वसई- वसई विरार महापालिकेतील उपायुक्तांची १४ पैकी ७ पदे रिक्त असल्याने सध्या कार्यरत असलेल्या उपायुक्तांवर कामाचा ताण वाढत आहे. यामुळे उपायुक्तांकडे १२ ते १५ विभाग देण्यात आले आहेत.
२००९ साली शहरातील ४ नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींचे विलिनिकरण होऊन वसई विरार महापालिकेची स्थापना झाली होती. २०१४ साली पालिकेचा आकृतीबंध मंजूर झाला होता. त्यानुसार २ हजार ८५३ पदे मंजूर होती. त्यावेळी एकूण उपायुक्तांची १४ पदे मंजूर होती. उपायुक्तांची पदे प्रतिनियुक्तीवर भरण्यात येतात. परंतु सध्या केवळ ७ उपायुक्त कार्यरत आहेत. एक उपायुक्त वैद्यकीय रजेवर आहेत. त्यामुळे ७ उपायुक्तांवरच पालिकेचा कारभार चालविण्यात येत आहे. विभाग जास्त आणि उपायुक्त कमी असल्याने त्यांच्यावर अनेक विभागांची जबाबदारी देण्यात आली आहे. नानासाहेब कामठे आणि समीर भूमकर यांच्यावर प्रत्येकी १२ ते १५ विभाग सोपविण्यात आले आहेत.
अतिरिक्त विभागांचा ताण
जास्त विभाग असल्याने उपायुक्तांवर कामाचा प्रचंड ताण येत आहे. नियमित बैठका, शासकीय कार्यक्रम, वेगवेगळ्या विभागांचे उपक्रम, नागरिकांच्या भेटी, कार्यालयीन कामे यामुळे प्रत्येक विभागाला न्याय देता येत नाही, असे काही उपायुक्तांनी सांगितले.
उपायुक्तांची पदे ही शासनाकडून प्रतिनियुक्तीवर भरली जातात. त्यासाठी आम्ही शासनाकडे पाठपुरावा करत आहोत. सदानंद पुरव– उपायुक्त (आस्थापना)
सध्या कार्यरत उपायुक्त
१) अजित मुठे
२) सुभाष जाधव
३) दिपक सावंत
४) नानासाहेब कामठे
५) समीर भूमकर
६) अर्चना दिवे
७) सदानंद पुरव
८) दिपक झिंजाड (रजेवर)