसी जावे ऐसे माझे मनी ।
विठाई जननी भेटे केंव्हा॥
न लगे त्याविण सुखाचा सोहळा ।
लागे मज ज्वाळा अग्निचिया ॥
तुका म्हणे त्याचे पाहिलिया पाय ।
मग दुख जाय सर्व माझे॥
इंदापूरकरांचा निरोप घेऊन संत तुकाराम महाराज पालखी सोहळा बुधवारी सकाळी पुणे जिल्ह्य़ातून मार्गस्थ झाला. पालखी सोहळा गुरुवारी (२९ जून) सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे.
संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा बुधवारी दुपारच्या विश्रांतीसाठी बावडा गावी थांबला होता. ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पालखी पालखीतळावर आणली. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. बावडय़ात दुपारी वैष्णवांच्या सेवेत गावकरी दंग झाले होते. अनेक मंडळांनी वारकऱ्यांना विविध सेवा पुरविल्या. हर्षवर्धन पाटील यांच्या निवासस्थानी पालखी सोहळा प्रमुख व विश्वस्तांचा सत्कार करण्यात आला. दुपारची विश्रांती घेऊन सोहळा सराटी मुक्कामी दाखल झाला. इंदापूर बाजार समितीचे अध्यक्ष अप्पासाहेब जगदाळे यांनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले. दरम्यान गुरुवारी सकाळी संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरास्नान घालण्यात येणार आहे. स्नानानंतर पालखी सोहळा सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश करणार आहे.
विठुरायाच्या दर्शनासाठी आतूर झालेल्या वैष्णवांनी पालखी सोहळ्यासमवेत महत्त्वाचा टप्पा पार केल्याने त्यांच्यात समाधान दिसत होते. सोलापूर जिल्हा प्रशासनाने पालखी सोहळ्याच्या स्वागताची व व्यवस्थेची जोरदार तयारी केली आहे.