विरार/भाईंदर : वसई, विरार आणि मीरा-भाईंदरमध्ये ३४ ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये वसई-विरारमधील ७ घटनांचा समावेश आहे. काही ठिकाणी फटाक्यांमुळे तर काही ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आगी लागण्याचे प्रकार घडले आहेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

करोनानंतर निर्बंधरहित पहिलीच दिवाळी असल्याने नागरिक मोठय़ा उत्साहाने सणाचा आनंद घेत आहेत. त्यात या वर्षी मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची विक्री  झाली आहे. शहरात मोठय़ा प्रमाणात नागरिकांनी फटाके वाजविले. यामुळे काही ठिकाणी आगी लागल्या यात विरारमधील गोपचरपाडा परिसरात गादीच्या दुकानाला, मोहक सीटी परिसरात एका दुकानाला, नवापूर येथे नारळाच्या झाडाला, वसई फाटा येथे चपलाच्या गोदामाला आग लागली होती. गोदामाच्या आगीत दीड कोटींचे नुकसान झाले. गोदामात अग्निशमन यंत्रणा नसल्याने मालकाला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. नायगाव पूर्व या ठिकाणी घरात आग लागली होती, तर वसई पश्चिमेला के.टी. येथे सत्यम बंगल्याला आग लागली होती, तर इतर ठिकाणी कचऱ्याला आग लागल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे मीरा-भाईंदर येथे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी २७  ठिकाणी आगीच्या घटना घडल्या आहेत. २३ ठिकाणी आग ही साचलेल्या कचऱ्याला लागल्यामुळे ती त्वरित विजवण्यात आली. मसाल्याच्या गोदामाला आणि न्यू गोल्डन नेस्ट फेस २ येथील एका घराला शॉकसर्किटमुळे आग  लागली होती. मीरा रोड येथील अस्मिता रेसिडेन्सीमधील पहिल्या मजल्यावर रॉकेटमुळे आग लागली. या आगीत घराच्या बाल्कनीचा (खिडकीजवळील) संपूर्ण परिसर जळून गेला.  भाईंदर पूर्व येथील गीतानगर परिसरात  गीता पुष्प  या इमारतीच्या सहाव्या मजल्यावर राहणाऱ्या कुटुंबीयांनी  सायंकाळी घरात लावलेल्या दिव्याने अचानक पेट घेतला. अवघ्या काही क्षणात घरातील सर्व इलेक्ट्रिक आणि ज्वलनशील साहित्य पूर्णत: जळून गेले.  सातव्या मजल्यापर्यंत आग वाढत गेली होती.  आगीच्या घटनेच्या ठिकाणी अग्निशमन विभागाने धाव घेतल्यामुळे कोणत्याही स्वरूपाची जीवितहानी झाली नसल्याची माहिती पालिकेचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली.

Story img Loader