वसई – गुरुवारी वसई, विरार आणि नया नगरमध्ये पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापे घालून एटीएम व्हॅनमधून तब्बल ७ कोटी ८० लाखांची रोकड जप्त केली आहे. कुठल्याही कागदपत्रांशिवाय ही रोकड बाळगण्यात आली होती. ही रोकड जप्त करून त्याची माहिती आयकर विभागाला देण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

निवडणुकीनिमित्त बेकायदेशीररित्या काळ्या पैशांची देवाण घेवाण होत असते. त्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने रोकड बाळगवण्यावर कडक निर्बंध आणले आहे. तशा सुचना पोलीस आणि भरारी पथकाला देण्यात आल्या आहेत. बॅंकांच्या एटीएम केंद्रामध्ये खासगी कंपनीमार्फत रोकड भरण्यात येत असते. मात्र या व्हॅनमधून बेकायदेशीररित्य रोकड नेली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसारा नालासोपारा, मांडवी आणि नया नगर येथे वेगवेगळ्या ठिकाणी पोलिसांनी छापे मारले. यात एकूण ७ कोटी ८० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. नालासोपारा पश्चिमेच्या बस आगार परिसरात गुन्हे शाखा ३ च्या पथकाने सीएमएस कंपनीची एक व्हॅन ताब्यात घेतली. या व्हॅनमध्ये ३ कोटी ४८ लाख रुपये होते. मांडवी येथे याच कंपनीच्या व्हॅनमध्ये २ कोटी ८० लाख रुपये आढळले. तर मिरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन एटीएम व्हॅनमधून १ कोटी ४७ लाख रुपयांची रोकड हस्तगत करण्यात आली.

हेही वाचा – आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

गुरुवारी रात्री उशिरापर्यंत या रोकडची मोजणी सुरू होती. बॅंकांच्या एटीएम केंद्रात रोकड भरण्यासाठी क्यूआर कोड दिला जातो. जेवढी रोकड यंत्रात भरायची असते तेवढ्या रकमेचा क्यूआर कोड असतो. मात्र या सर्व व्हॅनमध्ये मंजूर रकमेपेक्षा जास्त रोकड होती, अशी माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) प्रकाश गायकवाड यांनी दिली. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार रोकड बाळगण्यासाठी अधिकृत कागदपत्रे असणे आवश्यक आहेत. मात्र या सर्व एटीएम व्हॅन चालकांकडे कुठल्याही प्रकारची अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्यामुळे ही रोकड बेकायदेशीर आहे. आम्ही ही रोकड जप्त केली असून त्याची माहिती आयकर विभागाला देणार आहोत. त्यांच्याकडून पुढील चौकशी केली जाईल, अशी माहिती गुन्हे शाखा २ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी दिली.

हेही वाचा – प्रकरण मिटवण्यासाठी मागितली साडेचार लाखांची लाच, नया नगरच्या लाचखोर पोलिसाला अटक

सखोल चौकशीची मागणी

एटीएम व्हॅनमधून बॅंकेच्या एटीएम केंद्रात भरण्यासाठी रोकड नेली जाते. त्याचा चोख हिशोब असतो. गुरुवारी एकाच दिवशी ठिकठिकाणी असलेल्या एटीएम व्हॅनमध्ये बेहिशोबी रोकड आढळणे संशयास्पद असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीने केला आहे. एटीएम व्हॅनचा वापर करून काळ्या पैशांचा कुणी व्यवहार करत होते का त्याची सखोल चौकशी करावी अशी मागणी बविआचे नेते उमेश नाईक यांनी केली आहे.

Vasaivirar News (वसई विरार न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 7 crore 80 lakh cash seized in vasai mira road suspected illegal cash in atm van ssb