वसई- विरार मधील आगाशी गावातील एका गणेशोत्सव मंडपात पोलिसांनी मारलेल्या छाप्याच्या वेळी पळताना २० वर्षीय मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. प्रचित भोईर असे या मुलाचे नाव आहे.

विरार पश्चिमेच्या आगाशी जवळील कोल्हापूर येथील गणेशोत्सव मंडपात काही तरूण मुले जागरण करत पत्ते खेळत होती. शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास अर्नाळा सागरी पोलिसांची गस्तीवरील वाहन छापा टाकण्यासाठी आले. पोलिसांना पाहून मुलांची पळापळ सुरू झाली. पळत असताना प्रचित विनोद भोईर (२०) हा मुलगा खाली कोसळला. त्याला उपचारासाठी विरारच्या संजीवनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या प्रकारामुळे गावात एकच तणाव निर्माण झाला होता. खबरदारी म्हणून पोलिसांनी संजीवनी रुग्णालयात बंदोबस्त ठेवला होता. पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप मयत मुलाच्या नातेवाईकांनी केला आहे. पोलिसांनी छापा टाकण्याची गरज नव्हती. पोलिसांनी त्याचवेळी त्याला प्रथमोपचार दिले असते तर जीव वाचला असा आरोप मयत प्रचितची नातेवाईक निशिगंधा म्हात्रे हिने केला आहे.

हेही वाचा >>>वसईत पिता-पुत्राची गळफास घेऊन आत्महत्या; चिठ्ठीत धक्कादायक कारण आलं समोर

मुलाला मारहाण झालेली नाही. केवळ धावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला असे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले. आम्ही मंडपावर छापा घातला नाही. केवळ रात्रीच्या पोलीसांचे गस्तीचे वाहन तेथून जात होते. पोलीस छापा टाकायला आले आणि ते आपल्याला पकडतील या भीतीने मुले पळाली आणि त्यात या मुलाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला असे अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कल्याणरावर करपे यांनी सांगितले. याप्रकरणी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Story img Loader