भाईंदर :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर परवानाधारकांकडून शस्त्र जमा करण्यास पोलिसांनी सुरुवात केली असून आतापर्यंत मिरा रोड व भाईंदर शहरातील १४९ परवानाधारकांनी त्यांच्याकडील पिस्तुले, रिव्हॉल्वर, बंदुका अशी शस्त्रे पोलिसांकडे जमा केली आहेत.तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ११ जणांचे शस्त्रपरवाने रद्द करण्यात आले आहेत.
स्वसंरक्षणासाठी शस्त्र बाळगणाऱ्यांना पोलिसांकडून अधिकृत परवाना दिला जातो. मिरा भाईंदर शहरातील बांधकाम व्यावसायिक, उद्योजक, तसेच काही राजकीय व्यक्तींकडे शस्त्र बाळगण्याचा परवाना आहे.अशा परवानाधारकांची संख्या १९१ इतकी आहे.
हेही वाचा >>> वसई: पत्नीच्या हत्येचा आरोपी पॅरोलवरून फरार, वालीव पोलिसांनी ५ वर्षानंतर केली अटक
निवडणूक प्रक्रियेशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध असतो, अशा व्यक्तींकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असताना प्रक्रियेला गालबोट लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांच्याकडून शस्त्राचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्यामुळे अशा परवानाधारकांकडून निवडणुकांपूर्वी शस्त्र जमा करण्यास सुरुवात केली जाते.
त्यानुसार पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ १ कडून मिरा भाईंदर मध्ये शस्त्र बाळगणाऱ्यांची शहानिशा करण्यात येत आहे.यात शस्त्र जमा करण्याची सूचना पोलीस ठाण्यांना देण्यात आल्यानंतर शस्त्र जमा करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
यामध्ये आतापर्यंत १९१ शस्त्र परवानाधारकांपैकी १४९ जणांनी आपले शस्त्र पोलिसांकडे जमा केले आहेत. ११ जणांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे आढळून आल्यानंतर त्यावर रद्दची कारवाई करण्यात आली आहे.तर शहरातील वरिष्ठ अधिकारी, बँक आणि इतर महत्वाच्या अशा पदावर असलेल्या १९ व्यक्तींना या काळातही शस्त्र बाळगण्याची अनुमती देण्यात आली.याशिवाय उर्वरित शिल्लक राहिलेल्या शस्त्र परवानाधारकांना देखील संपर्क साधण्यात आला असून तेही लवकरच शस्त्रे जमा करणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांनी दिली आहे.
हेही वाचा >>> मिरा रोड येथे आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी पहिला गुन्हा दाखल
५ जणांवर तडीपारीची कारवाई. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिरा भाईंदर शहरात कोणतेही अनुचित प्रकार घडू देऊ नये असे, सक्त आदेश पोलीस आयुक्त मधुकर पांडे यांनी दिले आहेत.या धर्तीवर पोलिसांनी शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची यादी तयार केली आहे.यात गंभीर गुन्ह्यात सातत्याने सहभाग घेणाऱ्या ५ जणांवर आचारसंहिता घोषित झाल्यानंतर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. मागील आठ महिन्यात परिमंडळ १ कडून जवळपास २३ जणांवर तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे.