वसई : केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांच्या आदेशानंतर वसई-विरार महापालिकेने शहरांतील अनधिकृत बांधकामांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे. शहरांत लाखो चौरस फूट जागेवर अनधिकृत बांधकामे झाली असताना पालिकने केवळ ५६९ अनधिकृत बांधकामे असल्याचे आपल्या संकेतस्थळावर जाहीर केले आहे. पालिकेची ही माहिती धूळफेक करणारी असल्याने नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
वसई-विरार शहरात मोठय़ा प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होत आहेत. त्यामुळे शहराची ओळख ‘अनधिकृत बांधकामांचे शहर’ अशी होऊ लागली आहे. या अनधिकृत बांधकामांमुळे शहराचे नियोजन कोलमडले असून अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. पालिका अनधिकृत बांधकामांवर कारवाई करत असली तरी त्याच्या हजारो पटीने अनधिकृत बांधकामे होत आहेत. अनधिकृत बांधकामांचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे.
एप्रिलमध्ये ठाकूर यांनी वसई-विरार महापालिकेला भेट दिल्यानंतर शहरातील अनधिकृत बांधकामांबद्दल अधिकाऱ्यांना धारेवर धरल होते. अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याबरोबर सर्व अनधिकृत बांधकामांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे पालिकेने आपल्या संकेतस्थळावर अनधिकृत बांधकामांची माहिती दिली आहे. परंतु ही माहिती पाहून मोठा धक्का बसला आहे. कारण पालिकेने शहरात फक्त ५६९ अनधिकृत बांधकामे असल्याचे जाहीर केले आहे. त्यातही काय कारवाई झाली, न्यायालयीन सद्यस्थिती काय आहे, असे या यादीत नमूद केले आहे.
शहरामध्ये दिवसाला शेकडो अनधिकृत बांधकामे होत असताना पालिकेने १४ वर्षांत केवळ ५६९ अनधिकृत बांधकामे असल्याचे जाहीर करणे म्हणजे निव्वळ धूळफेक असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनिष सामंत यांनी केला आहे. प्रभाग समिती ‘ए’ बोळींजमध्ये २००५ ते २०२३ या कालावधीत केवळ ८९ अनधिकृत बांधकामे असल्याचे नमूद केले आहे. ही फसवणूक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकीकडे पालिका दावा करते की, मागील सात महिन्यांत आठ लाख चौरस फुटांवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली, तर दुसरीकडे केवळ १४ वर्षांत ५६९ बांधकामे अनधिकृत असल्याचे जाहीर करते. पालिकेच्या माहितीत ही विसंगती असून, पालिका जनतेची फसवणूक करत असल्याचा आरोप सामंत यांनी केला आहे.
सर्वाधिक अनधिकृत बांधकामे पेल्हारमध्ये
पालिकेने जाहीर केलेल्या यादीनुसार सर्वाधिक म्हणजे १८४ अनधिकृत बांधकामे प्रभाग समिती (एफ) पेल्हारमध्ये आहेत. त्यापाठोपाठ प्रभाग समिती (जी) वालीवमध्ये १२२ अनधिकृत बांधकामे आहेत. सर्वात कमी अनधिकृत बांधकामे प्रभाग समिती (एच) नवघर माणिकपूरमध्ये असल्याचे नमूद करण्यात आले आहे.