मीरा भाईंदर मधील ८ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून शहरातील इतर सर्व जनावरांना गोठ्यात बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.
भाईंदर पश्चिम येथील केशवसूष्टीमध्ये मोठ्या संख्येने जनावरे पाळण्यात आली आहेत.यातील आठ गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे निष्पन्न झाले आहे.यापूर्वी या गाईना प्रतिबंधात्मक लंपी लस देण्यात आली असल्यामुळे आता आजाराचा प्रभाव कमी प्रमाणात दिसून येत आहे. मात्र इतर जनावरांना या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून या गाईना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
मीरा भाईंदर शहरात २९ तबेले आहेत.यात भटके व खासगी असे मिळून दीड हजाराहून अधिक जनावरे आहेत.या सर्व जनावरांचे लसीकरण झाले असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र शहरात लंपी आजाराचा संसर्ग पसरू नये म्हणून जनावरांना बंद करण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.
“मीरा भाईंदर मधील गाईना लंपी आजाराची लागण झाली असल्याचे स्पष्ट झाले आहे.त्यामुळे पालिकेकडून इतर जानावरांचे सर्वेक्षण करून उपाययोजना आखण्याचे काम युद्ध पातळीवर हाती घेण्यात आले आहे.”रवी पवार – उपायुक्त