लोकसत्ता प्रतिनिधी
वसई : साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या गुढीपाडव्या निमित्ताने वाहन खरेदी करण्याकडे नागरिकांचा कल वाढला आहे. यंदा गुढीपाडव्याच्या निमित्ताने वसई विरार मध्ये हजारो नवीन वाहने खरेदी करण्यात आली आहेत. परिवहन विभागात आठवडाभरात ३ हजार ६२० वाहनांची नोंद झाली असून त्यातून ११ कोटी ६६ लाखांचा महसूल प्राप्त झाला आहे.
मराठी नववर्षाला घरात नविन वस्तू खरेदी करण्याची पद्धत आहे. त्यामध्ये सोने, घर,नवीन गृहोपयोगी वस्तू , यासह वाहने खरेदी करण्याकडे नागरिकांचा अधिक कल असतो. मागील काही वर्षांपासून दसरा दिवाळी प्रमाणेच गुढीपाडव्याला वाहने खरेदीचे प्रमाण वाढत असल्याचे वाहन विक्रेत्यांनी सांगितले आहे. वाहन खरेदी करण्यासाठी पंधरा दिवस आधीपासूनच ग्राहकांची वाहन विक्रीच्या दुकानात रेलचेल सुरू होती. ग्राहकांला हवी असलेली गाडी,तिचा रंग, किंमत, इत्यादी चौकशी सुरू झाली होती. तर काहींनी आधीच गाड्या विक्रीच्या दुकानात जाऊन आगाऊ रक्कम भरून गाड्यांची नोंदणी केली होती.
यंदाच्या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने वसईच्या प्रादेशिक परिवहन विभागात सुद्धा आठवडाभरापासून आवडीचा वाहन क्रमांक व त्या वाहनांची नोंदणी करण्यासाठी नागरिकांनी अर्ज दाखल केले होते. आठवडाभरात वसईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात ३ हजार ६२० नवीन वाहनांची नोंदणी केली असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे. यात दुचाकी २ हजार ४२५, चारचाकी वाहने ६२६, ऑटो रिक्षा १४०, मालवाहतूक करणारे टेम्पो व पिकअप २७३, मोटार कॅब ११५, क्रेन ६, कृषी ट्रॅक्टर ५, बस ४, व इतर १६ वाहनांचा समावेश आहे. या वाहनांच्या नोंदणीशुल्कातून सुमारे ११ कोटी ६६ लाख १८ हजार ८१३ इतका महसुल मिळाला असल्याची माहिती परिवहन विभागाने दिली आहे.
मागील वर्षीच्या तुलनेत एक हजार वाहनांनी वाढ
पालघर सह वसई विरार मध्ये वाहनांची संख्या बेसुमार वाढू लागली आहे. विशेषतः सणासुदीला ही शहरात मोठ्या संख्येने वाहने दाखल होत आहे. मागील वर्षी गुढीपाडव्याला २ हजार ३४८ वाहने दाखल झाली होती. यावर्षी ३ हजार ६२० वाहने दाखल झाल्याची नोंद परिवहन विभागात आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत १ हजार २७२ ने वाढ झाली आहे.