मूळ निवासी आणि स्थलांतरित ठिकाणच्या शिधापत्रिकेतही नावे; वसई-विरार महापालिकेची शोध मोहीम
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई: काही शिधा धान्य लाभार्थ्यांची नावे ही मूळ निवासी तसेच स्थलांतरित अशा दोन्ही ठिकाणी असल्याने त्यांना दुहेरी लाभ मिळत होता. मात्र आता दुहेरी लाभ शिधा धान्य लाभार्थ्यांचा पुरवठा विभागाकडून शोध सुरू केला आहे. वसईत ११ हजार ७१९ इतके लाभार्थी हे दुहेरी शिधा धान्याचे लाभार्थी असल्याचे उघड झाले आहे.
अन्न पुरवठा विभागाच्या माध्यमातून शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचे वितरण केले जाते. या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत पारदर्शकता आणण्यासाठी शासनाने विविध उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. त्याच पाश्र्वभूमीवर पुरवठा विभागाकडून ‘डी डुप्लिकेशन’ या अंतर्गत दुहेरी धान्याचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.
परराज्यातून अनेक नागरिक हे कामासाठी वसईत स्थलांतरित झाले आहेत. काहींनी वसईतच राहत असल्याने शिधापत्रिका तयार करून त्याचा लाभ घेत आहे. परंतु काही शिधा लाभार्थ्यांची नावे ही त्यांच्या राज्यातील शिधापत्रिकेतही कायम ठेवली असल्याने अशा लाभार्थ्यांना दोन्ही ठिकाणी याचा लाभ मिळू लागला आहे. याचा मोठा परिणाम धान्यपुरवठय़ावर होऊ लागला आहे.
यासाठी केंद्र शासनाने अशा लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांच्या याद्या या पुरवठा विभागाला पाठविण्यात आल्या आहेत. वसईत ११ हजार ७१९ इतके दुहेरी शिधा धान्याचा लाभ घेणारे लाभार्थी आहेत. यात सर्वाधिक लाभार्थी हे उत्तर प्रदेश, बिहार या राज्यातून स्थलांतरित झालेले असल्याची माहिती पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.
पुरवठा विभागाने मिळालेल्या यादीनुसार या लाभार्थ्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. यापुढे या लाभार्थ्यांना केवळ कोणत्या तरी एकाच ठिकाणी धान्याची उचल करता येणार आहे. यासाठी या लाभार्थ्यांकडून जोडपत्र व अर्ज भरून घेतला जाणार आहे. तशा सूचनाही प्रत्येक शिधावाटप केंद्रांना दिल्या आहेत, अशी माहिती पुरवठा अधिकारी रोशन कापसे यांनी दिली आहे.
गरजूंना लाभ देण्यास अडचणी
दुहेरी शिधा धान्य लाभार्थ्यांना दोन्ही ठिकाणी धान्य मिळत असल्याने गरजूंना धान्य देण्यास अडचणी निर्माण होऊ लागल्या आहेत. त्यांची जागाही या दुहेरी लाभार्थ्यांनी अडवून धरली आहे. वसईत ११ हजाराहून दुहेरी शिधा धान्याचे लाभार्थी आहेत. जर हे कमी झाले तर नवीन गरजू लाभार्थी आहेत त्यांना याचा लाभ देण्यास मदत होणार आहे.
दोन्ही ठिकाणी धान्याचा लाभ घेत आहेत, अशा लाभार्थ्यांची यादी केंद्र शासनाने दिली आहे. त्यानुसार त्यांचा शोध घेऊन कोणत्या तरी एकाच ठिकाणी धान्याची उचल करण्याच्या संदर्भात विहित अर्ज भरून घेण्यात येणार आहे.
– रोशन कापसे, पुरवठा अधिकारी वसई तालुका