वसई: ‘आई मला घरी घेऊन चल, मला इथे रहायचं नाही..’ अशी आर्त साद घालणार्या अनाथाश्रमातील ८ वर्षाच्या मुलाने आईचा विरह सहन न झाल्याने विहिरीत उडी मारून जीनव संपवले. भाईंदरच्या उत्तन परिसरातील अनाथाश्रमात ही हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. भाईंदर पश्चिमेच्या उत्तन येथे केयरींग हँड्स सेवा कुटीर नावाची संस्था आहे. ही संस्था अनाथ मुलांचे संगोपन आणि सांभाळ करते. दिड वर्षांपूर्वी ही संस्था सुरू झाली. संस्थेत २१ अनाथ मुले आहेत.
हेही वाचा >>> प्रेमसंबंधाला धार्मिक वळण, भाईंदर मध्ये तणाव; तरुणाला मारहाण, दुकानाची तोडफोड
३ महिन्यांपूर्वी नालासोपारा येथे राहणार्या एका महिलेने आरमान अब्दुल सय्यद (८) या आपल्या मुलाला संस्थेत दाखल केले. या महिलेने दुसरे लग्न केले होते. अरमान हा तिच्या पहिल्या पतीपासून झालेला मुलगा होता. त्यामुळे तिने या संस्थेत मुलाचा सांभाळ करण्यासाठी ठेवले होते. ती अधून मधून आपल्या मुलाला भेटायला येत होती. त्यावेळी अरमान तिला घरी घेऊन चल असा हट्ट करत होता. मला इथे रहायच नाही. मला तुझ्याजवळच रहायचं आहे, असं तो आईला सांगत होता आणि रडायचा. मागच्या महिन्यात आई भेटायला आली असता ‘मला घेऊन चल आई, मला इथे नाही राहायचं’ असं तो आईला सांगत होता. मात्र आईने दुसरं लग्न करून नालासोपारा येथे राहत असल्याने तिने मुलाला सोबत ठेवणे नाकारले. यामुळे अरमान खूप दु:खी आणि निराश होता.
हेही वाचा >>> वसई : अनधिकृत बांधकाम कोसळून महिलेचा मृत्यू, ठेकेदारांनी केला पुरावा नष्ट, ३ दिवसांनी गुन्हा दाखल
सोमवारी रात्री सर्व मुले झोपी गेल्यानंतर बाजूला असलेल्या विहिरीत उडी मारून आपले जीवन संपवले. मंगळवारी सकाळी अरमान दिसून आला नाही म्हणून त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तेव्हा अरमानचा मृतदेह विहिरीत आढळून आला. शवविच्छेदन अहवालात बुडून मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. अरमानला घराची ओढ होती. त्यामुळे तो आईला घरी घेऊन चल असे सांगत होता. परंतु आईने त्याला नेले नाही, आईचा विरह सहन न झाल्याने त्याने नैराश्यापोटी आत्महत्या केली असे उत्तन सागरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण बदादे यांनी सांगितले.