वसई : विरारमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असताना भिंत कोसळून तीन महिला कामगारांचा मृत्यू झाला. मंगळवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. विरार पूर्वेच्या रेल्वे स्थानकाजवळ मनवेलपाडा रस्त्यावर सूर्यकिरण इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू होते. या ठिकाणी १२ मजूर काम करत होते. काम संपवून मजूर हातपाय धुण्यासाठी गेले होते. पाचच्या सुमारास अचानक तेथील भिंत या मजुरांच्या अंगावर कोसळली आणि ते ढिगाऱ्याखाली गाडले गेले. खड्डय़ामध्ये भिंत आणि बाजूचा मुरूम कोसळल्याने ही दुर्घटना घडली.
या दुर्घटनेत साहूबाई सुळे (४५), लक्ष्मीबाई गवाणे (४५) आणि राधाबाई नवघरे (४०) यांचा जागीच मृत्यू झाला तर नंदाबाई नवघरे (३२) ही महिला जखमी झाली. तिच्यावर विरारच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सर्व मृत हे नाका कामगार असून मूळचे मराठवाडय़ातील आहेत.
बिल्डर, ठेकेदारावर गुन्हा
चिराग दोशी या बांधकाम व्यावसायिकाकडून इमारतीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या दुर्घटनेबद्दल बांधकाम व्यावसायिक आणि ठेकेदार भारत पटेल यांच्यावर निष्काळजीपणाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी माहिती विरार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र कांबळे यांनी दिली.