भाईंदर : मीरा भाईंदर शहरातील पाणीटंचाईची समस्या दूर करण्याकरिता सूर्या धरणातून २१८ दशलक्ष लीटर पाणी मीरा भाईंदरसाठी मंजूर करण्यात आले आहे. मात्र त्यापूर्वी शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था उभी करण्याचे काम पालिकेला करायचे आहे. यासाठी नुकतेच राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पालिकेकडून सादर करण्यात आलेल्या ४७३ कोटींच्या प्रकल्प अहवालास मंजुरी देण्यात आली. त्यामुळे येत्या दोन वर्षांत शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मीरा भाईंदर शहराची लोकसंख्या १४ लाखांहून जास्त आहे. शहराला दररोज २१६ दशलक्ष लिटर्स पाण्याची गरज आहे. शहराला सध्या स्टेम वॉटर डिस्ट्रीब्युशन् स्ट्रक्चर कंपनी प्रा.लि. यांच्याकडून ८६ दशलक्ष लिटर आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून १२५ असा एकूण २११ दशलक्ष लिटरचा पाणी पुरवठा केला जातो. परंतु पाण्याच्या गळतीमुळे प्रत्यक्षात केवळ १९० दशलक्ष लिटर इतकेच पाणी मिळते. म्हणजेच दररोज शहराला २५ ते ३० दशलक्ष लिटर पाण्याची तूट भासते. भविष्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) वसई विरार आणि मीरा भाईंदर महापालिकेसाठी सूर्या पाणी प्रकल्पातून ४०३ दशलक्ष लीटर पाणी घेण्याची योजना आखली होती. त्यातील २१८ दशलक्ष लीटर पाणी मीरा- भाईंदर शहराला मिळणार आहे. पालिकेने २०१९मध्ये या योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तांत्रिक मंजुरीसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे सादर केलेला होता. मात्र त्याला मंजुरी मिळत नव्हती. नुकत्याच सुरू असलेल्या राज्य शासनाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासाठीच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार लवकरच शहरातील अंतर्गत पाणी वितरण व्यवस्था उभारण्याचे काम सुरू करण्यात येईल. आणि येत्या दोन वर्षांतील शहरातील पाणी टंचाईची समस्या दूर होईल, असे स्थानिक आमदार गीता जैन यांनी सांगितले.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 473 crore sanctioned mira bhayander waterway project make water surya dam amy
Show comments