ज्ञानेश्वर माउलींची पहाटे महापूजा झाल्यानंतर शुक्रवारी जेजुरीतून पालखी सोहळ्याने सकाळी सहा वाजता वाल्हे गावाकडे जाण्यासाठी प्रस्थान ठेवले. रिमझिम पावसाच्या हलक्या सरी आल्याने हवेत गारवा पसरला होता. दौंडज िखडीमध्ये पालखी सोहळा न्याहरीसाठी थांबला. तेथे वारकरी बांधवांनी मटकीची उसळ, भाकरी, चिवडा, भेळ, शंकरपाळी आदी पदार्थ घेऊन न्याहरी उरकली.

या वर्षी िखडीमध्ये पाऊस झाल्याने परिसर हिरवगार झाला होता. सकाळी नऊ वाजता माउलींचा पालखी रथ वाल्हे गावाकडे मार्गस्थ झाला. वाटेत दौंडज येथे सरपंच जगन्नाथ कदम यांनी ग्रामस्थांच्या वतीने स्वागत केले. रामायणकार महर्षी वाल्मिकींच्या तपोभूमीमध्ये माउलींच्या सोहळ्याने अकरा वाजता प्रवेश केला. टाळ-मृदुंगांच्या तालावर विठू नामाचा गजर करतानाच राम नामाचा जय घोष सुरू झाल्याने वातावरणात चतन्य संचारले. सरपंच कल्पना गोळे, उपसरपंच पोपट पवार यांनी पालखीचे स्वागत केले. पालखी रथ येथे न थांबवल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली.

वाल्हे गावापासून पालखीतळ थोडासा लांब आहे. या ठिकाणी पालखी येताच स्थानिक तरुणांनी पालखी खांद्यावर घेऊन समाज आरतीच्या ठिकाणी नेली. जिल्हाधिकारी सौरभ राव, प्रांताधिकारी संजय असवले, तहसीलदार सचिन गिरी, जेजुरीचे सहायक पोलीस निरीक्षक रामदास वाकोडे यांच्यासह ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. या वर्षी समाज आरती लवकर झाल्याने वारकरी व सर्वच पालखी सोहळ्यास विश्रांतीसाठी वेळ मिळाला.अनेक ठिकाणी स्वच्छता संदेश व व्यसनमुक्तीचे कार्यक्रम घेण्यात आले. दगडुशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या वतीने पालखी तळावर जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

श्री ज्ञानेश्वर माउलींचा पालखी सोहळा शनिवारी (२४ जून) सकाळी सहा वाजता वाल्हे येथून लोणंद मुक्कामासाठी प्रस्थान ठेवणार असून नीरा नदीमध्ये माउलींच्या पादुकांना विधिपूर्वक स्नान झाल्यानंतर पालखी सोहळा सातारा जिल्ह्य़ातील लोणंद येथे मुक्कामी जाणार आहे.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची जेजुरीतून पायी वारी

जेजुरी, वार्ताहर : शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी शुक्रवारी सकाळी जेजुरी येथे श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या पालखीचे सपत्नीक दर्शन घेतले. त्यानंतर माउलींच्या पालखी सोहळ्यात ते जेजुरीपासून वाल्ह्य़ापर्यंत सहभागी झाले. पायी वारी करत असताना दौंडज िखडीमध्ये त्यांनी अनेक िदडीप्रमुखांशी संवाद साधला आणि टाळ-मृदुंगांच्या तालावर वारकऱ्यांसमवेत विठूनामाचा गजर केला. त्यांच्या समवेत जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, आमदार भीमराव तापकीर, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे सभागृहनेता एकनाथ पवार, तसेच नामदेव ताकवणे, वासुदेव काळे, तालुकाध्यक्ष सचिन लंबाते, अशोक खोमणे, सचिन पेशवे, मरतड देवस्थानचे विश्वस्त डॉ. प्रसाद खंडागळे आदी या वेळी उपस्थित होते. याशिवाय वारीमध्ये दुग्धविकास राज्यमंत्री महादेव जानकर हेही सहभागी झाले होते.

Story img Loader