भाईंदर :- शेकडो तरुणांना परदेशात नोकरीला लावण्याचे आमिष दाखवून आर्थिक फसवणूक करणार्या टोळीतील ३ आरोपींना नवघर पोलिसांनी अटक केली आहे. या आरोपींकडून ६ लाख रुपयांचा मुद्देमाल तसेच १४९ पारपत्र जप्त करण्यात आले आहेत.
भाईंदर पूर्व येथील ईगल प्लेसमेंट सर्व्हिसेस कार्यालयाकडून ऑनलाईन तरुणांना परदेशात नोकरी देण्याचे प्रलोभन दाखविण्यात आले होते. यात प्रत्येकाकडून कंपनीने काम करण्यासाठी ७० हजार रुपये घेतले होते. या सर्वांना विमानाची तिकिटे व व्हीजाही देण्यात आले होते. मात्र त्यांचे पासपोर्ट घेऊन कंपनी मालक फरार झाले. याबाबत काही तरुणांनी नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दखल केल्यानंतर हे प्रकरण उजेडात आले. दिडशेहून अधिक तरुणांची फसवणूक झाल्याचे तपासात समोर आले.
नवघर पोलिसांनी या प्रकरणी तपास करून अबरार अहमद मुक्तार शाह, वसीम शाह आणि मोहम्मद सिद्धीकी यांना अटक केली. या टोळीतील अजून तीन आरोपी फरार आहेत. आरोपींकडून ६ लाखांचा मुद्देमाला आणि १४९ पारपत्र जप्त केल्याची माहिती उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे. या टोळीने कुणालाही परदेशात पाठवलेले नव्हते. भाईंदर प्रमाणेच मुंबई, दिल्ली आणि कोलकत्ता राज्यात अशा प्रकारचे कार्यालय थाटून तरुणांची फसवणूक करण्याची त्यांची योजना होती.
हेही वाचा – नालासोपारामधील हॉटेलला आग, पोलिसांच्या सुचनेकडे पालिकेचे दुर्लक्ष, नागरिक रस्त्यावर
नवघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक धीरज कोळी, पोलीस निरीक्षक अशोक कांबळे (गुन्हे) सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पालवे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल तळेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल धायगुडे, पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर आसबे आदींच्या पथकाने कारवाई करून या टोळीला अटक केली.