वसईत सुरू असलेल्या कला क्रीडा महोत्सवातील खो खो सामन्या दरम्यान प्रेक्षक गॅलरी कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जण किरकोळ जखमी झाले. शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. जखमी खेळाडू आणि प्रेक्षकांवर पालिकेच्या रुग्णालयात उपचार करून घरी सोडण्यात आले. बहुतांश जखमी महिला खेळाडू होत्या. हे सर्व विरार मधील चिखल डोंगरी आणि अर्नाळा गावातील होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वसई विरार महापालिका आणि वसई कला क्रीडा महोत्सवाच्या वतीने वसईच्या चिमाजी अप्पा मैदानावर ३४ वा कला क्रीडा महोत्सव सुरू आहे. शुक्रवारी या कला क्रीड महोत्सवाचा ४ था दिवस होता. मैदानावर विविध खेळांचे सामने रंगले होते. खो-खो सामन्याच्या वेळी उभारण्यात आलेल्या प्रेक्षक गॅलरीत दोन्ही संघांचे समर्थक मोठ्या संख्येने जमले होते.

हेही वाचा >>> जूचंद्र उड्डाणपुलाच्या कामात निष्काळजी; खडतर पर्यायी रस्ते, धुळीचा त्रास, वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

त्यामुळे साडेसातच्या सुमारास गॅलरी अचानक कोसळली. यामध्ये एकूण १५ जण जखमी झाले. त्यात खेळाडूंसह सामना बघण्यासाठी आलेल्यांचा समावेश होता. सर्व जखमींना वसई पारनाका येथील महापालिकेच्या सर डी.एम.पेटीट रुग्णालयात दाखल करण्यात आले. या सर्व जखमीना किरकोळ दुखापत झाली होती. त्यांच्यावर प्रथमोपचार करून सोडून देण्यात आले.  या दुर्घटनेत कुणी गंभीर जखमी नव्हते. दोन जणांनी पोटात दुखत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. मात्र त्यांच्या एक्सरे तपासणीत काही आढूळून आले नाही. सर्व रुग्णांना उपचार करून सोडण्यात आले, अशी माहिती सर डी.एम.पेटीट रुग्णालयाचे डॉक्टर असलम शेख यांनी दिली.

वसईचे आमदार हितेंद्र ठाकूर तसेच भाजपाचे नेते मनोज पाटील यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. खोखोचा सामना रंगतदार होता त्यामुळे उत्साहात क्षमतेपेक्षासमर्थक प्रेक्षक गॅलरीत चढले. त्यामुळे ही दुर्घटना घडली, असे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी सांगितले. आजवर महोत्सवात अशी दुर्घटना कधी घडली नव्हती. परंतु यापुढे आम्ही आयोजनात अधिक काळजी घेऊ असेही शेट्टी यांनी सांगितले. दुर्घटनेंतर महोत्सवातील इतर सामने सुरळीत सुरू होते.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 15 injured after spectator gallery collapse in vasai art sports festival zws
Show comments