वसई : खेळण्यावरून झालेल्या भांडणात १३ वर्षीय मुलाने आपल्या ७ वर्षीय लहान बहिणीची कटरने गळ्यावर वार करून हत्या केल्याचा प्रकार नालासोपारा येथे उघडकीस आला आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेने या प्रकरणी अल्पवयीन भावाला ताब्यात घेतले आहे. शवविच्छेदन अहवाल आणि मुलीच्या मानेवरील संशयास्पद जखमा यामुळे या प्रकरणाचा उलगडा झाला. मार्च महिन्यात देखील १२ वर्षीय मुलाने आपल्या ६ वर्षीय आत्येबहिणीची गळा दाबून हत्या केली होती.
नालासोपारा पूर्वेच्या संतोषभुवन परिसरात असलेल्या पांडुरंग चाळीत मिथुन शर्मा हे पत्नी आणि दोन लहान मुलासंह राहतात. त्यांचा मोठा मुलगा १३ वर्षांचा तर मुलगी अंजली ही ७ वर्षांची आहे. शर्मा दांपत्य दिवसभर कामाला जातात. त्यांची दोन्ही मुले घरात एकटी असतात. गुरूवारी दुपारी नेहमीप्रमाणे शर्मा पती-पत्नी कामाला गेले होते. त्यांचा मोठा मुलगा खेळण्यासाठी बाहेर गेला होता. काही वेळाने तो घरात आला आणि लहान बहिणी स्टूलवरून खाली पडल्याचे त्याने शेजार्यांना सांगितले. खाली धागा कापण्याचा कटर होता. स्टूलवरून बहिण या कटरवर पडली आणि जखमी होऊन मरण पावली असे त्याने सांगितले होते. त्याच्या वडिलांनीही तशीच फिर्याद दिली होती. या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात गुरूवारी रात्री अपमृत्यूची नोंद करण्यात आली होती.
मात्र तिच्या गळ्याला असलेल्या जखमा या संशयास्पद होता. पेल्हार पोलिसांबरोबर मध्यमवर्ती गुन्हे शाखा या प्रकरणाचा समांतर तपास करत होती. शनिवारी शवविच्छेदनाला अहवाल आला. त्यावेळी अंजलीचा मृत्यू हा गळ्यावर वार करून झाल्याचे स्पष्ट आहे. मध्यवर्ती गुन्हे शाखेचे प्रमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक अविनाश कुराडे यांच्या पथकाने मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली आणि त्याने हत्येची कबुली दिली. विधीसंघर्षित मुलगा हा उनाड मुलगा आहे. तो १३ वर्षांचा असला तरी नापास होत असल्याने तिसरीत आहे, असे त्यांनी सांगितले.याबाबत माहिती देताना पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी सांगितले की, या मुलांचे आई वडील कामावर जातात. मुले घरात एकटी असतात. गुरूवारी अंजलीने मोठ्या भावाला उन्हात खेळायला जाऊ नको म्हणून सांगितले होते. त्यातून त्यांच्यात भाडणं झाली होती. त्यामुळे भावाने तिची हत्या केली.
भावाकडून बहिणीच्या हत्येची दुसरी घटना
भावाकडून लहान बहिणीची हत्या होण्याची पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ही दुसरी घटना आहे. २ मार्च रोजी नालासोपारा पूर्वेच्या श्रीराम नगर येथे शिद्राखातून या ६ वर्षीच्या मुलीची १२ वर्षाच्या आत्येभावाने हत्या केली होती. सर्वजण लहान बहिणीचा लाड करायचे. ते सहन न झाल्याने तिच्या भावाने तिला फिरण्यासाठी जंगलात नेले आणि गळा दाबून तिची हत्या केली. यानंतर डोक्यात दगड घातला होता.