महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी नगरीत संत ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्यावर भंडाऱ्याची मुक्त उधळण करत पालखीचे जोरदार स्वागत करण्यात आले. विठू नामाच्या गजराबरोबरच िदडीतील वारकरी बांधवांनी ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ असा जय घोष केल्याने सारे वातावरण भक्तिमय झाले होते. पालखी सोहळा जेजुरीजवळ आला असताना लांबून ऐतिहासिक खंडोबा गड दिसू लागताच वारकऱ्यांच्या भक्तिप्रेमाला उधाण आले. दिंडय़ातील वारकरी टाळमृदुंगांच्या तालावर माउली, संत तुकाराम, संत एकनाथ महाराज यांची भारुडे, पदे, अभंग गाऊ लागले.
अहं वाघ्या, सोहम वाघ्या प्रेमनगरा वारी
सावध होऊन भजनी लागा देव करा कैवारी
मल्हारीची वारी, माझ्या मल्हारीची वारी..
असे अभंग म्हणून वारकऱ्यांनी मल्हारी वारी मागितली. अठरापगड जातींचे श्रद्धास्थान असलेला खंडोबा व पंढरीचा विठोबा या दैवतांच्या भक्तिरसात सारे जण न्हाऊन निघाले.
ज्ञानेश्वर माउलींचे धाकटे बंधू सोपानदेवांच्या सासवड नगरीतून गुरुवारी सकाळी पालखीने जेजुरीकडे येण्यासाठी प्रस्थान ठेवले. वाटेत बोरावके मळ्यात सकाळची न्याहारी व यमाई शिवरीत भोजन उरकून पालखीने सासवड ते जेजुरी हा सतरा किलोमीटरचा टप्पा पार केला. पालखीने सायंकाळी पाच वाजता जेजुरी नगरीत प्रवेश केला. जेजुरीच्या नगराध्यक्षा वीणा सोनवणे, उपाध्यक्ष गणेश निकुडे आणि सर्व नगरसेवक, माजी नगराध्यक्ष दिलीप बारभाई, प्रभारी मुख्याधिकारी विनोद जळक, मरतड देवस्थानचे प्रमुख विश्वस्त अॅड. वसंत नाझीरकर, विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे, अॅड. दशरथ घोरपडे, सुधीर गोडसे, संदीप घोणे, अॅड. किशोर म्हस्के यांची या वेळी उपस्थिती होती.
पालखीवर भंडाऱ्याची उधळण करून मोठय़ा उत्साहात पालखीचे स्वागत करण्यात आले. पालखी सोहळा सायंकाळी साडेपाच वाजता कोळविहिरे रस्त्यावरील नवीन पालखीतळावर पोहोचला. तेथे समाज आरती करण्यात आली. समाजाआरतीनंतर विश्वस्त मंडळ व अधिकारी यांच्यामध्ये झालेल्या बठकीच्या वेळी सोहळाप्रमुख अभय टिळक, प्रमुख विश्वस्त डॉ. अजित कुलकर्णी, विश्वस्त योगेश देसाई, प्रांत संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते, नगराध्यक्षा, खंडोबा देवस्थानचे विश्वस्त आदी उपस्थित होते.
पालखी तळाच्या जागेबाबत प्रांत संजय असवले यांनी सध्याची जागा लोणारी समाज संघटनेची असून त्यांच्याकडून ही जागा कायम स्वरूपी घेण्यासाठी प्रयत्न चालू असल्याचे सांगितले. सारी जेजुरी नगरी वारकरी बांधवांचे आदरातिथ्य व सेवा करण्यात गुंतली होती. जेजुरीतील चिंचेची बाग, छत्री मंदिर, लवथळेश्वर, औद्योगिक वसाहत, रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी तंबू उभारून वारकरी िदडय़ा उतरल्या होत्या. सर्व भागामध्ये पालिकेतर्फे पुरेसा पाणीपुरवठा करण्यात आला. गावामध्ये विविध संस्था, मंडळांच्या वतीने वारकरी बांधवांसाठी भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. पालखी तळावर नगरपालिकेने सपाटीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. सेवा सहयोग संस्थेतर्फे निर्मल वारी योजनेअंतर्गत िदडय़ांच्या मुक्कामाच्या ठिकाणी सातशे तात्पुरती शौचालये बसवण्यात आली होती. पुरंदर महसूल खात्यातर्फे वारकऱ्यांसाठी रॉकेल, गॅस व पाण्याची विशेष व्यवस्था करण्यात आली होती.
वारकऱ्यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखी सोहळ्याबरोबर आलेल्या हजारो वारकऱ्यांनी खंडोबा गडावर देवाचे दर्शन घेतले. पहाटेपासून खंडोबाच्या दर्शनासाठी मोठी रांग लागली होती. दुपारी सारा गड वारकऱ्यांच्या आगमनाने फुलून गेला होता. वारीमध्ये चालून पाय दुखत असले, तरी त्याची पर्वा न करता चारशे पायऱ्यांचा गड चढून आलेल्या वारकरी बांधवांचा उत्साह दांडगा होता.
पंढरीत आहे रखुमाबाई येथे म्हाळसा बाणाई
तिथे विटेवरी उभा, येथे घोडय़ावरी शोभा
तेथे बुक्क्याचे लेणे येथे भंडार भूषणे..
अशा भोळ्या भावाने गायलेल्या भक्तिगीतांमधून वारकऱ्यांमधील भक्तिप्रेमाचे उत्कट भाव जाणवत होते. खंडोबाच्या दर्शनामुळे त्यांचा थकवा निघून गेल्याचे चित्र गडावर पाहावयास मिळाले.
पिवळाधमक भंडारा उधळत सर्वत्र ‘येळकोट-येळकोट जयमल्हार’ असा जयघोष सुरू होता. वारकऱ्यांना लवकर दर्शन मिळावे यासाठी खंडोबा देवस्थानाने विशेष व्यवस्था केली होती.