वसई- नारळाच्या झाडावरील नारळ डोक्यावर पडल्याने एक मुलगा जखमी झाला आहे. वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथे सोमवारी दुपारी ही घटना घडली. जखमी मुलावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
वसई पूर्वेच्या वसंत नगरी येथील सेक्टर २ मधील इमारतीच्या आवारात नारळाचे झाड लावण्यात आले आहे. नारळाचे झाड उचं झाल्याने ते कलून रस्त्यावर आले आहे. तेथून नागरीक ये-जा करत असतात. सोमवारी दुपारी दोन च्या सुमारास या परिसरात राहणारा हितेश पांडे (१३) हा मुलगा या इमारतीच्या समोरून जात असताना झाडावरील नारळ त्याच्या डोक्यात पडले. त्यात जो जखमी झाला. त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल कण्यात आले आहे. गंभीर दुखापत झाल्याने त्याला एमआरआय करून पुढील उपचार केले जाणार आहे. या दुर्घटनेत मुलगा थोडक्यात बचावला असला तरी अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
नारळाच्या झाडावरील नारळे पडण्याच्या स्थितीत असतानाही सोसायटीने ती काढली नसल्याने सोसायटीचा हलगर्जीपणा दिसून आला आहे. या प्रकऱणी सोसायटीच्या पदाधिकार्यांवार कारवाई करण्याची मागणी जखमी मुलाच्या आईने केली आहे. सोसायटीच्या आवारातील झाडे धोकादायक असतील तर सोसायटीने प्रभाग समितीला कळवाले किंवा पालिकेची परवानगी घेऊन झाडे कापली पाहिजे, असे पालिकेच्या उपायुक्त (वृक्ष प्राधिकऱण) नयना ससाणे यांनी सांगितले. नारळे पडण्याच्या स्थितीत असल्यावर ती काढणे गरजेचे होते असेही त्यांनी सांगितले.