भाईंदर: जीवरक्षकांनी सूचना दिल्यानंतरही ग्रंथ मूथाने सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्य न घेता पाण्यात उडी मारल्यामुळे ही घटना घडली असल्याचा अजब दावा क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराने केला आहे. या दाव्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे. या कंत्राटदाराला पालिकेचे अभय मिळणार का, असा प्रश्न आंदोलनकर्त्यांच्या वर्तुळात उपस्थित झाला आहे.
गेल्या रविवारी क्रीडा संकुलातील तरण तलावात ग्रंथ मूथा (वय ११) या मुलाचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती. संकुल व्यवस्थापकाच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला असून, नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलिसांकडून तपास सुरू आहे.
महापालिकेचे हे संकुल ‘साहस चारिटेबल ट्रस्ट’ या संस्थेकडे चालवण्यासाठी देण्यात आले होते. त्यामुळे पालिका प्रशासनाने हे कंत्राट तात्पुरते रद्द करून कंत्राटदाराकडून खुलासा मागवला आहे. कंत्राटदाराने दिलेला खुलासा समोर आला असून, या घटनेला ग्रंथच्याच चुकीला जबाबदार धरले आहे.
संकुलात प्रशिक्षित चार जीव रक्षक असून, त्यांनी ग्रंथला पाण्यात जाण्यापूर्वी सुरक्षा आवरण (फ्लोटर) घेण्यास सांगितले होते. मात्र, ग्रंथने ते न घेता थेट पाण्यात उडी मारून पोहण्यास सुरुवात केली. दरम्यान, घटनेच्या वेळी जीव रक्षक इतर मुलांना प्रशिक्षण देत होते. ग्रंथने यापूर्वीही तरण तलावात प्रशिक्षण घेतल्याचा इतिहास असल्यामुळे जीव रक्षकांना परिस्थितीची जाणीव झाली नाही, असा कंत्राटदाराचा दावा आहे.
मात्र कंत्राटदाराच्या या दाव्यानंतर आंदोलनकर्त्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एका नऊ वर्षीय मुलावर संपूर्ण जबाबदारी टाकून कंत्राटदार हात झटकण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. यावरून पालिका प्रशासन येत्या काळात प्रकरण थंड करील, अशी शंका नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
समितीवर आक्षेप
क्रीडा संकुलात घडलेल्या दुर्घटनेचा तपास करण्यासाठी आयुक्त राधा बिनोद शर्मा यांनी चौकशी समिती स्थापन केली आहे. या समितीचे अध्यक्ष अतिरिक्त आयुक्त संभाजी पानपट्टे यांना करण्यात आले असून, शहर अभियंता व क्रीडा अधिकारी यांचाही समितीत समावेश आहे.प्रामुख्याने, ही समिती क्रीडा संकुलाच्या कंत्राटदाराने केलेल्या कामकाजाचा आढावा घेणार आहे. तसेच नागरिकांनी केलेल्या आरोपांची चौकशी करून अहवाल आयुक्तांपुढे सादर करणार आहे. मात्र, चौकशी समितीत आरोपित पालिका अधिकाऱ्यालाच समाविष्ट केल्याने आक्षेप घेतले जात आहेत. त्यामुळे समितीत महिला व बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांचा तसेच उपायुक्त कल्पिता पिंपळे यांचा समावेश करण्याची मागणी होत आहे.
मनसे व पालिका अधिकाऱ्यांवर परस्पर गुन्हे दाखल
गेल्या सोमवारी, या घटनेच्या निषेधार्थ, मनसे कार्यकर्त्यांनी भाईंदर पश्चिम येथील पालिका मुख्यालयात अंत्ययात्रा काढून आयुक्तांच्या दालनाबाहेर तीव्र आंदोलन केले. या वेळी मनसे कार्यकर्त्यांनी सुरक्षा रक्षकांसोबत धक्काबुक्की केल्याचा आरोप पालिका प्रशासनाने केला असून, नवघर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. या तक्रारीवरून जवळपास दहा मनसे कार्यकर्त्यांविरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मंगळवारी नोंदवण्यात आला.
दरम्यान, या कारवाईमुळे संतप्त झालेल्या मनसे महिला पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या सुरक्षा रक्षकांविरोधात विनयभंग व गैरवर्तन केल्याची तक्रार दिली. त्यानुसार संबंधित सुरक्षारक्षकावरही पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.