वसई – मिरा भाईंदर महापालिकेच्या क्रिडा संकुलातील तरण तलावात बुडून ११ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. रविवारी दुपारी १२ च्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. ग्रंथ मुथा असे या मयत मुलाचे नाव आहे. क्रिडा संकुलातील जीवरक्षकांच्या निष्काळजीपणामुले ही दुर्घटना घडल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे.
भाईदर पूर्व येथील गोल्डन नेस्ट भागात मिरा भाईंदर महापालिकेचा गोपिनाथ मुंडे क्रिडा संकुल आहे. या क्रिडा संकुलाचे व्यवस्थापन खाजगी ठेकेदाराकडे देण्यात आले आहे. नागरिकांना माफकत माफत दरात व्यायाम शाळा बॅंडमिंटन, टेबल टेनिस, बॉक्सिंग आदी विविध खेळांची सुविधा देण्यात आली आहे. या क्रिडा संकुलात तरणतलाव आहे.
रविवारी सकाळी १० वाजता ग्रंथ मुथा (११) हा चिमुकला तरणतलावात नेहमीप्रमाणे पोहण्यासाठी आला होता. मात्र तो पाण्यात बुडाला. त्याला उपचारासाठी तुंगा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मयत घोषीत केले. पालिकेच्याच क्रिडा संकुलातील तरण तलावात ही घटना घडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
माझ्या मुलासोबत इतर अनेक जण तरण तलावात होते. १२ च्या सुमारास सर्वजण बाहेर आले तेव्हा माझा मुलगा दिसला नाही. तेव्हा त्याचा शोध घेतला असता तो तरण तलावात तरंगताना आढळला. १० मिनिटे तो तरणतलाच्या पाण्यात तरंगत होता. जर त्याला वेळीच उपचार मिळाले असते तर तो वाचला असता असे मयत ग्रंथचे वडील हसमुख मुथा यांनी सांगितले. जीवरक्षकांचा निष्काळचीपणा कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी दोषीवंर कडक कारवाई व्हावी, अशी त्यांनी मागणी केली.
आमदार नरेंद्र मेहता यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या घटनेबद्दल त्यांनी दु:ख व्यक्त केले आहे. याप्रकऱणी सीसीटीव्ही तपासून तसेच उपस्थितांचे जबाब नोंदवून सखोल कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. अशा दुर्घटना रोखण्यासाठी सुरक्षेच्या दृष्टीकोनातून अधिकाअधिक उपाययोजना करण्याच्या सुचना प्रशासनानाला देण्यात येतील असे त्यांनी सांगितले.