भाईंदर-  मिरा भाईंदर महापालिकेच्या फराळ सखी उपक्रमातून ८ महिलांची उद्योजक घडविण्यासाठी निवड करण्यात आली आहे. केंद्राच्या योजनेतर्फे या महिलांना व्यावसायिक प्रशिक्षण देऊन त्यांचा उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. महिलांना कायमस्वरूपी उद्योग, रोजगार आणि बाजारपेठ मिळावी यासाठी मिरा भाईंदर महापालिकेकेचे आयुक्त संजय काटकर यांच्या संकल्पनेतून  ‘फराळ सखी’ हा उपक्रम राबविला होता. या उपक्रमाला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि दिवाळीत तब्बल ३ टन फराळाची विक्री झाली होती.

या उपक्रमाची दखल केंद्र शासनाच्या निती आयोगाने घेतली होती. नीती आयोगाच्या महिला उद्यम मंच आणि सेंटर फॉर एज्युकेशन, गव्हर्नन्स अँड पॉलिसी (सीईजीपी फाउंडेशन) यांच्या संयुक्त विद्यमाने अवॉर्ड टू रिवॉर्ड हा उपक्रम राबविण्यात आला होता. त्या अंतर्गत मिरा भाईंदरमधून निवडलेल्या २५ महिला उद्योजकांच्या गटाला व्यवसाय विकासाच्या दृष्टीने सर्व प्रकारचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यातून ८ उत्कृष्ट महिला उद्योजकांची निवड करण्यात आली. त्यांना व्यावसायिक उद्योजिका म्हणून तयार केले जाणार आहे. या महिलांना व्यावासायिक प्रशिक्षण देऊन त्यांना उत्पादनांसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जानेवारीत महिन्यात ‘अवॉर्ड टू रिवॉर्ड’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला होता. या कार्यक्रमाअंतर्गत कौशल्य निर्मिती, विपणन, वित्त आणि क्रेडिट व्यवस्थापन, कायदेशीर आणि अनुपालन, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक संपादन आणि आर्थिक नियोजन यावर विशेष सत्र घेण्यात आले होते. याशिवाय उत्पादक कारखाने-कार्यशाळांना भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. भाईंदर येथील त्रिपाठी स्नॅक्स, वऱ्हाडी मिसळ आणि ठाण्यातील प्रसादालय हॉटेल आदी ठिकाणी भेटी आयोजित करण्यात आल्या होत्या. महिलांधील क्षमता विकसित करून त्यांना संधी उपलब्ध करून दिली आहे. या छोट्या प्रयत्नांना यश येत आहे. भविष्यात या महिलांचा उद्योगसमूह नावारूपाला येईल असा विश्वास आयुक्त संजय काटकर यांनी व्यक्त केला.

Story img Loader