खासगी रुग्णालयांना लशींची परवानगी देण्याची मागणी

वसई: केंद्र सरकारने १८ ते ४४ वर्ष वयोगटासाठी मोफत लसीकरण सुरू केले असले तरी वसई विरारमधील तरुणांची लशींसाठी परवड सुरूच आहे. लशींचा साठाच नसल्याने केवळ तीन केंद्रावर प्रत्येकी १०० लशी उपलब्ध होत्या. त्यामुळे तरुणांना निराश होऊन परतावे लागले आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयांना परवानगी मिळत नसल्याने गोंधळात आणखी भर पडली आहे. त्यामुळे अनेकांनी मुंबई, ठाण्यात लस घेण्याला पसंती दिली आहे.

महापालिकेच्या आकडेवारीनुसार शहराची एकूण लोकसंख्या २२ लाख ३९ हजार ३५५ एवढी आहे. त्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ९ लाख ३५ हजार तरुणांची संख्या आहे. केंद्र सरकारने २१ जूनपासून १८ वर्षांवरील तरुणांसाठी मोफत लसीकरणाची घोषणा केली.  परंतु शहरातील केवळ तीन केंद्रावर लसीकरणाची सोय असल्याने दोन्ही दिवस गोंधळ उडाला. महापालिकेने प्रत्येक केंद्रात १०० लशी उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यातील ५० टक्के ऑनलाइन आणि ५० टक्के थेट लसी मिळणार होत्या. बुधवारी देखील ऑनलाइन लसीकरणाच्या नोंदी होत नसल्याने तरुण वर्ग संतापले होते.   ज्यावेळी पुरेशा प्रमाणात लशी येतील तेव्हा त्यांचे वाटप केले जाईल अशी माहिती पालिकेच्या प्रमुख वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली. शहरातील साडेनऊ लाख जणांपैकी केवळ ८०६ जणांना पहिली आणि ६९ जणांना लशींचा दुसरी मात्रा देण्यात आली.  इतर महापालिकांना लशी मिळत असताना वसई-विरार महापालिकेला लस का देण्यात येत आहे, असा सवाल सलोनी राजपूत या तरुणीने विचारला. ऑनलाइन नोंदणी कधीच होत नाही ,असे स्वरूप पाटील या तरुणाने सांगितले.

खासगी रुग्णालयांना परवानगी द्या

बुधवारीदेखील अनेक तरुणांनी मुंबई आणि ठाण्यातील खासगी रुग्णालयात लस घेण्याकडे धाव घेतल्याचे दिसून आले.येथील अनेक खासगी रुग्णालयात त्वरित स्लॉट मिळतात आणि लसीकरण लगेच होते असे अनिकेत थोरात याने सांगितले. इतर सर्व शहरात खासगी रुग्णालयांमध्ये लशी मिळतात. मात्र वसई-विरार शहरात अद्याप खासगी रुग्णालयांमधील लसीकरणाला परवानगी देण्यात आलेली नाही. आम्ही सातत्याने पालिकेकडे पाठपुरावा करत आहोत. पण अद्याप आम्हाला परवानगी मिळालेली नाही, असे वसईतील एका खासगी रुग्णालयाच्या संचालकाने सांगितले. पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांच्याशी संपर्क साधला असता आम्ही खासगी रुग्णालयांना परवानगी देण्यासाठी तयार आहोत, त्यांनी आमच्याशी संपर्क करावा असे सांगितले.