लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई – नालासोपार्‍यात ५ वर्षांच्या चिमुकल्या मुलीची हत्या झाल्याचे धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. तिच्या १३ वर्षीय आत्येभावान गळा दाबून आणि डोक्यात दगड घालून ही हत्या केली. सर्व नातेवाईक बहिणीचा लाड करत होते. ते सहन न झाल्याने त्याने ही हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिर्यादी मोहम्मद सलमान मोहम्मद रमजान खान (३३) हे नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे राहतात.  त्यांना दोन मुली आहेत. लहान मुलगी शिद्राखातून ही ५ वर्षांची आहे. त्यांची बहिण देखील घरासमोरच रहाते. शनिवारी दुपारी कामावरून त्यांनी मुलगी शिद्राखातून हिला शाळेतून आणले. संध्याकाळी शिद्राखातून घराबाहेर खेळत होती. मात्र बराच वेळ झाला तरी ती परत न आल्याने तिचा शोध सुरू केला. मग सर्व नातेवाईकांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले. एका कंपनीच्या सीसीटीव्ही कॅमेर्‍यात खान यांचा १३ वर्षांचा भाचा शिद्राखातून हिला घेऊन जाताना दिसला. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने डोंगरावर खेळायला गेले असता दोन अज्ञात व्यक्तींनी शिद्राखातूनला मारल्याचे सांगितले. घाबरलेले कुटुंबिय रात्री साडेअकरा वाजता पोलीस ठाण्यात आले. पोलिसांनी मध्यरात्री डोंगरपरिसरात तपास केला असता शिद्राखातूनचा मृतदेह आढळला.

बहिणीचे लाड सहन न झाल्याने केली हत्या

पोलिसांनी १३ वर्षीय मुलीचा कसून चौकशी केली. त्यात विसंगती आढळली होती. अधिक चौकशीत त्याने शिद्राखातूनची हत्या केली. डोंगरात तिला खेळायला नेले आणि तिची हत्या केल्याची कबुली त्याने दिली. याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, शिद्राखातून ही सर्वांची लाडकी होती. सर्व नातेवाईक तिचा लाड करत असायचे. आरोपी १३ वर्षांचा असून मयत शिद्रखातूनचा आत्याचा मुलगा आहे. शिद्राखातूनचा होत असलेला लाड बघवत नव्हता. त्यामुळे संतापून त्याने तिला जवळच्या डोंगरात नेले आणि तिचा गळा दाबला. यानंतर तिच्या डोक्यात दगड घालून हत्या केली. आम्ही विधी संघर्ष बालकास ताब्यात घेतले असून सोमवारी बाल न्याय मंडळापुढे हजर केले जाणार आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख यांनी दिली.