लोकसत्ता प्रतिनिधी

वसई : वर्सोवा खाडी सुर्याप्रकल्प दुर्घटनेत अडकून पडलेल्या राकेश यादव या चालकाच्या कुटुंबाला ५० लाख रुपये मदतीचा धनादेश रविवारी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला आहे. मात्र अजूनही बचाव कार्यात या चालकाचा शोध लागलेला नाही.

२९  मे रोजी रात्री ९.३० वाजता वर्सोवा खाडी पुलाजवळ एल अँड टी कंपनी यांच्या मार्फत सूर्या पाणीपुरवठा प्रकल्पाच्या बोगद्याचे काम सुरू असताना भूस्खलन होऊन दुर्घटना घडली होती. यात जेसीबी चालक राकेश यादव हा त्यात अडकून पडला आहे. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी घटनास्थळाला भेट दिली होती.यावेळी यादव कुटुंबाला ५० लाखाची मदत व कुटुंबातील एका सदस्याला एल अँड टी कंपनीत नोकरी देण्याचे जाहीर केले होते.

आणखी वाचा-घोडबंदर किल्याच्या तळघरात सापडली छुपी खोली;  राज्य पुरातत्व विभागाकडून पाहणी

एमएमआरडीएला दिलेल्या निर्देशानुसार एल अँड टी कंपनीच्या रविवारी राकेश यादव यांच्या कुटूंबियांना मुख्यमंत्र्यांच्या ठाणे येथील निवासस्थानी बोलावून त्यांना ५० लाख रुपयांच्या मदतीचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. याशिवाय राकेशचा भाऊ दुर्गेश याला एल अँड टी कंपनीमध्ये नोकरीही देण्यात आली आहे. यावेळी राकेश यांच्या पत्नी सुशीला यादव, वडील बालचंद्र यादव, मुली रिशु आणि परी यादव, मुलगा रिंकू यादव आणि भाऊ दुर्गेश यादव तसेच एमएमआरडीए आणि एल अँड टीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

२५ दिवसानंतरही चालकाचा शोध नाही

दुर्घटना होऊन २५ दिवसांचा कालावधी उलटून गेला तरी ढिगाऱ्याखाली अडकून पडलेल्या राकेश यादव याचा अजूनही शोध लागला नाही. याठिकाणी सैन्यदल, तटरक्षक दल, एनडीआरएफ, एसडीआरएफच्या जवानांना एकत्रितपणे बचावकार्यासाठी पाचारण करण्यात आले. मात्र वरून कोसळणारा पाऊस यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहे.मात्र तरीही शर्थीचे प्रयत्न करून राकेश याला बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मदत जरी मिळाली असली अजूनही त्याचा शोध लागला नाही.