वसई – वसई विरार महापालिकेच्या स्थापनेनंतर १४ वर्षानंतर पालिकेचा वनवास संपला आहे. ग्रामपंचायत काळापासून असलेल्या १८९ मालमत्ता पालिकेच्या नावावर झाल्या आहेत. महसूल विभागात सातबारा उतार्‍यावर या मालमत्तांवर पालिकेचे अधिकृत नाव आहे आहे. याशिवाय पालिकेने ५० भूखंड शोधले असून त्यांना कुंपण घालून ते संरक्षित केले आहेत.

वसई विरार महापालिकेची स्थापना ३ जुलै २००९ रोजी झाली. त्यापूर्वी वसई तालुक्यात ४ नगरपरिषदा आणि ५२ ग्रामपंचायती अस्तित्वात होत्या. महापालिका स्थापन झाली तेव्हा या सर्व ग्रामपंचायती आणि नगरपरिषदा महापालिकेत विलीन झाल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीच्या नावावर असलेल्या मालमत्ता पालिकेच्या नावावर नव्हत्या. त्यात ग्रामपंचायतीची कार्यालये, समाजमंदिरे, विभागीय कार्यालये, विविध वास्तू, मैदाने, मोकळ्या जागा, रस्ते आदींचा समावेश होता. त्यामुळे अनेकदा कायदेशीर अडचणी येत होत्या. सत्ता महापालिकेची मात्र मालमत्ता ग्रामपंयायतीचा अशी परिस्थिती होती. एकूण २५१ मालमत्ता या ग्रामपंचायतीच्या नावावर होत्या. त्यामुळे मागील वर्षी पालिकेने मालमत्ता विभाग स्थापन केला होता. त्यानुसार या सर्व मालमत्ता शोधून त्यांच्या सातबारावर पालिकेचे नाव चढविण्यात आले आहे. २५१ पैकी १८९ मालमत्तांची महसूल दप्तरी महापालिकेच्या नावाची नोंद करण्यात आली असून उर्वरित मालमत्तांच्या नोंदी करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त नानासाहेब कामठे (मालमत्ता) यांनी दिली.

हेही वाचा >>>टिवरी ग्रामपंचायतीचा इव्हीएमला विरोध, मतपत्रिकेवर निवडणूक घेण्याचा ठराव मंजूर

५० भूखंडे पालिकेच्या ताब्यात

वसई विरार महापालिेका शहराचे एकूण ४२० हेक्टर क्षेत्रफळ आहे. पालिकेच्या मालकिच्या एकूण ८५२ मालमत्ता आहेत. याशिवाय त्यात राज्य शासन, गुरूचरण विभाग, तसेच ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या मालकिच्या जागा होत्या. पालिकेच्या स्थापनेनंतर ग्रामपंचायत आणि नगरपरिषदांच्या जागा महापालिकेच्या अखत्यारित आल्या होत्या. पण त्यांचे सातबारे उतारे पालिकेच्या नावावर हस्तांतरीत झाले नव्हते. पालिकेने अशा ६६ भूखंड सर्वेक्षणानंतर शोधून काढले आहेत. याशिवाय जिल्हाधिकार्‍यांकडून पालिकेला १४ भूखंड मिळाले आहेत. असे एकूण ५० भूखंड पालिकेला मिळाले आहे. या भूखंडांना कुंपण घालून ते देखील संरक्षित करण्यात येत असल्याची माहिती उपायुक्त कामठे यांनी दिली. या भूखंडांची किंमत बाजारभावानुसार कोट्यवधींच्या घरात आहे.

Story img Loader