भाईंदर : मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात तब्बल ९ बालके ही तीव्र कुपोषित असल्याचे समोर आले आहे. याशिवाय ८ बालके ही मध्यम कुपोषित गटात आहेत. पूर्वीच्या तुलनेत तीव्र कुपोषित बालकांच्या संख्येत वाढ झाली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिरा भाईंदर शहरात शहरी व ग्रामीण अश्या एकूण ८३ अंगणवाड्या आहेत. तर, महापालिकेच्या बालवाड्यांची संख्या २६ आहे. या अंगणवाड्या व बालवाड्यांमध्ये लगभग १० हजारांहून अधिक मुले आहेत. अंगणवाड्यांमध्ये येणाऱ्या सहा वर्षांपर्यंतच्या बालकांना तसेच स्तनदा मातांना एकात्मिक बालविकास प्रकल्प माध्यमातून सकस आहाराचा पुरवठा करण्यात येतो. यात लापशी, खिचडी, पुलाव, चण्याची उसळ, गूळ, कुरमुरा लाडू, भेळेचा समावेश आहे. ही कामे महिला बचत गटांना देण्यात आली आहेत. सकस आहारासाठी सरकारी तिजोरीतून लाखोंचा खर्च दाखवला जातो. मात्र प्रत्यक्षात सकस आहार पुरवला जात नसल्याची ओरड सतत होत असते.

हेही वाचा – सर्वकार्येषु सर्वदा : अनाथांचा आधार असलेल्या संस्थेला आर्थिक पाठबळाची गरज

एप्रिल २०१९ पासून कुपोषित बालकांचे सर्वेक्षण अंगणवाड्यांमध्ये केले जात आहे. यात ० ते ६ वयोगटातील बालकांची तपासणी करून कुपोषणाची वर्गवारी केली जाते. यात मध्यम कुपोषित मॅम आणि तीव्र कुपोषित सॅम अशी वर्गवारी केली जाते. त्यानुसार महापालिकेच्या वैद्यकीय विभागात उपलब्ध असलेल्या माहितीनुसार जुन २०२४ मध्ये एकूण १७ कुपोषित बालकांची नोंद झाली आहे. यात ९ बालक हे तीव्र कुपोषित तर ८ मध्यम कुपोषित आहेत. त्यामुळे या दोन्ही गटांतील बालकांना पुढील उपचारासाठी ठाणे जिल्हा रुग्णालयात पाठवण्याची शिफारस प्रशासनाने केली असल्याची माहिती वैद्यकीय आरोग्य विभागातून देण्यात आली आहे.

हेही वाचा – नालासोपाऱ्यात १० वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, दोन जणांना अटक

१ हजार २३२ मुलांची तपासणी

मिरा भाईंदर शहरात ० ते ६ वयोगटातील एकूण १ हजार २३२ बालकांची तपासणी करण्यात आली आहे. यात ० ते ३ वयोगटात ६०९ बालकांमध्ये ३ जण मध्यम कुपोषित तर ५ जण तीव्र कुपोषित आढळून आली आहेत. तसेच ३ ते ६ वयोगटात ६२३ बालकांमध्ये ५ जण मध्यम कुपोषित आणि ४ जण तीव्र कुपोषित असे एकूण १७ बालके आहेत. धक्कादायक म्हणजे ही बालके रेवा नगर, क्रांती नगर आणि मुर्धा गाव अशा एकाच परिसरतच राहणारी आहेत.