कल्पेश भोईर, लोकसत्ता

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वसई : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आल्याने फुलांची मागणी वाढली आहे. या वर्षी फुलांच्या किमती ४० ते ५० टक्क्यांनी वाढल्या आहेत. या किमतींमुळे नागरिकांना मोठा भुर्दंड बसू लागला आहे

वसई, विरार भागातील पश्चिम पट्टय़ात मोठय़ा प्रमाणात फूल बागायतींची शेती केली जाते. या बागांमध्ये फुलणारी फुले येथील शेतकरी व व्यावसायिक मुंबईच्या दादर येथील बाजारपेठेत विक्रीसाठी घेऊन जातात. दररोज या भागातून एक हजाराहून अधिक किलो फुलांचा माल विक्रीसाठी जात असतो. सणासुदीच्या काळात या भागातील फुलांना दादर येथील फुलबाजारात मोठी मागणी असते.  यात मोगरा, चाफा, झेंडू, जास्वंद, शेवंती, गुलाब अशा विविध फुलांचा समावेश आहे.  मागील दोन वर्षे करोनाचे संकट असल्याने हवी तशी बाजारपेठ मिळाली नव्हती. यंदा सर्व निर्बंध शिथिल झाले असल्याने बाजारपेठाही बहरल्या असल्याचे फूल व्यावसायिकांनी सांगितले आहे. गणेशोत्सवात देवाला वाहण्यासाठी, तोरण व इतर सजावटीसाठी फुलांचा वापर होतो. त्यामुळे बाजारात दोन ते तीन दिवसांपासून फुलांची मागणी वाढली असल्याने त्यांच्या किमतीही वधारल्या आहेत. अडीचशे ते तीनशे रुपये किलोने विक्री केला जाणारा मोगरा हा पाचशे ते सहाशे रुपये किलोने विक्री होऊ लागला आहे.  

श्रावण महिन्यात असे वाटले होते फुलांना चांगला भाव मिळेल, परंतु त्या वेळीही फुलांचे बाजारभाव हे कमीच होते. आता गणेशोत्सव असल्याने दोन दिवसांपासून फुलांचे भाव वाढत असल्याचे फूल व्यावसायिक किरण पाटील यांनी सांगितले आहे.

गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी फुलांचा मालही चांगला आहे. आणि त्याला मागणीही चांगली आहे. गणेशोत्सवापर्यंत फुलांचे भाव असेच राहिले तर मोठा दिलासा मिळेल. – भूषण भोईर, फूल व्यावसायिक शेतकरी वसई.

फूल विक्रीचे अंदाजे दर

फुले          सुरुवातीचे दर          वाढलेले दर

चाफा          १६० रुपये शेकडा        २५० रुपये शेकडा

जास्वंद        ८० रुपये शेकडा         १५० रुपये शेकडा

झेंडू           ४० रुपये किलो            ६० – ७० रुपये किलो

शेवंती         १२० रुपये किलो        १६०- १८० रुपये किलो

मोगरा        ३०० रुपये किलो       ५०० ते ६०० रुपये किलो

गुलाब         १६० रुपये शेकडा        ३०० रुपये शेकडा

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 40 percent increase in flower rate in vasai virar market flower prices zws