वसई- नालासोपारा येथील सुधीर सिंग या तरुणाच्या हत्या प्रकरणात पोलिसांच्या पथकाने विविध ठिकाणांहून ६ आरोपींना अटक केली आहे. यातील एका आरोपीला पेल्हार पोलिसांच्या तीन पोलिसांनी पुण्यात थरारक पाठलाग करुन अटक केली आहे. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून पूर्ववैमन्यसातून ही हत्या करण्यात आली होती.
कांदिवलीत राहणार्या सुधीर सिंग (२७) या तरुणाची गुरुवारी रात्री काही गुंडांनी धारदार शस्त्राने वार करून हत्या केली होती. नालासोपारा पूर्वेच्या गावराईपाडा परिसरात ही घटना घडली होती. आरोपींच्या शोधासाठी पेल्हार पोलीस तसेच गुन्हे शाखेची विविध पथके तयार करण्यात आली होती. या प्रकरणी शनिवारी पेल्हार पोलिसांनी ३ आरोपींना, मध्यवर्थी गुन्हे शाखेने दोघांना तर गुन्हे शाखा-२ च्या पथकाने अटक केली आहे. सुरज चव्हाण (२५), अखिलेश सिंग (२७) साहिल विश्वकर्मा (२१) , विकास पांडे (२४) आणि सुरेंद्र पाल (२७) अशी या आरोपींची नावे आहेत.
पुण्यात थरारक पाठलाग
यापैकी अखिलेश सिंग हा पुण्यातील आनंदनगर येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेल्हार पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेचे ३ पोलीस तेथे गेले. मात्र आरोपी पळून गेला. परंतु पोलिसांनी थरारक पाठलाग करून त्याच्या मुसक्या आवळल्या.
मृत सुधीर सिंग एका कॉल सेंटरमध्ये काम करत होता. त्याचा विकास पांडे याच्याबरोबर आर्थिक वाद होता. त्यानेच इतर साथीदारांच्या मदतीने ही हत्या घडवून आणली. कट रचून ही हत्या केल्याने या प्रकरणात १२० (ब) हे कलम वाढविण्यात आल्याची माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक वसंत लब्धे यांनी सांगितले. अन्य फरार आरोपींचा शोध सुरू आहे.